28 C
Panjim
Sunday, September 27, 2020

कारगिलची एकमेव महिला योद्धा!

कारगिलच्या विजयाला आज दि. २६ जुलै रोजी १२ वर्षे पूर्ण होत आहेत. या युद्धकाळामध्ये शेकडो सैनिकांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली. त्यांना आपल्या अनेक वैमानिकांनी सर्वतोपरी पाठबळ पुरवले. त्यामध्ये एक महिला वैमानिक होती गुंजन सक्सेना. तिचीच ही कहाणी. रचना बिश्त रावल यांच्या ‘कारगील ः अनटोल्ड स्टोरीज फ्रॉम द वॉर’ या नव्या पुस्तकातून..

मे १९९९ मध्ये, उधमपूरमध्ये १३२ फॉरवर्ड एरिया कंट्रोल (एफएसी) फ्लाइट समवेत तैनात पंचवीस वर्षीय उंच, सडपातळ आणि मृदुभाषी फ्लाइंग ऑफिसर गुंजन सक्सेनाला श्रीनगरला उड्डाण करण्याचे आदेश मिळाले.
स्वतः एका लष्करी अधिकार्‍याची कन्या असलेल्या गुंजनला अशा प्रकारच्या एखाद्या मोहिमेचीच प्रतीक्षा होती. श्रीनगरला जायला ती आनंदाने तयार झाली. तत्पूर्वी आपले वडील लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) ए. के. सक्सेना यांना आणि आपल्या आईला फोन करायला ती विसरली नाही. तिचे आईवडील लखनौमध्ये होते. आपल्याला उधमपूरहून मोहिमेवर पाठवले जाते आहे आणि कदाचित पुढचे काही दिवस आपल्याला तुम्हाला फोन करता येणार नाही हे सांगायलाही ती विसरली नाही. तिचे वडील लेफ्ट. कर्नल सक्सेना स्वतः लष्करी अधिकारी असल्याने त्यांना तिच्या या मोहिमेचे आश्चर्य वाटले नाही. त्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि फोन खाली ठेवला.

त्यावेळीच कारगीलमध्ये घुसखोरीला नुकतीच सुरूवात झालेली होती आणि तेथे नेमके काय घडते आहे याचा कोणालाच काही अंदाज नव्हता. मोहीम नेमकी कशा प्रकारची असेल हेही कोणाला ठाऊक नव्हते. गुंजन जेव्हा श्रीनगरला निघाली तेव्हा तिलाही वाटले की मुजाहिद्दीनांची ही एखादी छोटीशी घुसखोरी असेल.
मे महिन्यात श्रीनगर एअर फील्डवर चार हेलिकॉप्टरे तैनात होती. गुंजन त्यातील ‘चिता’ हेलिकॉप्टरने उड्डाण करायची. श्रीनगरच्या तळावर तैनात दहा वैमानिकांपैकी ती एक होती. त्या सगळ्या पुरुष सहकार्‍यांमध्ये ती एकटीच महिला होती, त्यामुळे सुरवातीला वैमानिकांच्या ब्रीफिंगच्या वेळेस तिच्याकडे सहकार्‍यांच्या भुवया उंचावल्या जायच्या खर्‍या, परंतु नंतर त्यांनाही तिचा चेहरा सवयीचा होऊन गेला. त्यांनीही तिच्याशी स्नेहाचे नाते जोडले.

कारगीलचा प्रश्न जेव्हा गुंतागुंतीचा बनत गेला आणि तेथील मोहीम धोक्याची असल्याचे दिसू लागले, तेव्हा तिच्या डिटॅचमेंट कमांडरने तिला विचारले की तिला त्या भागात उड्डाण करायला काही समस्या तर नाही! गुंजनने नकारार्थी उत्तर दिले. श्रीनगरबाहेर धोक्याच्या क्षेत्राबाहेर तैनातीचा पर्याय धुडकावून तिने कारगील भागात उड्डाणे सुरू ठेवली. तोवर तिच्या पालकांनाही कळून चुकले होते की गुंजन प्रत्यक्ष युद्धभूमीमध्ये उड्डाणे करते आहे आणि तिच्या जिवाला धोका पोहोचू शकतो, पण हे कुटुंबच कडवे लष्करी शिस्तीत वाढलेले, त्यामुळे त्यांनी तिच्या कामामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला नाही.

