कुळे परिसरात 9 दिवसांत 6 जणांचा मृत्य
तांबडीमळ- कुळे येथे काल रविवारी सकाळी दूधसागर नदीवर आंघोळीसाठी गेलेले ओंकार मंजुनाथ दांडीन (17) व सागर बसवराज दांडीन (17) या दोघांचा बुडून मृत्यू झाला. गुले गुडाव बागलकोट – कर्नाटक येथील हे दोघेही 4-5 दिवसांपूर्वी कुळे येथे दाखल झाले होते. कुळे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह मडगाव येथील शवागरात ठेवले आहे. दि. 13 जून रोजी मेटावाडा – कुळे येथे 4 युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. अवघ्या 9 दिवसांत एकूण 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी ओंकार हा आपले नातवाईक सागर डेंडीन व लहान भावासोबत जवळच असलेल्या मैदानावर खेळण्यासाठी जात असल्याचे आईला सांगून गेला होता. पण मैदनावर न जाता तिघेही नदीवर पोहचले. ओंकारच्या लहान भावाने दोघांनाही पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला होता. परंतु ते दोघेही लवकरच कर्नाटकात जाणार असल्याने त्या दोघांनी पाण्यात उतरून आंघोळ करण्याचा निर्णय घेतला. पण नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले त्यावेळी नदीच्या काठावर आसलेल्या ओंकारच्या भावाने वडिलांना फोन करून मदतीसाठी येण्यास सांगितले. त्यावेळी वडिलांनी स्थानिक लोक व पोलिसांना बरोबर घेऊन नदीवर धाव घेतली. दोघांनाही पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्वरित 108 रुग्णवाहिकेतून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांना मृत झाल्याचे घोषित केले. कुळे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला केला आहे. ओंकारचे कुटुंबीय गेल्या काही वर्षापासून
कुळे परिसरात राहतात. तर सागरचे कुटुंबीय बागलकोट येथे राहतात. ओंकार याला शिक्षणासाठी मूळ गावात बागलकोट येथे ठेवण्यात आले होते. ओंकार हा आयटीआय तर सागर हा व्यावसायिक शाखेत शिक्षण घेत होता.
13 रोजी झाला होता
चौघांचा बुडून मृत्यू मेटावाडा – कुळे येथे दि. 13 जून रोजी नदीत बुडून चारजणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच काल दुसऱ्या घटनेत दोघांचा मूत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पर्यटकांना हाकलले
रविवारी दुपारी मेटावाडा येथे वाहने घेऊन आलेले पर्यटक नदीत उतरून आंघोळ करीत असल्याचे दिसून आले. कुळे पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी त्वरित त्या पर्यटकांना हाकलून लावले.
फलकांकडे दुर्लक्ष
दि. 13 रोजी दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर धारबांदोडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी अमितेश शिरवईकर यांनी नदीच्या विविध भागात धोका दर्शविणारे फलक लावले आहेत. पण फलकांकडे दुर्लक्ष करून पर्यटक नदीवर अंघोळ करण्यास अधिक महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नदीवर आंघोळीसाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांच्या सहकार्याने हाकलून लावण्याचे आवाहन स्थानिक लोक करू लागले आहेत.

