कॅनव्हास पेंटिंगद्वारे दामोदर सप्ताहाची चित्रकथा

0
23

रोटरॅक्ट क्लब ऑफ वास्को-द-गामा, सम्राट क्लब वास्को-द-गामा आणि रोटरी क्लब ऑफ वास्को पोर्ट टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दामोदर भजनी सप्ताहाप्रीत्यर्थ सप्ताहाची चित्रकथा कॅनव्हास पेंटींगच्या कलेतून साकारली आहे. याचे प्रदर्शन 1930 वास्को या मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर 23 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत लोकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.

यंदा वास्को श्री दामोदर भजनी सप्ताहाला 123 वर्षे पूर्ण होत आहे. यंदाचे हे 124 वे वर्ष असून या काळात 124 वर्षापूर्वी वास्को शहराला महामारीच्या धोक्याचा सामना करावा लागला. तेव्हा श्री दामोदर देवाच्या पवित्र हस्तक्षेपाची कहाणी चित्रकलेच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कलेद्वारे 20 कॅनव्हास पेंटींगच्या मंत्रमुग्ध कलेतून साकारली आहे. ही चित्रकथा चित्रकार अंकिता आनंद मेनकर, आनंद राजाराम पांचाळ, सागर सूर्यकांत डिचोलकर, ओंकार नारायण च्यारी, चेतन नारायण च्यारी, दिलेश रामदास जामसंडेकर, स्मृती गोस्वामी, सिया सिध्देश म्हांबरे, श्रीया सीताराम महालदार, लक्ष्मी शेट्टी, सान्वी नीलेश पालयेकर, उत्कर्ष वेळीप, दर्शन दशरथ शेट्ये, इलोमा फर्नांडिस आदिंनी साकारली आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन सम्राट क्लब वास्कोचे अध्यक्ष चंद्रकांत गवस यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत रोटरॅक्ट बलब ऑफ वास्को द गामाचे अध्यक्ष पल्लवी सरमळकर, रोटरी क्लब ऑफ वास्को पोर्ट टाऊनचे अध्यक्ष कलंदर सय्यद आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाला सुरुवात केली. सदर प्रदर्शनाचे संयोजक रोहन बांदेकर असून या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.