Home बातम्या कारवाईसाठी उठलेल्या हातांना शक्ती लाभो

कारवाईसाठी उठलेल्या हातांना शक्ती लाभो

0

– दिलीप बोरकर

एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याची घरची मंडळी आणि नातेवाईकच रडतात असे नव्हे, तर त्यांच्या आक्रंदनामुळे मृत्यू पावलेल्याकडे दुरान्वयेसुद्धा संबंध नसलेल्यांना रडे कोसळते, तसेच काही तरी शहा आयोगाच्या अहवालामुळे गोमंतकीयांचे झाले आहे. शहा आयोगाच्या अहवालात काय म्हटलेले आहे आणि अं’लबजावणीसाठी कुठल्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत, याची सुतराम कल्पना या लोकांना नाही. शहा आयोगाचा अहवाल म्हणजे काही लॉटरीचा एक पानी निकाल नव्हे! शहा आयोगाच्या अहवालात ज्यांच्यावर आरोप ठेवण्याच्या शिफारशी केलेल्या आहेत, त्या आरोपींनाच सदर अहवाल समजून घ्यायला कित्येक दिवस लागतील. तेव्हा माझ्यासारख्याने या अहवालावर भाष्य करणेसुद्धा लहान तोंडी मोठा घास घेणे ठरेल. तरी सुद्धा सामान्यांतला सामान्य माणूस आज शहा आयोगाच्या अहवालाचे प्रमाण देऊन गुन्हेगारांना शिक्षा देण्याची जी मागणी करतो, त्याला जनजागृती म्हणावी की, बेकायदेशीर खाण कामातून केलेल्या बेकायदेशीर कमाईचा जाहीर केलेला भलामोठा आकडा हे कळायला मार्ग नाही.

गोव्यात कायदेशीर म्हणा, अथवा बेकायदेशीर म्हणा, मोठ्या प्रमाणात खनिज पोखरणे कित्येक काळापासून चालू आहे. ज्या गतीने आणि ज्या प्रमाणात सदर खनिजाचे उत्खनन आणि निर्यात होत असे, ती काही लपून छपून करण्यात येणारी बाब नव्हती. खाण व्यवसाय चाललेल्या भागात दिवसरात्र उडविण्यात येणार्‍या सुरूंगांचा आवाज आणि यंत्रसामुग्रीचा खडखडाट कानावर कधी आलाच नाही म्हणण्यासारखी ही जनता बहिरी नक्कीच नाही. गेली कित्येक वर्षे ही सामान्य जनता खाण प्रदेशातील वृक्षवल्लींवर, घरांच्या कौलांवरीलच नव्हे, तर माजघरातील भांड्यांवरील मातीचे थर पाहात आली आहे. त्यांच्या पोटातच नव्हे, तर फुफ्फुसांत देखील हे मातीचे कण शिरून थर साचलेले असताना ही जनता आक्रंदन करण्यासाठी शहा आयोगाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत कशी काय होती हे कळत नाही. येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवून खिळे ठोका असा आदेश निघाल्याबरोबर ‘हो, हो, त्याला क्रॉसवर चढवा’ म्हणणारे आणि बर्नाबसला मुक्त करा म्हटल्याबरोबर ‘हो, हो बर्नाबसला मुक्त करा’ म्हणत गोंधळ घालणारे लोक अजूनही आमच्या सभोवताली कसे काय वावरत आहेत, हाच खरे म्हणजे विचार करण्याजोगा प्रश्न म्हणावा लागेल!

खाण व्यवसायामुळे गोव्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली आहे. खाण व्यवसाय म्हणजे गोव्याचा आर्थिक कणाच असे काही तरी चित्र तयार करण्यात आले आहे, पण गोव्याच्या भूमीतून खरवडून काढण्यात आलेली ही संपत्ती विदेशात निर्यात करून जमावलेल्या पैशाने कोणाकोणाचे भले झालेले आहे याचा मात्र तपशील कधी कोणी पडताळून पाहण्याची तसदी घेतलेली दिसत नाही. पंचवीस – तीस वर्षांपूर्वी गोमंतकीय सिद्धहस्त साहित्यिक पुंडलिक नाईक यांनी गोव्यातील खाण उद्योगावर बेतलेले ‘खणखण माती’ हे नाटक लिहून गोवाभर त्याचे प्रयोग सादर केले होते. शिवाय ‘अच्छेव’ ही कादंबरीही त्याच विषयावर होती. खाण उद्योगामुळे गोव्याचा कसा विद्ध्वंस होईल याचे चित्र त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी रंगवलेले होते आणि ते तंतोतंत आज मूर्त रूपात आलेले दिसत आहे.

