कालाय तस्मै नमः

0
5

शरत्चंद्र देशप्रभू

1970 साली आम्ही पदवी परीक्षा पास झालो अन्‌‍ सुशीला बिल्डिंगमध्ये कार्यरत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पणजी केंद्रात प्रवेश मिळाला. निवांत क्षणी पदव्युत्तर केंद्रातील ती दोन शैक्षणिक वर्षे प्रकर्षाने आठवतात. आता इथला परिसर पूर्णपणे बदलला आहे.

बालपणीच्या हळुवार आठवणींव्यतिरिक्त हुरहुरीने दाटलेल्या गतस्मृती म्हणजे शैक्षणिक व्यक्तिगत पर्वातील. निवांत क्षणी पदव्युत्तर केंद्रातील दोन शैक्षणिक वर्षे प्रकर्षाने आठवतात. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना पर्याय होता पुढचे शिक्षण किंवा नोकरी-व्यवसायाचा खटाटोप. गोव्यातील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचे पणजीत पदव्युत्तर केंद्र स्थापन झाल्यामुळे राज्यातच पदव्युत्तर अभ्यासाची सोय उपलब्ध झाली. 1970 साली आम्ही पदवी परीक्षा पास झालो अन्‌‍ सुशीला बिल्डिंगमध्ये कार्यरत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पणजी केंद्रात प्रवेश मिळाला. अर्थशास्त्र हा विषय निवडणे साहजिकच, कारण पदवी परीक्षेला तोच विषय प्रमुख होता. हे पदव्युत्तर केंद्र आमच्यासाठी सर्वार्थाने उपयुक्त.

सुशीला बिल्डिंग मला वाटते पणजीतील नाईक कुटुंबाची. या सुंदर, सुबक अन्‌‍ नव्याकोऱ्या इमारतीतला पहिला मजला भाडे तत्त्वावर केंद्राने पूर्णपणे व्यापलेला. मागची विस्तीर्ण जागा वाचनालयासाठी आरक्षित. या मजल्यावर समोरासमोर उभारलेली विविध दालने होती. विस्तृृत दालनांत वर्ग भरायचे, तर छोट्या दालनांत प्रोफेसर मंडळीची सोय केली होती. विविध रंगांनी नटलेली ती सुबक आणि भक्कम दारे अजूनही आठवतात. केंद्राच्या संचालकांना तसेच कर्मचारीवर्गाला विशेष दालने होती. दालनांच्या गर्दीमधून जाणारी सरळ पॅसेज अन्‌‍ एका वळणावर नव्वद अंशाच्या कोनात मोडणारी पॅसेज लाजबाबच! शिवाय आधुनिक स्वच्छतागृहांची सोय केली होती. आम्ही राहत असलेल्या घरापासून हे केंद्र दहा मिनिटांच्या अंतरावर. आता हे चॅपेलजवळ असलेले घर जमीनदोस्त झाले आहे. इथून आजच्या ‘सम्राट-अशोक’ थिएटरांच्या रस्त्यावरून हमरस्त्यावर जायचे. अठरा जून रस्ता. त्याकाळी ‘सम्राट-अशोक’ ही थिएटरे अस्तित्वात नसावी. मला वाटते झांट्ये उद्योग समूहाच्या या थिएटर्सचे बांधकाम ‘अल्कॉन कन्स्ट्रक्शन’ या कंपनीने 1980-81 दरम्यान सुरू केले असावे.
व्हास्को कार्व्हालो यांच्या अजून अस्तित्वात असलेल्या घराच्या समोरच बाजूला छोटीमोठी कौलारू घरे होती. इथेच त्याजागी पणजीची आलिशान सिने थिएटर्स उभी आहेत. दुसरा मार्ग म्हणजे आजच्या ‘माथाईस प्लाझा’ अन्‌‍ ‘आकाशदीप’ या भव्य इमारतींच्या मधून जाणारा. त्याकाळी या दोन इमारती नव्हत्या; परंतु एका बाजूला कामत कुटुंबीयांचा पुराना वाडा होता. या जुन्या वाड्यात जनार्दन कामत गणित या विषयावर शिकवण्या घेत. याच घरात पदव्युत्तर केंद्राचे कर्मचारी सुरेश कामत राहत. पदव्युत्तर केंद्राच्या डाव्या बाजूला डॉ. धुमे यांचे निवासस्थान, तर विरुद्ध दिशेला श्रीरंग कामत तारकर यांचे घर. श्रीरंग तारकरांच्या ‘हनुमान सोडा’नजीकच केरोसीनचे घाऊक तसेच किरकोळ विक्री करण्याचे दुकान होते. पणजीत त्याकाळी दिवाबत्तीसाठी तसेच स्वयंपाकघरातील स्टोव्ह व नंतर आलेल्या ‘फुगांव’साठी केरोसीनचा सर्रास वापर व्हायचा. स्वयंपाकातील शेगड्यांसाठी तसेच आंघोळीच्या बंबासाठी खटखटे यांच्या दुकानातून मिळणाऱ्या दर्जेदार कोळशाचा वापर पण होत असे. जुन्या पणजी मार्केटमध्ये भोसुले बंधुद्वयांच्या दुकानात पण चांगल्या प्रतीचा कोळसा उपलब्ध केला जात असे. आज केरोसीन पणजीतच कशाला, गोव्याच्या अन्य भागांतही दुर्मीळ झालं आहे.

