काश्मीरात नव्या राजकीय पक्षाची स्थापना

0
112

>> पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, कॉंग्रेस, भाजप नेते सहभागी

पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीचे (पीडीपी) नेते तथा माजी वित्त मंत्री अल्ताफ बुखारी यांनी जम्मू काश्मीरमध्ये नव्या राजकीय पर्यायाच्या स्वरूपात जम्मू अँड काश्मीर अपनी पार्टी (जेकेएपी) या नव्या पक्षाची स्थापना केली असून जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

कृषी पदवीधर असलेल्या ६० वर्षीय बुखारी यांनी काल आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत नव्या पक्षाची घोषणा केली. यावेळी त्यांच्या समवेत नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी कॉंग्रेस तसेच स्थानिक भाजपचे अनेक माजी आमदार व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. बुखारी हे काही काळापूर्वी बरखास्त करण्यात आलेल्या पीडीपी-भाजप सरकारात वित्त मंत्री होते. त्याआधी बुखारी यांची नव्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. ‘ ५ ऑगस्ट २०१९ रोजी जी राजकीय घटना घडली त्यामुळे काही नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. तसेच वस्तुस्थितीही उजेडात आली आहे’ असे बुखारी यावेळी म्हणाले. तसेच स्वतंत्र भारत अस्तित्वात आल्यानंतर जम्मू काश्मीरची संघ प्रदेश म्हणून पदावनती झाल्यामुळे अकल्पनीय अशी स्थिती निर्माण झाली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जी कटू घटना घडली त्यामुळे या प्रदेशाचा राज्याचा दर्जा हिरावला गेला. यामुळे या प्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानावर आघात झाला आहे. आत्मसन्मान व आत्मविश्‍वासाला तडा गेला आहे अशी भावना तेथील तमाम नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे असे बुखारी यांनी सांगितले. या सर्व पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीरात आक्रमक असंतोषाचे वातावरण एका बाजूने व दुसरीकडे पूर्ण वेगळेपणाच्या वृत्तीची विचित्र स्थिती सुध्दा उद्भवली आहे. या गोष्टींकडे कानाडोळा करता येणार नाही. या सर्व प्रकाराची दखल घ्यावीच लागेल असे बुखारी म्हणाले. यामुळेच एक नवा राजकीय पर्याय या प्रदेशात निर्माण होणे गरजेचे बनले. म्हणूनच नवा राजकीय पक्ष स्थापन करणे आवश्यक ठरले. नागरिकांच्या मनातील योग्य आकांक्षांना प्रतिसाद देणे क्रमप्राप्त आहे. मात्र आम्ही कोणाला कोणतीही स्वप्ने दाखवू पाहत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या कृतीमागे प्रामाणिक व चांगला हेतू आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. ३७० कलम रद्द करण्याच्या घटनेवर भाष्य करताना त्यांनी हा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्याने आपण त्याची वाट पहावी हेच योग्य ठरेल असे त्यांनी सांगितले. तथापि राज्याचा दर्जा पुन्हा मिळवणे, जमीन व नोकर्‍यांमध्ये स्थानिकांचे हक्क, सर्व धर्मियांचा समान विकास याबाबी आमच्या पक्षासाठी प्राधान्याच्या असतील असे त्यांनी स्पष्ट केले.