काय म्हणतात आपले उमेदवार?

0
104

गोव्यात होणार्‍या लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या चार प्रमुख पक्षांच्या उत्तर गोव्याच्या उमेदवारांसमवेत ‘प्रुडण्ट मीडिया’ या स्थानिक वृत्तवाहिनीने एक चर्चात्मक कार्यक्रम घडवून आणला. सदर वृत्तवाहिनीचे संपादक  श्री. प्रमोद आचार्य यांनी संचालन केलेल्या या चर्चेचा हा समग्र वृत्तांत :

सहभाग : 

१. श्रीपाद नाईक (भाजप)

२. रवी नाईक (कॉंग्रेस)

३. डॉ. दत्ताराम देसाई (आम आदमी पक्ष)

४. ऍड. सुहास नाईक (भाकप)

प्रश्न : गोव्यात जे पाच महत्त्वाचे विषय चर्चेत आहेत, त्यासंबंधीची आपली सर्वांची भूमिका मला जाणून घ्यायची आहे. पहिला विषय आहे मोपाचा. मोपा विमानतळासंबंधी आपली भूमिका काय?

श्रीपाद : मोपासंबंधीची आमची भूमिका स्पष्ट आहे. गोव्याच्या हितासाठी मोपा विमानतळ हा लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.

प्रश्न : दुसरा विषय आहे कॅसिनोंचा. आपल्या सरकारवर टीका होते की आपण आधी आंदोलन केलेत आणि आता त्यांना संरक्षण देत आहात?

श्रीपाद : कॅसिनोंना संरक्षण दिलेले नाही. पण सरकार ही निरंतर प्रक्रिया असते. त्यांना आधीच्या सरकारने परवानगी दिली होती. पण विद्यमान मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की २०१४ पर्यंत हे कॅसिनो बाहेर काढू.

प्रश्न : कॉंग्रेस म्हणते की आपण खाणी बंद केल्या, आपण म्हणता की कॉंग्रेसने केल्या. खाणींविषयी आपली भूमिका काय?

श्रीपाद : कायदेशीर खाणी लवकरात लवकर सुरू व्हायला हव्यात. गोव्यात परंपरागत खाण व्यवसाय चालत आला आहे, पण त्यात आलेल्या अवैध गोष्टींमुळे सगळ्या समस्या निर्माण झाल्या. कायदेशीर खाणी लवकरात लवकर सुरू व्हायला हव्यात.

प्रश्न : चौथा विषय शैक्षणिक माध्यमाचा. माध्यम प्रश्नावरही आपल्या सरकारवर टीका होते की आपण ‘यू टर्न’ घेतलात?

श्रीपाद : ‘यू टर्न’ असे नव्हे. प्राप्त परिस्थितीत उत्तम निर्णय सरकारने घेतला असे मी म्हणेन.

प्रश्न : स्वच्छ पर्यटनासाठी जी पावले सरकारने टाकायला हवी होती ती टाकली गेलेली नाहीत?

श्रीपाद : सरकार येऊन दीड वर्षच झालेले आहे. स्वच्छ पर्यटनासाठी सरकारने पावले टाकलेली आहेत. पण थोडा वेळ लागेल.

*********

प्रश्न : रवीबाब, मोपाबाबत आपली काय भूमिका आहे? कारण उत्तरेत वेगळा आवाज ऐकू येतो आणि दक्षिणेत वेगळा. आपण उत्तरेच्या आवाजासोबत आहात की दक्षिणेच्या?

रवी : मी लोकांना विश्वासात घेऊन, लोकांची मते ऐकून पुढे जातो. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन माझे मत बनवायचे आहे. ती जमीन, तेथील मुंडकार यांना विचारात घेऊन, गावच्या लोकांना विचारात घेऊन मत बनवावे लागेल. लोकांना जे हवे ते केले गेले पाहिजे. 

प्रश्न : दक्षिणेचे लोक मोपा नकोच म्हणतील?

रवी : दक्षिणेशी माझा संबंध नाही. मी उत्तरेचा उमेदवार आहे. 

प्रश्न : दुसरा विषय आहे कॅसिनोंचा. आपले सरकार असताना आपण परवाने दिलेत? 

रवी : नाही. सर्वांनी परवाने दिले. मध्यंतरी भाजपाचे सरकार होते. पण कॅसिनोंवर जेव्हा चर्चा झाली व जेव्हा इथे भाजपा सरकार यायचे होते, तेव्हा विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की एका महिन्यात कॅसिनो हटवू, जे झालेले नाही.

प्रश्न : खाणींचा प्रश्न बिकट बनला आपल्या सरकारच्या काळात. खाणींचा विषय आज लोकांपुढे आपण कसा काय घेऊन जाता?