सुशीला बिल्डिंग पणजीत मध्यवर्ती जागेत असल्यामुळे शिक्षण-व्यवसायाव्यतिरिक्त तिच्या जागेत विविध व्यापारी आस्थापने पण कार्यरत होती. पदव्युत्तर अभ्यासक्रमात अर्थशास्त्र निवडल्यामुळे आमचा संपर्क या क्षेत्रातील प्रोफेसर अन्‌‍ व्याख्याते यांच्याशी जास्त प्रमाणात असे. केंद्राचे संचालक द. भ. वाघ यांची तशी भेट दुर्मीळ. आडनाव वाघ असले तरी हे गृहस्थ मृदू स्वभावाचे. आपण अन्‌‍ आपले काम; ते पण चोख! प्रसिद्धीच्या मागे कधी लागले नाहीत. चौगुले कॉलेजात प्राचार्य असताना यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचे ऐकून होतो. अर्थशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. डॉ. कामत हेळेकर हे आपल्या विषयावर फार मेहनत घेत. केंद्रात यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकावर असावे. शिवाय रा. का. बर्वे, फिलिप, पडोशी, बखले हे व्याख्याते पण आपापल्या विषयात पारंगत होते. प्रा. बखले यांनी तर मजूरविषयक अर्थशास्त्राचा विषय आपल्या अनोख्या शैलीत शिकवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावण्यात भरीव योगदान दिल्याचे स्मरते. या प्राध्यापकांचे मार्गदर्शन आम्हाला धेंपे कॉलेजमध्ये पण लाभले होते. प्रभावी अन्‌‍ देखणे व्यक्तिमत्त्व, धीरगंभीर आवाज अन्‌‍ विषयावरची विलक्षण पकड यामुळे यांची व्याख्याने विद्यार्थी सहसा चुकवत नसत. ओठ मुडपून संथ लयीत दिलेली यांची व्याख्याने साठ वर्षे झाली तरी अजून स्मरतात. याशिवाय मुंबईहून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामवंत प्राध्यापक डॉ. ब्रह्मानंद येत. यांची महती आम्हाला उशिरा म्हणजे डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मपर लिखाण वाचल्यावर कळली. परंतु तोवर वेळ निघून गेलेली. गबाळा पेहराव, खांद्यावर शबनम, डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा, सावळा वर्ण, चेहऱ्यावर विलसणारे विद्वत्तेचे तेज असे ते डॉ. ब्रह्मानंद आठवतात. तसेच प्रा. डिकॉस्ता पण मुंबईहून येत खास व्याख्यानासाठी. हे पण नावाजलेले मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक. पँट, फूल बाह्यांचा शर्ट असे साध्या व्यक्तिमत्त्वाचे डिकॉस्ता म्हणजे आपल्या विषयातील अंतिम अधिकारी. परंतु विद्यार्थिजीवनात यांच्या ज्ञानाचा लाभ आम्हाला हवा तसा घेता आला नाही.
याव्यतिरिक्त मराठीसाठी डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये नियमित स्वरूपात होते. शिवाय प्रा. गोपाळ मयेकर आणि एस. एस. नाडकर्णी पण येत असत. फावल्या वेळात यांच्या व्याख्यानाला पण हजर राहिलो असतो तर कुणी आक्षेप घेतला नसता. परंतु आम्ही ही पण संधी घेण्यात दुर्दैवी ठरलो.

