कूपनलिका खोदलेल्यांना पाणी संवर्धन सक्तीचे करणार ः मुख्यमंत्री

0
10

हवामान विभागाने यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. राज्यात ज्यांनी कूपनलिका (बोअरवेल) खोदल्या आहेत. त्यांना पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याची सक्ती केली जाणार आहे. जलस्त्रोत खात्याकडून यासंबंधी निर्देश जारी केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

नागरिकांनी पाण्याचा वापर सावधगिरीने करण्याची गरज आहे. पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवून ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्यात ज्यांनी कूपनलिका खोदल्या आहेत. त्यांना पावसाच्या पाण्याचे संवर्धन सक्तीचे केले जाणार असून जलस्रोत खात्याकडून संबंधितांना निर्देश जारी केले जाणार आहेत. पावसाच्या पाण्याचे संवर्धन केल्यास पुढील वर्षी पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मोसमी पाऊस मंदावला
राज्यात मोसमी पाऊस मंदावला आहे. राज्यात मागील 14 दिवसांत एकूण 6.38 इंच पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत सुमारे 50.2 टक्के पावसाची तूट नोंद झाली आहे. राज्यातील पाण्याच्या प्रमुख जलस्रोतामधील पाण्याच्या साठ कमी होत चालला आहे.
राज्यात आत्तापर्यंत अंदाजापेक्षा कमी पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत फक्त 10 जूनला सर्वाधिक 0.98 इंच एवढ्या पावसाची नोंद झाली. तर, 12 जूनपासून पावसाचे प्रमाण आणखीन कमी झाले आहे. राज्यात आत्तापर्यंत काणकोण येथे सर्वाधिक 15.44 इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासांत सांगे, केपे, धारबांदोडा येथे काही प्रमाणात पावसाची नोंद झाली आहेत. तर, मुरगाव, काणकोण, साखळी, पणजी, जुने गोवा येथे काही प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पाऊस मंदावल्याने नागरिकांना उष्णतेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पणजी येथे कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 28.7 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे.

धरणांतील पाणीसाठ्यात घट
राज्याला पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साळावली, अंजुणे, पंचवाडी या धरणामधील पाण्याचा साठा कमी होत आहे. अंजुणे धरणामधील पाण्याचा साठा 11 टक्क्यांवर आला आहे. पंचवाडी धरणातील पाण्याचा साठा 20 टक्क्यांवर आला आहे. दक्षिण गोव्याला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साळावली धरणातील पाण्याचा साठा 28 टक्क्यांवर आला आहे. तिलारी धरणातील पाण्याचा साठा 31 टक्क्यांवर आला आहे. तर, आमठणे, चापोली आणि गवाणे धरणात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा आहे.