रवी : खाणींच्या प्रश्नी अवैध गोष्टी घडल्या असे शहा आयोग म्हणतो. पण खरा मुद्दा आहे तो म्हणजे जे पंचवीस हजार कोटींचे नुकसान झाले ते वसूल करू असा जो (भाजपचा) जाहीरनामा घरोघरी वाटला गेला होता, त्याचे काय झाले या सरकारच्या काळात? १९४७ पासून गोव्यात खाण व्यवसाय आहे. गोव्याचे गरीब लोक यावर जगत असत.

प्रश्न : दुसरा विषय आहे तो शैक्षणिक माध्यमाचा..

रवी : शैक्षणिक माध्यमाचा विषय भारत सरकारने ठरवला पाहिजे. भारत सरकारचा शिक्षणविषयक कायदा आहे. आमच्या येथील सरकारने जो निर्णय घेतला होता तो कायद्यानुसार घेतला होता.

प्रश्न : आपण विद्यमान सरकारला या विषयावर पाठिंबा देता?

रवी : नाही, मी त्याबाबत काही बोलत नाही. मी माझ्या पक्षाबाबत बोलतोय.

प्रश्न : या निवडणुकीतही आपल्यावर अमली पदार्थांचा आरोप होत आहे?

रवी : गोव्याचे लोक मला ओळखतात. निवडणूक येते तेव्हा कोणी काहीही बोलतात. जेव्हा आरोप केला जातो तेव्हा काही तरी पुरावा हवा. पुरावे नसताना आरोप करणे सोपे असते, पण ते सिद्ध करणे कठीण असते. असे आरोप खूप झाले. कलंकित वगैरे मला काहीही लागू पडत नाही.

*********

प्रश्न : आता आम आदमी पक्षाविषयी. सुरूवात करूया खाणींच्या विषयावरून. लोकांसाठी खाणी हा संवेदनशील विषय. आपल्या पक्षात काही लोक आहेत ज्यांनी खाणींच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात जाऊन खटले लढवले. ते खाणविरोधी आंदोलनात होते. अशा परिस्थितीत खाण पट्‌ट्यात आपण जाऊन मते कसे मागणार? ही सर्कस नव्हे?

डॉ. देसाई : सर्कस काही नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. की खाणी असायला हरकत नाही, पण खाणकाम हे सातत्यपूर्ण व कायदेशीर असायला हवे. १९४७ पासून २००० पर्यंत खाणी व्यवस्थित चालत.  २००१ नंतर बेदरकार मायनिंग झाले. ‘फ्लाय बाय नाईट’ म्हणतात तसे रातोरात ऑपरेटर तयार झाले. सरकारचे त्यावर काहीच नियंत्रण नव्हते..

प्रश्न : परवा आपण कॅसिनोंबद्दल आंदोलन केले. गोव्यात कॅसिनो नकोत?

डॉ. देसाई : नकोत. गोव्यात कॅसिनो नकोत. 

प्रश्न : मांडवीबाहेरही नकोत?

डॉ. देसाई : मांडवीबाहेरही नकोत.

प्रश्न : तिसरा प्रश्न आहे तो मोपाचा. आपल्या पक्षाच्या दक्षिण गोव्याच्या ज्या उमेदवार आहेत, त्या मोपाविरोधी आंदोलनात सक्रिय आहेत. उत्तरेत आपण काय करणार?

डॉ. देसाई : याबाबत काही दिवसांपूर्वीच माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे. या विषयावर माझा अद्याप अभ्यास झालेला नाही.

प्रश्न : हे जरासे राजकीय उत्तर वाटते.

डॉ. देसाई : नाही. ऐका. मोपाच्या संदर्भात त्याचा जो कॉस्ट बेनिफिट रेशो असेल तो, शेतकर्‍यांची भरपाई व्यवस्थित होते आहे की नाही आणि त्या लोकांची काय भावना हे मी अजून पाहिलेले नाही, कारण मला नुकतीच उमेदवारी मिळालेली आहे.

प्रश्न : चौथा विषय आहे पर्यटनाचा. आपण जर निवडून आलात तर गैर पर्यटन रोखण्यासाठी आपल्यापाशी काही धोरण आहे का?

डॉ. देसाई : प्रश्न असेल तो कायद्याच्या अंमलबजावणीचा. एकदा कायदा लागू केला की सगळ्या गैर गोष्टी थांबतील.

प्रश्न : पाचवा प्रश्न आहे शैक्षणिक माध्यमाचा. आपले सरकार गोव्यात असते तर सध्याच्या सरकारच्या निर्णयापेक्षा काही वेगळा निर्णय आपण घेतला असता का?