प्राध्यापक जॉर्ज मोराईश, शास्त्री, आपटे असे इतिहासाचे शिक्षक होते. जॉर्ज मोराईश यांनी संशोधनपर ग्रंथनिर्मिती पण केली होती. ‘दी कदंबा कुळ’ ही त्यातलीच एक संशोधनावर आधारित ग्रंथनिर्मिती. इंग्रजी विषयासाठी डॉ. कुलकर्णी होते. यांनीच पणजी येथे योगी अरविंद भक्ती सोसायटीची स्थापना केली. इंग्रजी विषय निवडलेले अवघेच विद्यार्थी. फ्रेंच विभाग पण होता. तसेच पोर्तुगीज भाषेत पण पदव्युत्तर शिक्षणाची सोय असावी. प्रा. कंटक व लुर्दिन रॉड्रिग्स पोर्तुगीज शिकवत. फ्रेंच विषयाचे अध्यापन डॉ. व्होडारकर अन्‌‍ सरदेसाई करत असतील. डॉ. व्होडारकर अलीकडेच निवर्तल्याचे समजले. पदव्युत्तर केंद्राच्या विज्ञान विभागात डॉ. वाघ यांच्यासमवेत अनेक प्राध्यापक अध्यापन करीत. परंतु आठवतात रसायनशास्त्राचे डॉ. घोष. अगडबंब देह, परंतु निर्गवी स्वभावाचे. केंद्राचा कर्मचारी वर्ग म्हणजे- अधीक्षक खांडेकर, मुख्य कारकून खानोलकर, पै, सुरेश कामत, गोविंद नाईक व इतर. कालांतराने खांडेकर मुंबईला गेले तर खानोलकर गोवा विद्यापीठात उच्च प्रशासकीय पदावरून निवृत्त झाले.

अर्थशास्त्र विषयातील सारेच सहकारी आठवतात. त्यातले काही आज हयात नाहीत. परंतु इंग्रजी अन्‌‍ मराठी विषयांतील चार विद्यार्थी अजून आठवतात ज्यांनी पत्रकारितेत उत्तुंग शिखरे गाठली. फ्रान्सिस सिल्व्हेरा, बी. जी. कोशी, प्रकाश कुलकर्णी अन्‌‍ जयंत संभाजी हे ते चौघे शिलेदार. दिवंगत पत्रकार वाल्मीकी फालेरो हे कोशी व सिल्व्हेरांबद्दल भरभरून बोलत. कोशी यांनी पत्रकारितेचा त्याग करून बंगळूरमध्ये मोठा उद्योग उभारल्याचे स्व. फालेरो यांच्याकडून समजले होते. फालेरो यांच्या अकाली निधनामुळे कोशी यांचा फोन मिळू शकला नाही, तर सिल्व्हेरा यांचे फालेरो यांच्याशी संपर्क साधण्याअगोदरच देहावसान झाले होते. असेच आणखी एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे राजीव वालावलकर. बिशेनसिंग बेदीशी साम्य असणारा हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी क्रिकेट तसेच टेबल टेनिसमध्ये तरबेज. ऐनवेळी त्याने या क्रिकेटप्रेमी विद्यार्थ्यांच्या साथीने नवोदितांचा एक संघ तयार केला अन्‌‍ आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत थेट अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. युसुफ शेख हा आकाशवाणीवरचा स्टाफ आर्टिस्ट पण आठवतो. कोकणी समर्थक कवी अन्‌‍ हौशी चित्रकार अशीच आगळी ओळख युसुफने निर्माण केली होती. शंकर म्हामाय विद्यार्थी संघटनेचा विद्यार्थी असल्यामुळे केंद्राचे कर्मचारी पण त्याला वचकून असत. निर्मला जोग मुख्य ग्रंथपाल तर बुर्ये कनिष्ठ ग्रंथपाल. बुर्ये यांच्या अफाट ज्ञानाचा परिचय आम्हाला याच कालावधीत झाला. शिवाय गंभीर चेहरा धारण करून एकापाठोपाठ एक विनोदाच्या पुड्या सोडण्याचे कसब त्यांना साधले होते. गोवा विद्यापीठ झाले अन्‌‍ हे पदव्युत्तर केंद्र बंद झाले. प्राध्यापक मंडळी अन्‌‍ कर्मचारी गोवा विद्यापीठात सामावले गेले.

आज इथून जाताना त्याकाळचे दिवस आठवतात. ‘कॅफे सुरेश’ तळमजल्यावर तसेच आहे. बिठ्ठोणचे कार्बोटकर हे अलीकडेपर्यंत चालवत. त्यांच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय माझे पुढे जाणे होत नसे. आता मला वाटते त्यांची मुले ते कॅफे चालवतात. सुरेश कार्बोटकर मितभाषी. इथे ‘दम’ म्हणजे चहा पिण्यासाठी विद्यार्थ्यांशी आपलेपणाची वागणूक. ‘दम’ हा चहासाठी आलेला सांकेतिक शब्द. त्या काळच्या झिनत अमानच्या ‘हरे राम हरे कृष्ण’ या चित्रपटामुळे आलेला. आता इथला परिसर पूर्णपणे बदलला आहे. विरळ लोकवस्ती, बैठी घरे, सायकलस्वार, अल्प प्रमाणातील गाड्या अन्‌‍ ओळखीचे चेहरे काळाच्या पडद्याआड गेले. ‘रेन्बो फोटो’ हा काँग्रेसच्या जॉन फर्नांडिसच्या बंधूचा स्टुडिओ पण आता तेथे दिसत नाही. कालाय तस्मै नमः।