Home बातम्या काळा दिवस

काळा दिवस

0

श्रावणी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा दिवस हा खरे तर प्रत्येक मराठी माणसाच्या घरातला सण. गोडधोडाने तो साजरा होतो, पण काल या दिवसाची सुरूवातच दोन काळ्याकुट्ट कटू घटनांनी झाली आणि सर्वत्र दुःखाची गडद छाया व्यापून राहिली. ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांचे पहाटे झालेले निधन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात भल्या सकाळी गोळ्या झाडून झालेली हत्या या दोन्ही घटना मराठी मनाला विषण्ण करून गेल्या आहेत. खरे तर या दोन्ही व्यक्ती म्हणजे विचारांची दोन टोके. एक निःस्सीम ईश्वरभक्त, जीवनामध्ये आवश्यक असलेले अध्यात्माचे स्थान सदैव आपल्या लेखणी आणि वाणीतून अधोरेखित करणारे धर्मशास्त्राचे अभ्यासक, तर दुसरे अंधश्रद्धांविरुद्ध लढण्यात आपली हयात वेचणारे आणि तसा कायदा यावा यासाठी धडपडणारे पुरोगामी. परंतु या दोन्हींमध्येही एक समान सूत्र होते, ते म्हणजे ही दोन्हीही अत्यंत सुसंस्कृत, विवेकवादी, विज्ञाननिष्ठ व्यक्तिमत्त्वे होती. विचारांचा प्रतिवाद केवळ विचारांनीच व्हायला हवा या दोघांच्याही दृढ धारणा होत्या.

त्यामुळे दाभोलकरांच्या विचारांबाबत कोणाचे कितीही मतभेद असोत, त्यांच्यावर ज्या प्रकारे गोळ्या झाडून भ्याडपणे हत्या झाली, ती अत्यंत निषेधार्ह घटना आहे. या साध्या, सरळमार्गी माणसावर गोळ्या झाडून त्या व्यक्तीला भले संपवता आले असेल, परंतु तिच्या विचारांचे महत्त्व त्यातून अधिक उजळून निघणार आहे हे हल्लेखोर माथेफिरूंना माहीत नसावे. ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर आणि नरेंद्र दाभोलकर या दोघांचेही कार्य दोन टोकांचे जरी असले तरी महत्त्वाचे होते. साळगावकरांनी धर्ममार्तंडांच्या हातच्या पंचांगाचे सुलभीकरण करून आणि त्याचा दिनदर्शिकेशी सुरेख मेळ घालून ‘कालनिर्णय’ च्या माध्यमातून ते घरोघरी पोहोचवले. ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ ही सामाजिक गरजच बनून गेली. ७३ सालापासून प्रसिद्ध होणारे ‘कालनिर्णय’ आज देशातील नऊ भाषांमधून प्रसिद्ध होते आणि त्याच्या केवळ मराठी आवृत्तीचाच खप पन्नास लाखांवर आहे. त्याची आवृत्ती आज अमेरिकेतही विकली जाते. साळगावकरांनी धर्मशास्त्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक आशय आपल्या सहज, सोप्या, ओघवत्या शैलीमध्ये लेखनातून आणि वाणीतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. त्यांचे आध्यात्मिक प्रबोधन केले. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर तो आपल्या आत्मिक उन्नतीचा महामार्ग आहे यावर त्यांची दृढ श्रद्धा होती. साळगावकरांनी लाखो गणेशभक्तांची संघटना बांधली. श्रीगणेश महानिधी, महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळ अशा संस्थांद्वारे सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक भान प्राप्त करून दिले. आपले परमदैवत असलेल्या श्रीगणेशावर लिहिण्या – बोलण्यात त्यांना विशेष आनंद वाटे. गणपतीवर लिहिलेल्या लेखांचे ते मानधनही घेत नसत, एवढी त्यांची निःस्सीम गणेशभक्ती होती. आपल्या मायभूमीत – मालवणातील मेढ्यात त्यांनी सुवर्णगणेशाचे सुरेख छोटेखानी जय गणेश मंदिरच उभारलेले आहे. धार्मिक असणे म्हणजे प्रतिगामी असणे नव्हे याचा वस्तुपाठच जयंतरावांनी घालून दिला होता. नरेंद्र दाभोलकर हे तर पक्के विज्ञानवादी. त्यांचा मार्ग वेगळा. एकेकाळी श्याम मानव यांच्यासोबत काम करणार्‍या दाभोलकरांनी स्वतंत्र संघटना स्थापन करून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम पुढे नेले आणि विरोधाची तमा न बाळगता ते आपले जीवितध्येय बनविले. दुर्दैवाने त्यांचे विचार आज एकविसाव्या शतकातही समाजाच्या पचनी पडत नाहीत. त्यांच्या पुढाकारातून आलेले अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक गेली अठरा वर्षे महाराष्ट्रात रखडलेले आहे. ‘साधना’ चे संपादक म्हणून साने गुरूजींच्या त्या नियतकालिकाची प्रतिष्ठा वर्धिष्णू ठेवण्यातही दाभोलकर यांच्या नावाचा मोठा वाटा होता. पुरोगामी चळवळीचे तर ते आधारस्तंभच होते. आज सर्वत्र होत असलेला सामाजिक विवेकाचा र्‍हास हा त्यांच्या चिंतेचा विषय होता. समाजाला ‘तिमिरातुनि तेजाकडे’ नेण्याची आस बाळगून आयुष्य वेचणार्‍या दाभोलकरांची अशी हत्या घडवणारे कोण आहेत याचा शोध घेऊन त्यांचा चेहरा समाजासमोर आणण्याची आज आवश्यकता आहे. साळगावकर आणि दाभोलकर या दोन्ही व्यक्ती आता आपल्यात नाहीत. परंतु दोघांनीही लावलेला विचारांचा दिवा तेजाळत राहणार आहे. मने उजळत राहणार आहे. माणसे जातात, पण त्यांचे विचार मागे उरतात. विचार जर सच्चे असतील तर कळीकाळही ते पुसून टाकू शकत नाही!