काशी विश्‍वनाथ कोरिडोर

0
15
  • दत्ता भि. नाईक

कोरिडोरचे बांधकाम ही काही साधी गोष्ट नव्हती. छोट्या-छोट्या देवळा-राऊळांनी व दुकानांच्या गर्दीने संपूर्ण परिसर व्यापलेला होता. या सर्वांना हटवण्याचे काम वाटते तितके सोपे नव्हते. त्यात अनेकांचे हितसंबंध गुंतले होते.

फाल्गुन शु. द्वितीया, युगाब्ध ५१२० म्हणजेच शुक्रवार दि. ८ मार्च २०१९ रोजी शुभयोगावर सुरू केलेल्या काशी विश्‍वनाथ मंदिरापासून गंगा नदीच्या किनार्‍यावरील घाटापर्यंतचा मार्ग अर्थात ‘कोरिडोर’ बनवण्याच्या कामाची यंदा मार्गशीर्ष, शु. दशमी, युगाब्ध ५१२३, सोमवार दि. १३ डिसेंबर २०२१ रोजी पूर्तता झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कोरिडोरचे यथासांग धार्मिक विधींच्या आधारे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी स्वतः गंगेत डुबकी मारून व सर्व धार्मिक संकेत पाळून श्रद्धाळू लोकांची मने जिंकली. कोरिडोरचे बांधकाम ही काही साधी गोष्ट नव्हती. छोट्या-छोट्या देवळा-राऊळांनी व दुकानांच्या गर्दीने संपूर्ण परिसर व्यापलेला होता. या सर्वांना हटवण्याचे काम वाटते तितके सोपे नव्हते. त्यात अनेकांचे हितसंबंध गुंतले होते.

गांधीजींची व्यथा
१९१६ साली गांधीजींनी काशीनगरीला भेट दिली होती. मंदिराकडे जाणारा अरुंद रस्ता, त्यातही तो निसरडा. तिथे माश्या घोंघावत होत्या. भवताली धार्मिक वातावरणाचा अभावच त्यांना दिसून आला. दुकानदार, यात्रेकरू, मिठाई व खेळणी विकणारे यांचा चालू असलेला गोंगाट व मंदिर व्यवस्थापनाचे या सर्व प्रकाराकडे चाललेले दुर्लक्ष याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली होती. उघडी गटारे, सर्वत्र पसरलेले शेण, त्याच गलिच्छ वातावरणात दर्शनासाठी लागलेली रांग पाहून ते उद्विग्न झाले होते. बनारस हिंदू विश्‍वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना त्यांनी ही व्यथा मांडली होती. आपल्या मंदिराकडे जाणारे गल्लीबोळ का म्हणून गलिच्छ असावे? मंदिरांच्या माध्यमातून तरी आपण जनतेला स्वच्छतेचे धडे द्यावे, असेही मत त्यांनी व्यक्त केले होते. या घटनेला शंभर वर्षे होऊन गेली तरी परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती चिघळतच चालली होती.

गंगेच्या किनार्‍यावरील मणिकर्णिका घाटावर सतत दहनक्रिया चालू असते. येथील दाहसंस्कार बंद होत नाही. प्रेतांची गर्दी वाढली की अर्धवट जळलेले मृतदेह गंगेच्या पाण्यात सोडले जातात. काशी शहराचे सांडपाण्याचे गटारही गंगेलाच जोडलेले आहे. सर्वांत शुद्ध व न नासणारे पाणी म्हणून विश्‍वविख्यात असलेले गंगेचे पाणी या प्रकारांमुळे प्रदूषित होत चाललेले होते. यावर उपाय काढण्याची आवश्यकता होती. नदीच्या किनार्‍यावर बेकायदा बांधकामे प्रचंड प्रमाणात वाढली होती. त्यांना तिथून हलवणे अत्यावश्यक होते.

विघ्नसंतोषींकडून विरोध
काशी म्हणजे वाराणसी. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. २०१७ साली उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. गांधीजींनी व्यक्त केलेल्या चिंतायुक्त विचारांना १०२ वर्षे पूर्ण झाली तेव्हा २०१९ रोजी ‘श्री काशी विश्‍वनाथ स्पेशल एरिया डेव्हलप्मेंट बोर्डा’ची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या विकासाचा मास्टर प्लॅन बनवून सुमारे सव्वाआठ हेक्टर परिसराच्या विकासाची योजना बनवण्यात आली. एच.सी.पी. डिझाइन प्लॅनिंग ऍण्ड मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या कंपनीने सभोवतालची स्वच्छता व कोरिडोरचे बांधकाम याचे दायित्व स्वीकारले. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर बिमल पटेल यांनी सातशे पन्नास कोटी रुपयांमध्ये हे काम पूर्ण केले. त्यांपैकी चारशे साठ कोटी रुपये केवळ बांधकामासाठी व दोनशे नव्वद कोटी रुपये सभोवतालची घरे व इमारती ताब्यात घेण्यासाठी खर्च करण्यात आले.

