कार अपघातात कुठ्ठाळीत चौघे गंभीर जखमी

0
6

कुठ्ठाळी सांकवाळ येथे एका भरधाव कारने एका दुचाकीवरील जोडप्याला व पाव विक्रेत्या सायकलस्वाराला धडक दिल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर भरधाव कारची वीजेच्या खांबाला व नंतर झाडाला धडक दिली. त्यामुळे कारचालकही गंभीर जखमी झाला आहे.

वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर अपघात सांकवाळ येथे मंदिर परिसरात घडला. श्रीमती मीरा दीक्षित (61) व सौरभ दीक्षित (35) हे वाडे तळ्याजवळ राहणारे रहिवासी त्यांच्या ॲक्टीवाने (जीए 06 वाय 8542) वास्कोच्या दिशेने जात होते. तसेच लवकुश नयन (31) हा पाव विक्रेता सायकलस्वार वास्कोच्या दिशेने जात होता. यावेळी भरधाव वेगाने वास्कोच्या दिशेने जाणाऱ्या (जीए 05 बी 7499) स्कोडा रॅपीड कारने ॲक्टीवाला तसेच सायकलस्वाराला ठोकर दिली. यात ते तिघेही जखमी झाले. कारने नंतर वीज खांबाला व नंतर एका झाडाला धडक दिली. यात कारचालक नियस दिवकर व सहचालक तेजस गोवेकर (दोघेही नवेवाडे) हे कारमध्ये अडकून पडले. त्यांना अग्निशामक दलाने गाडीतून बाहेर काढले. अपघातातील जखमींना उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात कारच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. दुचाकीवरील एकाचा पाय फ्रॅक्चर झाला. वेर्णा पोलीस पुढील तपास करीत आहेत.