कार-दुचाकी अपघातात तरुणी ठार

0
10

दोनापावला येथील मणिपाल हॉस्पिटलच्या जवळील मुख्य रस्त्यावर आलिशान कार आणि दुचाकी यांच्यात रविवारी रात्री झालेल्या एका अपघातात दुचाकीवरील तरुणी ठार झाली असून, दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. पणजी पोलिसांनी कारचालक डेरियल डायस (रा. चिकोळणा-वास्को) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा परवारकर (23) असे मृत तरुणीचे नाव आहे. या अपघातात दुचाकी चालक डी. अरुण हा जखमी झाला आहे. सदर तरुणी आणि दुचाकीचालक हे दोघेही दोनापावल येथील एका हॉटेलमध्ये कामाला होते. कामावरून सुटल्यानंतर घरी जात असताना एका भरधाव आलिशान कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक झाली. या अपघातानंतर जखमी तरुणीला तातडीने नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला. जखमी डी. अरुण याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कारचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

दोनापावला ते बांबोळी या रस्त्यावर रात्रीच्या वेळी कारगाड्या भरधाव वेगाने चालविण्यात येत असल्याने वरच्यावर अपघात होतात. या रस्त्यावरील वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.