काम सुरू करणार हे लक्षात येताच स्थानिक लोक- ज्यांना त्यांनी व्यापलेल्या जागा खाली कराव्या लागणार व दुकानांचे पुनर्वसन करावे लागणार अशांना- चिथावणी देऊन या उपक्रमाला विरोध करण्याचे कारस्थान रचले गेले. ज्यांचा हितसंबंध या प्रकरणात कुठेही गुंतलेला नव्हता अशा विघ्नसंतोषी व स्वतःला पर्यावरणवादी म्हणवून घेणार्‍या मंडळींनी ‘धरोहर बचाओ समिती- काशी’ या नावाखाली आंदोलन केले. यावरही कहर म्हणजे बद्रिकेदारच्या ज्योतिपीठ स्वामी शंकराचार्य मठाचे होऊ घातलेले जगद्गुरू स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी उत्तर प्रदेशचे राज्यसरकार परंपरागत अस्तित्व असलेले बांधकाम तोडत असल्याचा आरोप केला. ज्या मंडन मिश्रांच्या दारातील पोपट व मैना वेदातील ऋचा म्हणत होते त्या मंडनमिश्रांचे निवासस्थान या उपक्रमामुळे नष्ट केले जाणार आहे यासारखे आरोप केले होते. त्यांना या विषयात कोणताही अधिकार नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. स्थानिक मंदिरांचे पुजारी व दुकानदार यांच्याशी संपर्क साधून त्यांचे सांस्कृतिक स्थान व व्यावसायिक हितसंबंध नीटपणे जपले जातील असे सांगून त्यांना विश्‍वासात घेतले. कोरिडोरच्या निर्मितीमुळे त्यांना होणारा लाभ लक्षात आणून दिल्यामुळे त्यांचा विरोध मावळला व सर्वांच्या सहकार्याने कामाला सुरुवात झाली व ते यथायोग्यपणे पूर्णही झाले.

प्राचीनता व नावीन्याचा मिलाफ
काशी विश्‍वनाथाचे शिवलिंग हे देशभर पसरलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्यातही काशी ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. उपलब्ध माहितीनुसार अकराव्या शतकात हरिश्‍चंद्र नावाच्या राजाने विश्‍वनाथाचे मंदिर बांधले. या देवाचा इतका प्रभाव आहे की शिवछत्रपतींनी रायगडावरही छोटेखानी विश्‍वेश्‍वर मंदिर बांधलेले आहे. महंमद घोरीच्या राजवटीत त्यावर गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याने हे मंदिर ११९४ मध्ये उद्ध्वस्त केले. त्यानंतर तेराव्या शतकात एका गुजराती व्यापार्‍याने याठिकाणी मंदिराची पुनर्बांधणी केली. १३५१ मध्ये फिरोजशाह तुघलकने मंदिर पाडले. त्यानंतर तोडरमल याने १५८५ साली नवीन मंदिर उभारले. १६६९ साली औरंगजेबाच्या आदेशावरून हे मंदिर पुनः पाडले गेले व त्याच्या अर्ध्या भागावर मशीद बांधली, तिला ग्यानवापी मशीद असे म्हणतात. सध्याच्या शिवलिंगाच्या दिशेने पाठ केलेला नंदी आजही आहे, यावरून शिवलिंग कुठे होते हे लक्षात येते. १७८० साली अर्ध्या उपलब्ध असलेल्या मंदिरावर विश्‍वनाथाचे मंदिर बांधून काढले. १८३६ साली राजा रणजित सिंह यांनी मंदिराच्या कळसासाठी सोने दान स्वरूपात दिले. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांचे योगदान लक्षात घेऊन या परिसरात त्यांचा पुतळा उभारण्याचे कामही याच उपक्रमाच्या अंतर्गत पूर्ण करण्यात आले.

मंदिर परिसरात भक्त मंडळी गर्दी करतात, परंतु स्वच्छतेच्या बाबतीत अक्षम्य अनास्था दिसून येते. यानिमित्ताने आता हा आदर्श हिंदूंच्या सर्व तीर्थक्षेत्रांसमोर ठेवता येईल. या विस्ताराच्या कार्यात ज्यांची घरे वा दुकाने पाडण्यात आली ते सर्वजण हिंदू होते, त्यामुळे सेक्युलरवाद्यांना कंठशोष करायला जागाच राहिली नाही. पंतप्रधान मोदींनी या कामात सहभागी असलेल्या सर्व कामगारांवर पुष्पवृष्टी केली. त्यांच्यासमवेत भोजनही घेतले.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काशीमध्ये जो प्रवेश करतो तो माणूस सर्व बंधनांतून मुक्त होतो. येथील अलौकिक ऊर्जा येणार्‍याच्या अंतरात्म्याला जागृत करते. आज चिरचैतन्य काशीनगरीतील चैतन्याची वेगळीच स्पंदने जाणवत आहेत. येथील तेजाला एक वेगळीच झळाळी चढली आहे. येथील अनेक प्राचीन छोटी-मोठी मंदिरे अतिक्रमणामुळे लुप्त झाली होती, तीही आता पुनर्स्थापित झालेली आहेत. विश्‍वनाथ धाम हे एक केवळ मंदिर नसून ते प्राचीन भारतीय संस्कृतीचे व आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. हे देशाच्या गतिशीलतेचे प्रतिमान आहे. भाषणात ते पुढे म्हणाले की, जेव्हा जो कोणी या ठिकाणी येईल त्याला श्रद्धेचेच नव्हे तर भूतकाळाच्या गौरवाचेही दर्शन होईल. इथे प्राचीनता व नावीन्य एकाचवेळी सजीव झाली आहेत. त्यांनी अहिल्याबाई होळकर महाराणीबरोबरच इतरजण ज्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य केले त्यांचाही आवर्जून उल्लेख केला. गुरुनानक देव काशीला भेट देऊन गेले होते. महाराजा रणजिंत सिंह यांनी मंदिराला सुवर्ण दानात दिले होते. बंगालच्या राणी भवानीने आपल्याजवळ असलेले सर्वकाही काशीच्या विकासासाठी अर्पण केले होते. हे उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्‍चिम यांचे मीलनस्थल आहे, याचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

काशी विश्‍वनाथाचे संपूर्ण देशाशी धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक नाते असल्यामुळे देशाच्या पुनरुत्थानाचा मार्ग प्रशस्त करणारी काशी ही घटना ठरो अशी आपण अपेक्षा बाळगूया.