नोवार्टिसची पेटंट याचिका फेटाळली
कॅन्सरसाठीचे औषध ग्लिवेकच्या पेटंटसाठीची स्विस कंपनी ‘नोवार्टिस’ची याचिका काल सुप्रीम कोर्टाने फेटाळली. यामुळे आता भारतातील औषध कंपन्यांना कॅन्सरची औषधे माफक दरात उपलब्ध करणे सोपे होऊ शकते.
सुमारे सात वर्षांनंतर हा कायदेशीर विषय निकालात काढण्यात आला आहे. नोवार्टिसचा दावा होता की ‘ग्लिवेक’च्या निर्मितीचा अधिकार केवळ या एकाच कंपनीचा असून भारतीय कंपन्यांवर तत्सम औषधांच्या निर्मितीसंबंधी निर्बंध यायला हवेत. या औषधात वापरला जाणार एक घटक हा वैशिष्ट्यपूर्ण असून कंपनीचा शोध आहे.
कोर्टाने मात्र हा दावा फेटाळत रक्ताच्या, त्वचेच्या व अन्य कॅन्सरवर उपचारांसाठी काहीच नवीन शोध झालेला नाही. देशात सध्या सुमारे २८ लाख कॅन्सर रुग्ण असून या निवाड्यामुळे त्यांना दिलासा मिळू शकतो. ग्लिवेकचा महिन्याचा डोस १.२ लाख रु. एवढ्या किमतीचा असतो. तर भारतीय कंपन्या तयार करणारा तत्सम औषधाच्या डोसची किंमत सुमारे ८ हजार रु. एवढी होते.
ऐतिहासिक निवाडा
पेटंटची मागणी रद्द करण्याचा निवाडा ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया वाणिज्य व उद्योग मंत्री आनंद शर्मा यांनी व्यक्त केली. भारतातील औषध कंपन्यांनीही या निवाड्याचे स्वागत करताना म्हटले की, कॅन्सर रुग्णांसाठी माफक दरात औषध उपलब्ध करणे शक्य होणार आहे. दुसरीकडे नोवार्टिस कंपनीने म्हटले आहे की, यापुढे कंपनी भारतात यापुढे संशोधन व विकास क्षेत्रात गुंतवणूक करणार नाही.

