मराठी सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेते कुलदीप पवार यांचे मूत्रपिंडाचा विकार बळावल्यानंतर इस्पितळात उपचार चालू असताना काल निधन झाले. तडफदार नायक, बेरकी खलनायक आणि चरित्र अभिनेता अशा भूमिका ताकदीने साकारणारे अभिनेते असलेल्या कुलदीप पवार यांना शनिवारी मूत्रपिंड विकारामुळे कोकिळाबेन इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचे काल निधन झाले.
कोणीही गॉडफादर नसताना, तसेच अनेक दिग्गज अभिनेते अवतीभवती असतानाही कुलदीप पवारांनी आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले होते. रंगभूमी, टिव्ही किंवा या सर्वच माध्यमांमध्ये त्यांनी प्रभाव पाडला. ग्रामीण भूमिकेएवढ्याच ताकदीने त्यांनी शहरी भूमिकाही साकारल्या. शालेय जीवनापासूनच अभिनयाच्या आवडीपोटी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी मराठी सिनेसृष्टीत नाव कमावले.

