काळा पैसावाल्या भारतीयांच्या नव्या यादीची चौकशी होणार

0
117

केंद्रीय वित्तमंत्री जेटली यांची माहिती
स्वीस बँकांमध्ये खाती असलेल्या भारतीयांची आणखी एक नवी यादी उघड झाली असून त्यांची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती काल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकारांना दिली. त्याचवेळी याआधी उघड झालेल्या ६० स्वीस बँक खातेदार भारतीयांची चौकशी याआधीच सुरू झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.पत्रकारांच्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेने नुकतीच एक हजारहून अधिक भारतीय स्वीस बँक खातेदारांची यादी जाहीर केल्याच्या पार्श्‍वभूमीवर जेटली यांनी ही माहिती दिली. या यादीत अनेक कंपन्या, उद्योगपती, राजकीय नेते यांच्या नावाचा समावेश आहे.
स्वीस बँकांमध्ये खाते असलेल्यांच्या ६० जणांच्या आधीच्या यादीतील सर्व प्रकरणांची कायदेशीर चौकशी प्राप्ती कर खात्यातर्फे चौकशी चालू असल्याचे जेटली म्हणाले. सोमवारी जाहीर झालेल्या नावांपैकी बहुतेकांची माहिती सरकारला आहे. तर नव्या यादीत काही नवी नावेही आहेत. गेल्या ६-७ महिन्यात काळा पैसा हुडकण्यासाठी आपल्या सरकारने जोरदार प्रयत्न केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जाहीर झालेल्या नावांपैकी अनेकांची खाती वैध असू शकतात. गेल्या महिन्यात आपण डावोस येथे स्वीत्झर्लंडच्या वित्त मंत्र्यांसह संबंधित अधिकार्‍यांची या संदर्भात भेट घेतली. याआधी भारताला स्वीत्झर्लंडकडून अधिकृतपणे ६२८ भारतीय खातेदारांची यादी मिळाली होती. त्यापैकी ६० बेकायदेशीर खातेदारांची चौकशी सुरू झाली आहे तर ३५० जणांवर दंडात्मक कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असे जेटली यांनी सांगितले. उर्वरित खात्यांची तपासणी ३१ मार्च २०१५ पर्यंत पूर्ण होईल आणि कायदा भंग करणार्‍यांवर योग्य कारवाई होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.