कुंभारजुवेच्या आमदारपुत्राकडून कुडचडेत दमदाटी

0
5

पोलिसांत तक्रार दाखल; ज्येष्ठ वकिलासह कुटुंबाला शिवीगाळ, धमकी, वाहनावर हल्ला आणि पाठलाग

कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांचे पुत्र राहुल फळदेसाई आणि अन्य तिघांनी कुडचडे येथे आपली थार एसयूव्ही भररस्त्यात उभी करून वाहतुकीला अडथळा आणत एका ज्येष्ठ वकिलासह त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ, धमकी, त्यांच्या वाहनावर हल्ला आणि पाठलाग केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी कुडचडे येथील व्यावसायिक तथा ज्येष्ठ वकील ॲड. शांताराम कुडचडकर यांनी कुडचडे पोलीस स्थानकात काल तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी या प्रकरणात अद्याप एफआयआर नोंदवलेला नाही. दरम्यान, कुडचडे येथील घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार 26 सप्टेंबर 2026 रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. या घटनेचा एक व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अमित पालेकर यांनी रविवारी सोशल मीडियावर व्हायरल करून या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली होती. ह्या प्रकारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला
आहे.

पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीनुसार, ॲड. शांताराम कुडचडकर हे आपल्या कुटुंबासह कारमधून प्रवास करत असताना कुडचडे येथील राजाध्यक्ष किराणा दुकानाजवळील पंटेमळ जंक्शनवर संशयित राहुल फळदेसाई याने आपले वाहन रस्त्याच्या मध्येच उभे करून ठेवल्याने वाहतुकीची कोडी झाली. रस्त्यावरील वाहन बराच वेळ बाजूला घेतले जात नसल्याने कार चालविणाऱ्या ॲड. कुडचडकर यांच्या सुनेने हॉर्न वाजवून समोरील कार बाजूला घेऊन आपल्या वाहनाला पुढे जाण्यासाठी रस्ता खुला करण्याची सूचना केली. त्यावेळी राहुल फळदेसाई हा आपल्या कारमधून उतरला आणि त्यांना शिवीगाळ व दमदाटी करायला लागला. त्यानंतर सुध्दा बराच वेळ राहुल फळदेसाई याने आपले वाहन रस्त्यावरून बाजूला न घेतल्याने ॲड. कुडचडकर यांनी आपल्या वाहनातून उतरून राहुलच्या कारजवळ जात वाहन बाजूला घेण्याची विनंती केली. यावेळी आणखी दोन-तीन नागरिक त्या ठिकाणी आल्याने राहुल याने आपली कार रस्त्यावरून हटवून पुढे निघून गेला. पुढे काही अंतरावर जात राहुल हा कुडचडकर यांच्या कार येण्याची वाट पाहत थांबला. त्यावेळी त्याच्या हातात दंडुका होता. कुडचडकर यांची कार रस्त्यावरून जात असताना त्याने दंडुक्याने कारवर हल्ला केला. त्यावेळी चालकाने कार चपळाईने रस्त्याच्या बाजूला नेल्याने कारचे जास्त नुकसान झाले नाही. त्यानंतर राहुल याने आपल्या वाहनाने शिवाजी सर्कल आणि आंबेडकर सर्कलच्या दिशेने कुडचडकर यांच्या कारचा पाठलाग केला. त्याठिकाणी सिग्नलवर अनेक वाहने असल्याने राहुल याने आपल्या वाहनासह पलायन केले, असे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणात एफआयआर नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी ॲड. कुडचडकर यांनी केली आहे.

प्राथमिक चौकशी सुरू : अधीक्षक
कुडचडे येथील घटनेबाबत बीएनएसच्या कलम 173 अन्वये प्राथमिक चौकशी सुरू केली असून, आवश्यक ती कागदोपत्री प्रक्रियाही पुढे नेली जात आहे. तसेच, संबंधित व्यक्तीविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गतही पोलीस कारवाई करत आहेत, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अक्षत आयुष यांनी दिली.