राज्यातील भाजप सरकारने आता किनारपट्टीवरील जागा सौंदर्यीकरणाच्या नावाखाली स्थानिकांकडून ताब्यात घेऊन बिगर गोमंतकीय हॉटेलवाल्यांच्या घशात घालण्याचा डाव आखला असल्याचा आरोप काल कॉंग्रेसचे प्रवक्ते व कलंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेतून केला.वरील कारणासाठीच परवा वागातोर किनार्यावरील ५० शॅक्स पाडण्यात आल्याचे ते म्हणाले. ज्यांचे शॅक्स पाडण्यात आले ते सर्व गोमंतकीय असून नोटीस न देताच त्यांचे शॅक्स बळजबरीने पाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तेथील जमीन पीपीपी तत्त्वावर बिगर गोमंतकीय हॉटेल कंपनीला देण्याचा डाव गोवा पर्यटन विकास महामंडळाने आखला आहे. विरोधी पक्ष नेते असताना मनोहर पर्रीकर हे पीपीपीच्या नावाने बोटे मोडत असत. राज्यातील किनार्यांचे खासगीकरण करण्याचा भाजप सरकारचा विचार असावा. तसे झाल्यास राज्यात पर्यटन क्षेत्रात असलेले लोक वार्यावर पडतील. कुणालाही किनार्यावर शॅक्स उभारता येणार नसल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस सरकारचा राज्यातील किनार्यांचे खासगीकरण करण्यास तीव्र विरोध आहे. किनार्यांचे खासगीकरण केल्यास शॅक्सवाल्यांचे कुठे पुनर्वसन करण्यात येणार आहे, ते सरकारने स्पष्ट करावे; सरकारने पर्यटन धोरणही जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