डॉ. देसाई : आमची त्यावरील भूमिका अशी. शैक्षणिक माध्यमाचा विषय हा आमचा अभ्यासाचा विषय नव्हे. राजकारणी हे त्यावरील तज्ज्ञ नव्हेत. ज्यांना इंग्रजी हवी आणि देशी भाषा हवी अशा तज्ज्ञांना आम्ही एकत्र बसवले असते आणि त्यांचे जे मत बनेल ते आम्ही आमची भूमिका त्यात न मिसळता संपूर्णतः लागू केली असती. सरकारला ते बंधनकारक असते.

*********

प्रश्न : सुहासबाब, ते म्हणतात की बेदरकारपणे मायनिंग झाले. निर्बंध हवेत. आपण तर खाणीसंदर्भात त्या पुन्हा सुरू व्हाव्यात म्हणून आंदोलनात रस्त्यावर उतरला होता. 

ऍड. सुहास : खाणींसंदर्भात ‘आप’ म्हणते की सातत्यपूर्ण खाण व्यवसाय हवा असेल तर वार्षिक पाच दशलक्ष टन मर्यादा हवी. आम्ही म्हणतो की खनिज व्यवसाय पुढच्या पिढ्यांना टिकण्यासाठी तीस ते पस्तीस दशलक्ष टन उत्खनन मर्यादा असावी. 

प्रश्न : कॅसिनोंसंबंधी आपली भूमिका काय?

ऍड. सुहास : त्यापूर्वी एक मुद्दा मी उपस्थित करू इच्छितो. गोव्यातील खाणी सुरू कराव्यात म्हणून जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो तेव्हा रवी किंवा श्रीपाद त्या मंचावर आले नव्हते.

प्रश्न : त्यावर मी नंतर येईन. कॅसिनो मांडवीबाहेर पुरेत की गोव्याबाहेर जावेत?

ऍड. सुहास : कोणताही व्यवसाय एका फटक्यात बंद करता येत नाही. कॅसिनो मांडवीत असता कामा नयेत. कॅसिनोंत जेव्हा पाच हजार लोकांना रोजगार मिळतो  तेव्हा ते मांडवीबाहेर जावेत, पण नियमन व्हावे.

प्रश्न : शैक्षणिक माध्यमासंबंधी काही वेगळी भूमिका आपण घेणार?

ऍड. सुहास : प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिले गेले पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत. 

प्रश्न : मोपा हवा की नको?

ऍड. सुहास : जी गुंतवणूक झालेली आहे तिला लाभ लोकांपर्यंत व्हायला हवा. मोपाचे बाळ अजून जन्माला आलेले नाही. ते आधी जन्माला येऊ द्या. लोकांना ठरवू द्या.

प्रश्न : स्वच्छ पर्यटनासाठी आपल्यापाशी काही रोडमॅप आहे?

ऍड. सुहास : पर्यटनाच्या बाबतीत आजवरच्या सरकारांनी केवळ स्टार हॉटेलवाल्यांना संरक्षण दिले. लोकांना त्याचा लाभ मिळालेला नाही. टॅक्सी ऑपरेटर, शॅक्स ऑपरेटर, शॅक मालक, जे यांच्यावर अवलंबून आहेत, त्यांचा विचारच कधी झाला नाही. त्या गोमंतकीयांचा विचार करू आणि किनारी सुरक्षेवर भर देऊ.

*********

प्रश्न :  श्रीपादबाब, गोव्यातले आपण एकच खासदार जे तीनवेळा निवडून गेले. आपल्याबाबत ‘अँटी इन्कम्बन्सी’ लागू होईल असे म्हटले जाते.

श्रीपाद : अँटी इन्कम्बन्सी असती तर तिसर्‍यांदा मला निवडून दिलेच नसते. आधीच्या दहा वर्षांचे सोडूनच द्या, या पाच वर्षांतही तसे कोणाला वाटलेले नाही. 

प्रश्न : दुसरा आरोप आपल्यावर होतो की भाऊने लोकसभेत जाऊन काय केले? केव्हा दिसलेच नाहीत. गोव्याचे प्रश्न विचारलेच नाहीत.

श्रीपाद : हा विषय तोंडी बोलण्याचा नव्हे. लोकसभेच्या रेकॉर्डवर सगळे आहे. किती प्रश्न विचारले वगैरे. आमची एक पद्धत असते की कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर प्रमुख पक्षाला एक तास मिळतो. आमच्या पहिल्या फळीचे दोघे तिघे नेते बोलले तरी ती वेळ संपते. आम्हाला कधीच संधी मिळत नाही. त्यामुळे शून्य तास, प्रश्नोत्तराचा तास यातून आम्हाला नाईलाजाने भागवावे लागते. ही वस्तुस्थिती असते.

प्रश्न : आपल्याला पर्रीकर सरकारच्या गेल्या दोन वर्षांचा जो कार्यकाळ आहे, त्यात काही प्रश्न सोडवले गेले, काही नाहीत, त्यातून जे प्रश्न निर्माण झाले आहेत तेे लक्षात धरून लोक मते देतील. हा भाग आपल्याला कितपत महत्त्वाचा वाटतो?

