किनाऱ्यावरील बोअरवेलवरून राज्य सरकारवर कडक ताशेर

0
5

सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून कळंगुट व कांदोळी किनारपट्टीवर भर वाळूत काही शॅकमालकांनी बोअरवेल खोदलेल्या असून, सांडपाण्याच्या टाक्याही बांधल्या आहेत ही बाब लक्षात आणून देत काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले. तसेच बेकायदेशीर कामाची पाहणी करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही सरकारला दिले.
कांदोळी किनाऱ्यावर बोअरवेल व सांडपाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या प्रकरणी रेवबेन फ्रांको यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर केली आहे.अशा प्रकारच्या बोअरवेल व सांडपाण्याच्या टांक्यामुळे या किनाऱ्यावर दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य निर्माण होणार असून, पर्यावरणाला हानी पोचणार असल्याचा मुद्दा जनहित याचिकेतून मांडण्यात आलेला आहे. या याचिकेसोबत छायाचित्रेही जोडण्यात आली होती. ती याचिकादाराच्या वकिलांनी खंडपीठासमोर यावेळी ठेवली.
या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले सोबतच अहवाल सादरीकरणात हलगर्जीपणा केल्यास पर्यटन खात्याचे सचिव व मुख्य सचिवांना न्यायालयात हजर करावे, असा इशाराही न्यायालयात हजर असलेल्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.