काळजी घ्या

0
45

गोमंतकाचा प्रिय उत्सव गणेशोत्सव आता दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोना महामारीचे सावट असले तरीही गतवर्षीप्रमाणेच यंदाही जमेल त्या परीने त्याच्या स्वागताची तयारी प्रत्येक गोमंतकीयाने केलेली दिसते. कोरोना महामारी गेल्या वर्षीही होती आणि यंदाही आहे. परंतु तरीही उत्सवाचा उत्साह टिकवून ठेवून भक्तिभावाने गणरायाच्या स्वागतासाठी गोमंतकीय जनता सज्ज झालेली आहे. मात्र, कोरोना आपल्या आजूबाजूला दबा धरून अजूनही बसलेला आहे हे भान राखणे अतिशय महत्त्वाचे असेल.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मध्यंतरी येऊन गेलेल्या अत्यंत भयावह स्वरूपाच्या दुसर्‍या लाटेच्या तुलनेत कमी जरी दिसत असली, सक्रिय रुग्णसंख्याही हजाराच्या खाली असली, तरीही रोजच्या आकडेवारीतून मिळणारे काही संकेत हे तसे चिंतित करणारेच आहेत. पहिली लक्षवेधी बाब म्हणजे नव्या रुग्णांची संख्या जरी तुलनेने कमी दिसत असली, तरी इस्पितळात दाखल करावे लागण्याचे प्रमाण सध्या खूपच अधिक दिसते. कोरोना विषाणूच्या नेमक्या कोणत्या व्हेरियंटचा फैलाव गोव्यात सध्या होतो आहे हे काही सरकार सांगायला तयार नाही. किंबहुना पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये जिनॉम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणारे नमुने तपासून अहवाल यायलाच जवळजवळ दोन महिने लागत आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग संसर्गजन्यता रोखण्यासाठी करणे जवळजवळ दुरापास्त आहे. चीनच्या वुहानमध्ये आढळलेल्या मूळ कोरोना विषाणूपेक्षा डेल्टा आणि डेल्टा प्लस हे व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचे सिद्ध झाले आहे आणि जगभरातून त्याचे दाखले मिळत आहेत. ह्याशिवाय अलीकडे दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमध्ये कोरोना विषाणूची आणखी नवी रूपे आढळली आहेत, ज्यांच्यापुढे कोरोनावरील लशीही कुचकामी ठरू लागल्या आहेत. त्यामुळे गोव्यामध्ये सध्या जो संसर्ग होतो आहे तो नेमक्या कोणकोणत्या विषाणूंचा हे जोवर कळणार नाही, तोवर त्याचे गांभीर्यही लक्षात येणार नाही. वर नमूद केल्याप्रमाणे इस्पितळात दाखल होणार्‍या रुग्णांचे प्रमाण तर मोठे आहेच, शिवाय ते बरे होण्याचा कालावधीही पूर्वीच्या तुलनेत अधिक दिसतो. रोज इस्पितळात दाखल करावे लागणारे नवे रुग्ण आणि इस्पितळातून घरी पाठवले जाणारे रुग्ण यांचे प्रमाण जर पाहिले तर सातत्याने हा कल दिसून येतो. ह्याचाच अर्थ ह्या बाधितांवरील उपचारांसाठी डॉक्टरांना अधिक शिकस्त करावी लागत आहे.
दुसरी एक ठळक बाब सध्याच्या परिस्थितीत दिसून येते ती म्हणजे ग्रामीण गोव्यामध्ये कोरोनाचा फैलाव वाढला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्या ही मुख्यत्वे शहरी भागांमध्ये केंद्रित होती. मडगाव, वास्को, फोंडा, पणजी, म्हापसा अशा शहरांमधून सर्वाधिक रुग्णसंख्या दिसायची. ह्यावेळी ती ग्रामीण भागांमध्ये अधिक दिसते आणि येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे अतिशच चिंताजनक आहे, कारण चतुर्थीकाळात गोमंतकीय एकमेकांच्या घरी जाणार येणार असल्याने हा संसर्ग कितीतरी पटींनी वाढू शकतो आणि बघता बघता नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. गणेशोत्सवासंदर्भात सरकारने एसओपी जारी करताना पुरोहितांना घरोघरी जाण्यास मज्जाव करणारे अजब पाऊल उचलले होते. सुदैवाने सरकार लागलीच भानावर आले आणि ही चूक सुधारली गेली. कोरोना संसर्गाचे खापर केवळ पुरोहितवर्गावर का म्हणून? राजकीय पक्षांचे धान्यवाटप घरोघरी सुरू आहे, प्रचार, बैठका, सभा सगळे यथास्थित सुरू आहे, मग फक्त पुरोहितांना मज्जाव करणे गैर होते. भारतीय जनता पक्षाने नुकताच चतुर्थीनंतर घरोघरी कोरोनाविषयक सर्वेक्षण करण्याचा मनोदय जाहीर केला आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही दिले आहे. हा निव्वळ येत्या निवडणुकीचा फंडा आहे. हे प्रयत्न कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवेळी झाले असते तर कित्येकांचे जीव वाचू शकले असते. आता निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने जनसेवेचे उमाळे विविध राजकीय पक्षांना येणे स्वाभाविक आहे. परंतु कोरोनाची खरी चिंता असेल तर आधी आपल्या सभा आणि बैठकांमधून होणारी कार्यकर्त्यांची गर्दी रोखा. कोरोनाचा प्रसार त्यातून अधिक होण्याची शक्यता आहे. मुळात नेत्यांनी आपल्याभोवती गर्दी गोळा करून हिंडणेफिरणे आधी बंद करावे. गोव्याच्या ग्रामीण भागातून हळूहळू डोके वर काढू लागलेल्या कोरोनाचे आगडोंबात रुपांतर होऊ द्यायचे नसेल तर आधी हे करावे लागेल. गणेशोत्सवाच्या काळात सरकारने आणि त्याहीपेक्षा जनतेने पुरेशी काळजी घेतली, तरच आपण ह्या महामारीच्या फैलावाला आणि त्यातून येणार्‍या तिसर्‍या लाटेला रोखू शकू.