किनारी भागातील गैरप्रकारांना आळा घाला

0
7

>> मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना निर्देश; गोवा पोलिसांना जलद गस्ती नौका प्रदान

राज्यातील किनारपट्टी भागात देशभरातून आणि अगदी शेजारील देशांतूनही लोक व्यवसाय करत आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि इतर देशांतील लोकही व्यवसायासाठी येत आहेत. परिणामी किनारी भागात चाललेल्या गैरप्रकार आणि गैरकृत्यांना आळा घालून कठोर कारवाईचे निर्देश आपण गोव्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. यापुढे किनारी भागातील दलाल, भिकारी, फेरीवाले आणि गैरकृत्यांत गुंतलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.

वास्को गोवा शिपयार्ड येथे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जलद गस्ती नौका गोवा पोलिसांना सुपूर्द केली. राज्य सरकारने गोवा पोलिसांसाठी नौका खरेदी केली आहे. 5.5 कोटी रुपयांची नौका गोवा शिपयार्डने बांधली असून, आता गोवा पोलिसांकडे किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी एकूण 10 नौका उपलब्ध आहेत. यावेळी 59 लाख 40 हजार रुपयांचे तीन ड्रोन कॅमेरेही गोवा पोलिसांना सुपूर्द करण्यात आले.

यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स, गोवा राज्य मनुष्यबळ विकास मंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, पोलीस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर, निलेश राणे, प्रवीणकुमार वस्त, शेख सलीम, व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

राज्याला आणखी गस्ती नौका उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही केंद्राला पत्र लिहिले आहे. तसेच गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सरकारने तीन ड्रोन खरेदी केले आहेत. त्यात हायस्पीड आणि उच्च तंत्रज्ञान आहे. त्याचा फायदा पोलिसांना होणार आहे. त्यासाठी मनुष्यबळालाही प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोवा पोलिसांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी नौका असणे गरजेचे होते. केंद्रीय स्तरावर आपण या नौकेसाठी बऱ्याचदा पाठपुरावा केला होता. गुन्ह्यांची उकल करण्यात गोवा पोलिस देशात पहिल्या क्रमांकावर आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.