भविष्याचा वेध साहित्यिक घेत असतात असे जरी म्हटले जात असले तरी पुंडलिक नाईक यांनी त्या काळी रंगवलेले हे चित्र निव्वळ काल्पनिक नव्हते. पंचवीस – तीस वर्षांपूर्वीच खाण व्यवसायामुळे गोव्याचे कशा प्रकारचे निःसंतान होणार आहे, याची कल्पना समाजात होणार्‍या परिवर्तनामुळे जाणवत होती. खाण व्यवसायात हातावर पडणार्‍या पैशाने दिपून जाऊन लोकांनी आपले पारंपरिक व्यवसाय सोडून द्यायला आरंभ केलेला होता. शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष केले होते. बागायतीतून मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा लोकांना मातीतून मिळणारे तात्काळ उत्पन्न हे अधिक मोलाचे वाटले होते. त्यांना त्यावेळी आपल्या फुफ्फुसात सातत्याने घुसणारे धुळीचे कण दिसले नाहीत. उद्ध्वस्त होणार्‍या शेतजमिनी दिसल्या नाहीत. पुंडलिक नाईक यांच्या नाटकातील सह्रदय आणि गोव्यातील प्रदूषणाविषयी कणव असलेल्या खाणमालकाच्या तोंडचा संवाद आजसुद्धा आठवतो. ‘खनिजाचा हा एवढा मोठा ढिगारा आम्हाला दिसतो, याचाच अर्थ तेव्हा कुठे तरी खड्डा पडलेला आहे.’ खाण व्यवसायामुळे गोव्यात प्रचंड प्रमाणात सुबत्ता आली आहे असे म्हणतात, याचाच अर्थ गोव्याचा तेवढ्याच प्रमाणात नाशही झालेला आहे.

गोव्याचा कधीच भरून न येणारा नाश संपत्तीच्या झगमगाटापुढे कोणालाच दिसलेला नाही असे कसे म्हणता येईल? पंचवीस वर्षांपूर्वी एका लेखकाला हा विद्ध्वंस जर दिसला तर इतरांना तो कसा काय जाणवला नाही? कारण उण्या कष्टाने मिळणारी ही प्रचंड संपत्ती प्रत्येकाला हवीहवीशी होती. म्हणूनच प्रत्येकाने या विद्ध्वंसाकडे डोळेझाक केली होती. साहित्यिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी वाजवलेली धोक्याची घंटा कधीच कोणी कानावर घेतली नाही. आज जेव्हा शहा आयोगाचा अहवाल उघड झालेला आहे, तेव्हा मात्र प्रत्येकाची झोप उडाली आहे.

खाण व्यवसायामुळे गोव्याची किती हानी झाली आहे व त्यावर वेळीच उपाययोजना केली गेली नाही, तर झालेले नुकसान हे कधीच भरून न येण्यासारखे असेल अशी धोक्याची घंटा परत परत वाजवूनही या गोष्टीकडे सर्वांनीच डोळेझाक केली. गोव्यातून विमानातून जाताना खाली दृष्टी फिरवली तर झालेला हा विद्ध्वंस नजरेस येत होता. माझ्यासारख्याच्या दृष्टीस तो क्वचित पडायचा, पण लहानसहान गोष्टींसाठी दिल्लीवारी करणार्‍या राजकारण्यांना सृष्टीवर होणारा हा आघात कसा काय दिसत नव्हता, हे आश्‍चर्यच म्हणायचे! आश्चर्य कसले? गोमंतभूमीचा गर्भ फोडून त्यावर आपली घरे सजवणारे हे लोक खाली कधीच पाहायला तयार नसावेत! त्यांच्या नजरा नेहमीच वर वर असायच्या! कोणाला सत्तेची खुर्ची दिसायची, तर कोणाला आपल्या घरांवर चढणारी सोन्याची कौले. शहा आयोगाने बेकायदेशीर खाण उद्योजक म्हणून ज्यांची ज्यांची नावे जाहीर केलेली आहेत, त्या लोकांत कोण कोण आहेत हे पडताळून पाहावे. यातील बहुतेक मंडळी गोव्याच्या भविष्याने कळवळणारे लोक आहेत. त्यांना निवडणूक लढवून, निवडून येऊन गोव्याचे भले करायचे होते. यातील कित्येक उद्योजकांनी राजकीय पक्षांना निवडणूक लढवण्यासाठी भरभरून पैसा दिलेला आहे. राजकीय धेंडांना मलिदा मिळत होता, तोवर त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नव्हता. सगळे काही खुलेआम चालत होते. ज्यांच्यावर आरोप केला जातो आणि जे आरोप करतात ते सर्व या खाणीच्या मातीत एवढे बरबटलेले आहेत की त्यांचे खरे रूप ओळखताच येत नाही. शहा आयोगाने त्यांच्यावर आपल्या अहवालाचा फवारा सोडल्याने त्यांची भ्रष्ट रूपे आज दृष्टीस पडत आहेत.

सदर उद्योगात कित्येक गोमंतकीयांचे भविष्य गुंतलेले आहे. त्यात ट्रकमालक, बार्जमालक आणि अशाच प्रकारचे प्रचंड गुंतवणूक केलेले लोक आहेत. त्या सर्वांनी सरकार घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा दिलेला होता. असे असताना कारवाईची भाषा करणे हे धाडसाचे आहे. त्यामुळे आपल्यासारख्यांनी मुख्यमंत्र्यांचे कारवाईसाठी उठलेले हात सशक्त करण्यासाठी पुढे यायलाच पाहिजे. ती काळाची गरज आहे.