किनारी भागांत काचेच्या बाटल्यांतील मद्यविक्रीवर बंदीचा विचार : मुख्यमंत्री

0
15

गोव्यातील समुद्रकिनारी भागांत काचेच्या बाटल्यांतील मद्याची विक्री करण्यावर बंदी आणता येईल का, याचा आपण अभ्यास करणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्नोतराच्या तासाला आमदार मायकल लोबो यांनी विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील आश्वासन दिले.

गोव्यात येणारे पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर मद्याचे सेवन करुन नंतर बाटल्या किनाऱ्यावर टाकून देत असतात. काही मद्यधुंद पर्यटक बाटल्या फोडून काचा किनाऱ्यावर टाकत असतात, त्या काचा पायांना लागून पर्यटक जखमी होण्याच्या घटना आता किनाऱ्यांवर वारंवार घडत असून त्यावर सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी करताना लोबो यांनी मद्याच्या काचेच्या बाटल्या किनाऱ्यावर नेण्यावर बंदी आणावी, अशी मागणी केली होती. किनाऱ्यांवर उघड्यावर बसून मद्यप्राशन करणाऱ्यांना, तसेच किनाऱ्यांवर प्लास्टिक कचरा टाकणाऱ्यांना दंड ठोठावण्याची मागणीही त्यांयनी केली. त्यावर, मद्याच्या काचेच्या बाटल्या किनाऱ्यांवर नेण्यावर बंदी आणता येईल का याचा पूर्ण अभ्यास करुन निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी किनाऱ्यावर दारु पिऊन बाटल्या व कचरा टाकणाऱ्या पर्यटकांना दंड ठोठवा, तसेच या दंडात वाढ करा, अशी मागणी केली.

मात्र, ही मागणी फेटाळताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे म्हणाले की, पर्यटकांना रोज अशा प्रकारे दंड ठोठावल्यास आम्ही त्यांचा छळ करीत असल्याचा आरोप विरोधी आमदार करतील. शिवाय सर्वत्र चुकीच्या संदेश जाईल, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्हेन्झी व्हिएगस यांनी किनाऱ्यांवर उघड्या ठिकाणी बसून दारु पिण्यावर, किनाऱ्यांवर कचरा टाकण्यावर, काचेच्या बाटल्या फोडण्यावर बंदी असल्याचे फलक सर्वत्र लावा, अशी मागणी केली. त्यावर बोलताना हिंदी व इंग्रजी भाषेतील तसे फलक तयार करुन लावण्याचे आश्वासन रोहन खंवटे यांनी दिले.