सुरवातीच्या टप्प्यात तिच्या छोट्या, परंतु समर्थ चीता हेलिकॉप्टरने टेहळणी फेर्‍यांमध्ये उंच विरळ हवामानात उड्डाणांची कामगिरी यशस्वीपणे पार पाडली होती. कारगील – तोलोलिंग – बटालिक भागामध्ये हवाई टेहळणी करण्यासाठी ज्या भारतीय वैमानिकांना रवाना करण्यात आले होते, त्यामध्ये गुंजन ही एक होती. तेथे हवाई उड्डाण करताना जे जे दृष्टीस पडेल ते आपल्या वरिष्ठांना कळविण्यास तिला सांगण्यात आले होते. अनेकदा तिला भारतीय आणि पाकिस्तानी सैनिकांचा परस्परांवर गोळीबार सुरू असलेल्या डोंगराळ भागावरून जावे लागायचे. मग हळूहळू युद्धात बळी जाऊ लागले. अनेक सैनिक जखमी होऊ लागले. आता हेलिकॉप्टरांवर जबाबदारी आली ती जखमी सैनिकांना ते प्रच्छन्न युद्ध सुरू असलेल्या उंचावरील भागावरून खाली सखल व सुरक्षित भागात आणणे. गुंजननेही या वैद्यकीय मदतकार्यात सहभाग घेतला. अनेकदा त्यासाठी युद्धावरील सैनिकांनी घाईघाईत तयार केलेल्या, तेरा हजार फुटांवरील तात्पुरत्या हेलिपॅडवर तिला आपले हेलिकॉप्टर उतरावे लागायचे. जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरमध्ये चढवले जाईपर्यंत थांबावे लागायचे. तिच्या हेलिकॉप्टरकडे नजर लावून राहिलेल्या सैनिकांना मग थम्स अप करीत उड्डाण करावे लागायचे. तिच्या या इशार्‍याकडे त्यातल्या एखाद्याच सैनिकाचे लक्ष असे. मग झट्‌दिशी ती आपला ‘चीता’ श्रीनगरच्या दिशेने दौडवायची. या वैमानिकांना अत्यंत खबरदारी घ्यावी लागे, कारण शत्रूकडून कधीही हेलिकॉप्टर पाडले जाण्याचा धोका असे. ‘चीता’ हेलिकॉप्टरे अतिशय उंचीवरून उड्डाण करण्यात कुशल आहेत, परंतु त्यांच्यापाशी शत्रूपासून संरक्षण करण्याचे काही साधन नसते. संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी वैमानिक अनेकदा सोबत ऍसॉल्ट रायफल किंवा पिस्तुल बाळगतात तेवढेच. दुर्घटना घडली किंवा पकडले गेलो तर त्याचा वापर करायचा असतो. पण कारगीलवर शत्रूचा मारा सतत सुरू होता.

एकदा तर गुंजन कारगील एअरफील्डवरून उड्डाण करायच्या तयारीत असतानाच शत्रूने सोडलेले क्षेपणास्त्र तिच्या हेलिकॉप्टरपासून काही अंतरावरून पलीकडे गेले आणि मागे कोसळले. न घाबरता तिने उड्डाण करून आपले काम सुरू ठेवले.

चिता हेलिकॉप्टरांवर टेहळणी करीत शत्रूची माहिती गोळा करण्याची कामगिरी सोपवलेली असायची. आपल्या तोफखान्याला शत्रू लपलेली ठिकाणे कोठे आहेत ते सांगावे लागायचे. त्या माहितीच्या आधारे ते गोळीबार करायचे. शिवाय उंचावर लढणार्‍या सैन्याला अन्न, औषधे आणि इतर साधनसामुग्री पुरवायचे कामही असे. जखमी वा मृत सैनिकांना आणण्यासाठी स्वतः धोका पत्करावा लागे. देशासाठी आपले प्राण धोक्यात घालणार्‍या पायदळातील सैनिकांसाठी ही हेलिकॉप्टरे म्हणजे जीवनरेखा असे.

कारगील – बटालिक – तोलोलिंग दरम्यान गुंजन उड्डाणे घेत राही. त्या युद्धाच्या वीस दिवसांत तिने त्या भागात दहा उड्डाणे केली. मात्र, त्यानंतर भारतीय हवाई दलाने तेथील छोटी हेलिकॉप्टरे हटवून लढणार्‍या सैनिकांच्या मदतीला मोठी अधिक शक्तिशाली हेलिकॉप्टरे तैनात केली. त्यामुळे तिला उधमपूरला परतावे लागले. पण कारगीलच्या युद्धामध्ये सहभागी होणारी एकमेव महिला योद्धा म्हणून तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलेला आहे!

गुंजन म्हणते, युद्धातील आमची एक प्रमुख कामगिरी म्हणजे जखमी सैनिकांचा बचाव. मला वाटते हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून तो अनुभव तुमच्यासाठी संस्मरणीय ठरत असतो. तुम्ही कोणाचा तरी जीव वाचवता तेव्हा ती जी समाधानाची भावना असते तिला तोड नसते! त्यासाठीच तर तुम्ही तेथे असता ना! फ्लाईट लेफ्टनंट गुंजनचा सेवाकाळ कारगील युद्धानंतर काही काळात संपला, कारण महिलांची कायम नियुक्ती तेव्हा वैध नव्हती. आता ती हवाई दलातील एका वैमानिकाची पत्नी आहे!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पर्यटनावर कोरोनाचे सावट

सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...

गारवा तुझ्या आठवणींचा

सुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय! आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...

कावळ्याची शिकवण

पल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना! माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...

‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो

समग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...

विदारक साटेलोटे

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...

ALSO IN THIS SECTION

कोरोना संकटाचा पुढील टप्पा घातक

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सध्या देशात कोरोनाची ही लागण स्टेज २ वर आली आहे. येथेच आळा घालण्यात अपयश आले तर, तिचा पुढील प्रसार रोखण्यासाठी...

कोविड-१९ ला अटकाव करायचा कसा?

अमिताभ कांत आणि ऋचा रश्मी या आजारामुळे शहरी अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि देशाच्या जीडीपीमध्ये शहरे महत्त्वाचे योगदान देतात हे नाकारता येणार नाही....

चीन संकटात, भारताला संधी

शैलेंद्र देवळणकर कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युङ्गॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा ङ्गटका बसला आहे. कारण...

कोरोना आजाराविषयी जाणून घ्या सर्व काही

कोरोना विषाणूच्या आजाराने सध्या जगभरामध्ये दहशत व घबराट निर्माण केली आहे. या आजारावर लस निर्माण करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या सुरू असल्या, तरी औषध उपलब्ध नाही....

कार्यकर्त्यांच्या नजरेतून मनोहर पर्रीकर…

स्व. मनोहर पर्रीकर यांची आज प्रथम पुण्यतिथी. त्यांच्याविषयी नेहमीच त्यांचे कुटुंबीय, बालमित्र, स्नेही आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून वेळोवेळी भरभरून लिहिले गेले आहे. आम्ही यावेळी...