Home बातम्या कुंडई येथील खुनाचे गूढ ४८ तासांत उकलले

कुंडई येथील खुनाचे गूढ ४८ तासांत उकलले

0

मृत युवकाच्या मित्रास अटक

कुंडई येथे ९ सप्टेंबर रोजी झालेल्या युवकाच्या खुनामागील गूढ अवघ्या ४८ तासांत उकलण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास २० ते ३० वर्षांच्या दरम्यानच्या एका अज्ञात युवकाचा मृतदेह कुंडई येथे मडकई औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर आढळून आला होता. तेथील परिस्थितीवरून तो खुनाचा प्रकार असल्याचा संशय बळावला होता. त्यानुसार फोंडा पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा नोंदवला गेला.

फोंड्याचे पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली या युवकाची ओळख पटवण्यासाठी व खुन्याचा शोध घेण्यासाथी पोलीस पथक स्थापन करण्यात आले होते. मृत युवक आसामचा असून त्याचे नाव मिथुन दास ऊर्फ बसाराम दास असे असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. मडकई येथील एन्कोब या कंपनीत तो कामाला होता. पोलिसांनी त्याच्या मित्रांकडून माहिती मिळवली असता बाबू अली ऊर्फ मोहन अली याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत बाबूने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आपण सुरा भोसकून मिथुन याची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आपण व मिथुन हे काही काळापूर्वी कुंडई औद्योगिक वसाहतीत एकाच खोलीत राहात होतो. आपण त्याला दीड हजार रुपये देणे होतो व ते मागण्यासाठी तो आपल्याकडे वारंवार येत होता. त्याने आपल्या आसाममध्ये राहणार्‍या पत्नीलाही पैशांसंदर्भात कॉल केल्याने आपण चिडून गेल्या ऑगस्टपासून त्याचा काटा काढण्याचा बेत आखत होतो अशी कबुली बाबू याने पोलिसांना दिली. ९ रोजी त्याने मिथून याला निर्जनस्थळी नेले व संधी मिळताच त्याला सुर्‍याने भोसकून ठार मारले. खुन्याचा शोध घेणार्‍या पोलीस पथकात निरीक्षक जिवबा दळवी, उपनिरीक्षक एस. एल. हंशीकट्टी, मोहन गावडे, राहुल धामसेकर, सावळो नाईक, सतीश पिल्लई, राजेश नाईक यांचा समावेश होता. बाबू अली हाही आसामचा असून तो कुंडई औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज्‌मध्ये पॅकर म्हणून कामाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.