कॅसिनोंचा विळखा

0
10

पर्वरीतील कॅसिनोच्या व्यवस्थापकीय संचालकांवर दोन हल्लेखोरांकडून झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत गंभीर आणि ह्या व्यवसायाशी निगडीत गैरगोष्टींवरचा पडदा बाजूला सारणारी आहे. ह्या हल्ल्यामागील कारणे व्यक्तिगत असोत अथवा व्यावसायिक असोत, अशा प्रकारे धडधडीतपणे गोळीबाराची घटना घडणे हे आम जनतेमध्ये आपल्या सुरक्षिततेप्रती भीती निर्माण करणारेच आहे. त्यामुळे पोलिसांनी ह्या घटनेचा अत्यंत कसून तपास केला पाहिजे. ह्या दोन्ही हल्लेखोरांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत आणि ते पुरेेसे स्पष्ट आहेत, त्यामुळे दोन्हीही हल्लेखोर निश्चितच पकडले जातील अशी अपेक्षा आहे. ह्या हल्लेखोरांनी स्वतःची तोंडेही झाकलेली नव्हती, एवढ्या खुलेआमपणे बिनधास्त येऊन त्यांनी गोळीबार केला हे काय दर्शवते? गोव्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा अजिबात धाक त्यांना दिसत नाही. निर्ढावलेल्या सराईत गुन्हेगारासारखे त्यांचे हे कृत्य आहे, त्यामुळे हा सुपारीचा प्रकार दिसतो. ही सुपारी नेमकी कोणी आणि कशासाठी दिली, त्यामागची कारणे काय हेही ह्या प्रकरणात शोधले गेले पाहिजे आणि कोणावरही मेहेरनजर न ठेवता कठोर कारवाई झाली पाहिजे, तरच अशा प्रकारांची पुनरावृत्ती टळेल. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांनी लगोलग उच्चपदस्थांना ह्या हल्ल्याची माहिती दिली म्हणून काही मिनिटांत सूत्रे हलली. कॅसिनो व्यावसायिकांची पोहोच कुठवर आहे हीही ह्यानिमित्ताने जनतेला दिसले. कॅसिनो व्यवसायातील अनैतिक गोष्टी, त्याला वेढलेली गुन्हेगारी हे विषयही आता ह्यानिमित्ताने चर्चेत आले आहेत. कॅसिनो – मग ते पाण्यातील असोत किंवा जमिनीवरील; वरवर पाहता त्यांना साध्या खेळांचे स्वरूप जरी दिलेले असले, तरी तो सरळसरळ जुगार आहे आणि काळा पैसा पांढरा करण्याचे ते एक सुलभ साधनही मानले जाते. त्यामुळेच देशभरातील धनदांडगे जुगारी गोव्याकडे धाव घेत असतात. त्यांच्यासाठी नाना प्रकारच्या सोयीही गोव्यात सर्वत्र उपलब्ध झाल्या आहेत. मसाज आणि स्पाच्या गोंडस नावाखाली चाललेल्या देहविक्रयापासून नाईटक्लब आणि डान्सबारपर्यंत सगळे काही आज गोव्यात खुलेआम चालले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची तर ह्या कॅसिनोंवर सतत ये – जा असते. काळ्याचे पांढरे करण्यासाठी अनेक उद्योजक, व्यावसायिक ह्या कॅसिनोंचा आधार घेत असतात. येथील काही हॉटेले तर त्यांच्याच येण्या-जाण्यावर चालतात. वर्षाचे बाराही महिने तेथील खोल्या त्यांच्यासाठी आरक्षित असतात. वाहनांचा ताफा त्यांच्या दिमतीला असतो. 70 प्रवासी क्षमतेच्या कॅसिनो जहाजाच्या जागी तब्बल 2000 प्रवाशांना सामावून घेणारे महाकाय जहाज त्याच परवान्याच्या आधारे आणण्याचा प्रकार मागे उघडकीस आला होता. काही काळापूर्वी सक्तवसुली संचालनालयाने गोव्यासह विविध राज्यांत केलेल्या छापेमारीत ते गोव्यातील काही बड्या कॅसिनोंपर्यंतही येऊन पोहोचले होते. दोन कोटी रुपयांची रोकड तेव्हा जप्त झाली होती. कॅसिनोंमार्फत होणाऱ्या हवाला व्यवहारांचा पर्दाफाश त्यांनी केला होता. राज्यातील कॅसिनो हे गोव्यासाठी लांच्छन आहे. एकीकडे गोव्याला देवभूमी म्हणायचे, परशुरामाचे नाव घ्यायचे, एकादश तीर्थाची बात करायची आणि दुसरीकडे कॅसिनो आणि नाईटक्लबसाठी पायघड्या अंथरायच्या हा दांभिकपणा किती काळ चालणार आहे? गोळीबाराची घटना घडताच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना लागलीच गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेल्याचा साक्षात्कार झाला. पण हे कॅसिनो गोव्यात सर्वप्रथम आणले कोणी? काँग्रेसच्याच सरकारने ना? तेव्हा त्याला विरोध करणाऱ्या, त्याविरुद्ध आंदोलने करणाऱ्या भाजपाच्या सरकारांनी हे कॅसिनो कायम ठेवले त्यावरून त्यातील बडे हितसंबंध लक्षात येतात. ताज्या गोळीबार प्रकरणात ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांच्या सशस्त्र अंगरक्षकाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याने हल्लेखोरांनी पळ काढला. त्यांना ते अपेक्षित नसावे. आता येथील कॅसिनोच्या संचालकांना सशस्त्र अंगरक्षकांनिशी का वावरावे लागते हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कॅसिनोंमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे व्यवहार चालतात? तेथे कोण येत असते? का येत असते? त्यातून कोणत्या प्रकारचे व्यवहार होतात? ह्या व्यवसायाचे गोव्याच्या एकूण सामाजिक वातावरणावर कोणते दुष्परिणाम झाले आहेत? कोणकोणत्या राज्यांतील व्यावसायिकांचे, बड्या राजकारण्यांचे येथील कॅसिनो व्यवसायाशी संबंध आहेत? असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे गोमंतकीय जनतेला हवी आहेत. ह्या गोळीबाराच्या घटनेनिमित्ताने ही झाडाझडती झाली पाहिजे. राज्याला मिळालेल्या महसुलापेक्षा ह्यातून राज्याचे झालेले नैतिक अधःपतन कितीतरी मोठे आहे ही जाणीव सरकारला होईल तो सुदिन.