Home बातम्या कॅसिनोतून नदीत पडून हैदराबादच्या युवकाचे निधन

कॅसिनोतून नदीत पडून हैदराबादच्या युवकाचे निधन

0

मयताचा भाऊ शिवचैतन्य पवनकुमार रेड्डी याने पणजी पोलिसांना दिलेल्या जबानीत आपल्या डोळ्यांदेखत आपला भाऊ कॅसिनो जहाजातून नदीत पडून मरण पावल्याचे सांगितले. मध्यरात्री आपल्या मित्रांबरोबर त्याने व्होडका हे रशियन मद्य प्राशन केले होते. नंतर बाथरुमात जाण्यासाठी तो ‘रिसट्रिक्टेड डोअर’मधून बाहेर आला व ‘आउटर डेक’वर पोचला. यावेळी पावसामुळे आउटर डेकचा भाग भिजलेला होता.

नशेत भिजलेल्या डेकवरून चालताना तो घसरून पडला असता आपण त्याला उठवले. नंतर अचानक त्याने भिरकी घेतली असता तोल जाऊन तो पाण्यात पडल्याचे शिवचैतन्य रेड्डी यांनी जबानीत म्हटले आहे. यावेळी भावाला वाचवण्यासाठी आपण पाण्यात उडी घेतली. पण तो सापडू शकला नाही. हा प्रकार घडला असता १५-२० जण हजर होते. पण त्यापैकी कुणीही आपणाला मदत केली नसल्याचे त्याने जबानीत म्हटले आहे. नंतर बोटीवरील कर्मचार्‍यांनी मला वर येता यावे यासाठी पाण्यात दोरी फेकली. ती पकडून आपण वर आल्याचे त्याने नमूद केले आहे. कॅसिनोवाल्यांनी आपल्या भावाला वाचवण्याचे कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे व त्यांच्याकडे योग्य ती सुरक्षा व बचाव यंत्रणा नसल्याचेही त्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.

सदर युवकाचा मृतदेह अद्याप सापडलेला नसून शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाचे पाणबुडे व किनारी पोलिसांची मदत घेण्यात आली आहे.

शिवचैतन्य रेड्डी, त्याचा मयत बंधू साई धनुश, सेनथिल रामकृष्ण राज, साईश धणमुखा असे हे चार महाविद्यालयीन युवक शुक्रवारी गोव्यात आले होते. पणजीतील पलासियो-द-गोवा येथे त्यानी खोली घेतली होती. नंतर बागा किनार्‍यावर जाऊन आल्यानंतर मजा करण्यासाठी ते कॅसिनोवर गेले असता हा अपघात घडला.