कुडतरीतील अपघातात तरुण दांपत्य ठार

0
13

>> आणखी एका मद्यधुंद कारचालकाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर

सुरावली-कोलवा येथील दोघां पोलिसांच्या अपघाती मृत्यूला २४ तास उलटत नाही, तोच गांधी मार्ग-कुडतरी येथे मद्यधुंद कारचालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन हाकून दुचाकीला धडक दिली, त्यात एक तरुण दांपत्य जागीच ठार झाले. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी कारचालकास अटक केली आहे. गेल्या तीन दिवसांतील हा तिसरा अपघात असून, आतापर्यंत पाच जणांनी प्राण गमावले आहेत.

या भीषण अपघातात कुडतरी येथील केनडी डिकॉस्ता (३३) व त्याची पत्नी लॉमेला डिकॉस्ता (३१) हे तरुण जोडपे ठार झाले. या प्रकरणी कारचालक नाथानियल कार्मो मिनेझिस (२३) याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, मायणा-कुडतरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक मिनेझिस हा सुकळे कुडतरी येथील रहिवासी असून, राय येथे रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी करून दारूच्या नशेत तो कुडतरीला निघाला होता, तर डिकॉस्ता दांपत्य रविवारी संध्याकाळी राय येथे नातेवाईकांच्या घरी एक कार्यक्रम आटोपून घरी परतत होते. ते गांधीमार्ग-कुडतरी येथे पोहचले असता, मागून भरधाव वेगाने येणार्‍या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. तसेच त्यांना ३०० मीटरपर्यंत दुचाकीसह फरफटत नेले. त्यात हे दांपत्य जागीच ठार झाले.