कुवेतमध्ये इमारतीला आग; 40 भारतीय नागरिक मृत्यूमुखी

0
6

>> एकूण 49 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक जण जखमी

कुवेतच्या मंगाफ येथे काल सकाळी एका उंच इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 49 मजुरांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक 40 भारतीय नागरिकांचा समावेश होता. या घटनेत 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

कुवेतमधील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुवेतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगाफ भागातील 6 मजले उंच इमारतीत काल सकाळी 6 वाजता आग लागली. या इमारतीमधील स्वयंपाक घरातून आगीने पेट घेतला, त्यानंतर ही आग सर्वत्र भडकली. या इमारतीमध्ये 160 जण राहत होते. हे सर्वजण एका कंपनीत काम करत होते. त्यांच्या निवासाची सोय या इमारतीमध्ये करण्यात आली होती. या इमारतीत भारतासह आशियातून आलेल्या मजुरांचे वास्तव्य होते. दुर्दैवाने काल सकाळी लागलेल्या भीषण आगीत 49 मजुरांचा होरपळून मृत्यू झाला. त्यापैकी 40 जण भारतीय नागरिक असल्याचे समोर आले आहे. तसेच 50 मजूर जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार केले जात आहेत.

कुवेतमधील भारतीय दुतावासानेही भारतीय कामगारांशी संबंधित आगीच्या दु:खद घटनेनंतर तत्काळ मदतसेवेसाठी हेल्पलाईन नंबर (96565505246) जारी केला आहे.

कुवेत शहरात लागलेल्या या आगीच्या घटनेवर पराराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही ट्विट करुन शोक व्यक्त केला. कुवेतमधील दुतावास विभागाकडून दुर्घटनेतील नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.

मृतांमध्ये सर्वाधिक भारतीय

या इमारतीत राहणारे बहुसंख्य लोक दक्षिण भारतीय नागरिक आहेत. तसेच या आगीत मृत्यू झालेल्या 49 मजुरांपैकी 40 भारतीय नागरिक होते, अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच कुवैतचे उपपंतप्रधान फहद युसुफ अल सबा यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी पोलिसांना या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले.