कार्ती चिदंबरमना अटक

0
113

कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय वित्तमंत्री चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना काल सकाळी सीबीआयने चेन्नईतील विमानतळावरच अटक केली. काही दिवसांपूर्वी सीबीआयने त्यांच्या चार्टर्ड अकौंटंटलाही अटक केली होती. अटकेनंतर दिल्लीतील न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांना एका दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली.

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या पीटर मुखर्जी व इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मिडिया या कंपनीला २००७ साली नियमाहून अधिक रकमेचा विदेशी गुंतवणूक निधी मिळाल्याने कार्ती चिदंबरम पेचात सापडण्याची शक्यता होती. मात्र ती शक्यता टाळण्यासाठी कार्ती यांचे वडील तथा तत्कालीन वित्तमंत्री पी. चिदंबरम यांच्या मदतीने नियमभंग करण्यात आल्याचा आरोप आहे.
या सर्वप्रकरणी सीबीआयने २०१७ साली गुन्हा नोंदवला होता. आयएनएक्स कंपनीकडून कार्ती यांनी कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.
गुन्हेगारी स्वरुपाची फसवणूक करणे, बेकायदा पद्धतीने लाभ उठवणे, सरकारी अधिकार्‍यांवरील प्रभावाचा गैरफायदा घेणे अशा विविध कलमांखाली सीबीआयने गुन्हा नोंदवला होता.
याप्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयने छापाही टाकला होता. काल सकाळी लंडनहून भारतात पोचताच चेन्नई विमानतळावरच सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान न्यायालातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कार्ती यांनी हा राजकीय सूडाचा प्रकार असल्याचे सांगितले. लवकरच बाहेर येणार असे ते म्हणाले.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, सीबीआयने अनेकदा संधी देऊनही कार्ती चिदंबरम खोटे बोलत राहिले. आता त्यांना तुरुंगात जावे लागणार आहे. त्यांच्यावर आरोपपत्रही ठेवले जाणार असल्याचे ते म्हणाले.