Home बातम्या कालवी पुलाचा स्पॅन कोसळला

कालवी पुलाचा स्पॅन कोसळला

0

करोणा (हळदोणा) कालवी या नदीवर पूल नव्हता त्यामुळे ही नदी लोकांना पार करण्यासाठी फेरीबोटची सोय करण्यात आली होती. त्या नदीत दुपारच्या वेळी गेल्या वर्षी प्रवासी बस गेल्याने काही विद्यार्थी व नागरिक त्यात बुडून मरण पावले होते. त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास एका वर्षाच्या आत कालवी नदीवर पूल बांधून लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यात येणार असे आश्‍वासन दिले होते. २०१२ च्या निवडणुकीत भाजपा सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी ऑक्टोबर २०१२ साली या पुलाच्या कामाची पायाभरणी केली होती. त्याचे काम जोरदारपणे चालू होते.

१ ऑगस्ट रोजी या पुलावर लोखंडी स्पॅन क्रेनच्या सहाय्याने उचलत येत असताना तो खाली कोसळला. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. अपघातानंतर त्याठिकाणी स्थानिक लोकांनी धाव घेतली. या पुलाचे काम हाती घेतल्यापासून करोणा-कालवीपर्यंत वाहतूक करणारी फेरीबोट सेवा लोकांसाठी बंद करून ती या पुलाच्या बांधकामासाठी काम करीत असलेल्या कामगारांसाठी वापरण्यास दिली आहे. त्यामुळे येथील लोकांना मुलांना शाळेत अथवा इतर कामासाठी हे अंतर पार करण्यासाठी हळदोणा, मये ते कालवी व पुन्हा त्याच मार्गाने प्रवास करण्यासाठी २० किलोमीटरचे अंतर मार्गक्रमण करावे लागत असल्याचे स्थानिक नागरिक मेल्विन फर्नांडिस यांनी सांगितले.सध्या सरकारने शाळांची वेळही वाढवलेली असल्याने आमच्या मुलांना पहाटे उठावे लागते त्यांच्याबरोबर पालकांनाही उठावे लागते व शाळेत जावे लागते.