विदेशी कंपन्या व काही संस्थांशी संगनमत करून निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश काल दिल्लीतील न्यायालयाने दिला. दिल्लीतील वकील देवेंद्रसिंग चौहान यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रथमवर्ग दंडाधिकारी अमित बन्सल यांनी हे आदेश दिले.
बेदी यांनी ‘इंडिया व्हीजन फाऊंडेशन’ च्या नावाखाली ‘मेरी पुलीस’ उपक्रमांतर्गत मोफत संगणक प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विविध राज्यांच्या पोलीस दलांस व निमलष्करी दलांस गंडा घातल्याचा आरोपी सदर वकीलाने केला आहे. मायक्रोसॉफ्टकडून पन्नास लाख रुपयांहून अधिक रूपयांची देणगी मिळवून मोफत प्रशिक्षण देण्याऐवजी बेदी यांनी वेदांत फाऊंडेशनची फसवणूक केली व प्रति प्रशिक्षण केंद्र वीस हजार रुपये गोळा करण्याचा घाट घातला असा आरोपही सदर वकिलाने केला आहे. बेदी यांना विदेशांतून पैसा येत असल्याचेही सदर तक्रारीत म्हटले आहे.