कृषी विधेयकांविरोधात राजभवनवर कॉंग्रेसचा मोर्चा

0
266

>> राष्ट्रपतींना देण्यासाठी दिले राज्यपालांना निवेदन

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काल कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात राजभवनवर मोर्चा नेला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक निवेदन सादर करून केंद्र सरकारने संसदेत संमत केलेली तिन्ही कृषी विधेयके मागे घ्यावीत हे आपले मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवून द्यावे, अशी त्यांच्याकडे मागणी केली.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी संसदेत संमत केलेले ‘जीवनावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक २०२०, ‘शेतकरी उत्पादन, व्यापार व वाणिज्य (उत्तेजन व सुविधा) विधेयक २०२० तसेच शेतकरी (सबलीकरण व संरक्षण) दर आश्‍वासन कृषीसेवा करार विधेयक २०२० ही तिन्ही विधेयके मागे घेण्यात यावीत अशी मागणी करणारे आपले निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसने निवेदनाद्वारे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली.

या कृषी विधेयकांमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असल्याने देशभरातील ६२ कोटी शेतकरी सध्या आंदोलन करीत असल्याचे कॉंग्रेसने आपल्या निवेदनातून स्पष्ट केले. वरील कृषी विधेयकांमुळे देशातील शेतकरी हे भांडवलशहांच्या हातातील बाहुले बनणार असल्याचे मत कॉंग्रेसने राज्यपालांना सादर केलेल्या निवेदनातून केले आहे.
दरम्यान, काल दुपारी चारच्या सुमारास कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दोनापावला येथे राजभवनवर मोर्चा नेला व नंतर राज्यपालांना निवेदन सादर केले.