उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काल महत्त्वाची सुनावणी झाली. या प्रकरणातील आरोपी आणि भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
कुलदीप सिंह सेंगरला दिल्ली उच्च न्यायालयाने 23 डिसेंबर रोजी जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगित देत जामीन मंजूर केला होता. यानंतर पीडितेसह जनमानसांतून आक्रोश व्यक्त केला जात होता. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केली. न्यायालयाने सेंगरला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने जरी बलात्कार प्रकरणात सेंगरच्या शिक्षेला स्थगिती देत 23 डिसेंबरला सशर्त जामीन मंजूर केला असला, तरी पीडितेच्या वडिलांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात ठोठावलेल्या 10 वर्षांच्या शिक्षेमुळे तो अद्याप तुरुंगातच आहे.