श्रीपाद : नाही. लोकांना इथली परिस्थिती माहीत आहे. परिस्थिती लक्षात घेऊन जे निर्णय सरकारने घेतले आहेत ते लोकांचे हित लक्षात ठेवूनच घेतलेले आहेत. त्यामुळे लोक विरोधात मते देतील असे मला वाटत नाही. उलट मी असे म्हणेन की, या सरकारने जे काम केले आहे, जाहीरनाम्यातील जी ७० टक्के आश्वासने आज पूर्ण केली आहेत, तो माझ्यासाठी या निवडणुकीत प्लस पॉइंट ठरणार आहे. 

प्रश्न : यू टर्नचा आरोप आपल्या सरकारवर होतो. आपण मते मागायला जाता तेव्हा लोक आपल्याला प्रश्न विचारत नाहीत?

श्रीपाद : हे निर्णय सर्वांचे हित पाहून समतोल साधून घेतले गेले आहेत. १४ तारखेपासून मी सतत फिरतोय. मला असा एकही प्रश्न कोणी विचारलेला नाही.

प्रश्न : आपल्या पक्षाने या निवडणुकीत नरेंद्र मोदींवर जास्त भार टाकला आहे असे वाटत नाही?

श्रीपाद : आम्ही त्यांच्यावर जास्त अवलंबून नाही. तो एक घटक. स्थानिक सरकार आहे, माझी कामे आहेत. हे तिन्ही मिळून आम्ही लोकांपर्यंत गेलो आहोत.

*********

प्रश्नः रवीबाब, कॉंग्रेसच्या व्यासपीठावर उत्तरेचेही आपले सर्व आमदार येत नाहीत. आपले तिकिटेच्छुक नेते येत नाहीत. हे जे खतखते झाले आहे. शिवाय आपली उमेदवारी उशिरा घोषित झाली आहे. भाऊ तिसरी फेरी करीत आहेत, आपण पहिल्याच फेरीत आहात. एवढे करूनही आपण त्यांच्या पुढे जाऊ शकाल?

रवी : आमदार, पराभूत उमेदवार, उत्तर गोव्याचे कार्यकर्ते मला रोज फोन करतात की आम्ही कामाला लागलो आहोत. 

प्रश्न : आपल्यासोबत आमदार आहेत?

रवी : हो. आहेत. सगळे आमदार आहेत. बाबूश आहेत, जेनिफर आहेत. प्रतापसिंह आहेत, विश्वजित आहे. मडकईकर आहेत. देशप्रभू बैठकीला आले होते. सगळे संघटित आहेत. उत्साहाने कामाला लागले आहेत. गेल्या वेळी हरलेले उमेदवारही यावेळी पुढे सरसावले आहेत. 

प्रश्न : पक्षाची जी प्रतिमा जाते ती उमेदवारी जाहीर झाल्यावर कोणीतरी बंड करते, उमेदवारी मागे घ्या म्हणते, ही जी प्रतिमा लोकांपुढे ठेवत आहात, त्यातून नुकसान होणार नाही?

रवी : उमेदवारीबाबत निर्णय दिल्लीत घेतला जातो. पक्ष निर्णय घेत असतो. उत्तरेत कोणीही मला विरोध केलेला नाही. राष्ट्रवादीनेही मला पाठिंबा दिलेला आहे. शरद पवारांनीही मला पाठिंबा दर्शविलेला आहे. दोन्ही जागा येतील.

प्रश्न : आपण खूप संधिसाधू आहात. आपण फोंड्यात हरलात आणि आता लोकसभेला उभे राहिला आहात अशी टीका होते..

रवी : चुकीची आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले होते. मी अर्ज केला नव्हता. उत्तर व दक्षिणेचे संभाव्य उमेदवार त्यांनीच जाहीर केले. माझे जे गोव्यासाठी, मुंडकारांसाठी, महिलांसाठी कार्य आहे, ते पाहून मला मी न मागता उमेदवारी दिली गेली आहे. 

प्रश्न : केंद्र सरकारमध्ये एवढ्या गैर गोष्टी आहेत. त्याचा आपल्याला त्रास नाही होणार?

रवी : व्यक्तीव्यक्तीमध्ये फरक असतो. नवीन चांगले उमेदवार दिले गेले तर ते निवडून येतील, देशाला सरकार देतील.

प्रश्न : मोदी फॅक्टरचा प्रभाव मतदारांवर आहे. त्याला उत्तर आपल्याकडे नाही.

रवी : मोदींची जी हवा तयार केली होती, ते आकाश आता स्वच्छ होऊ लागले आहे. मोदींची हवा उरलेली नाही. 

प्रश्न : आता आकाशात रवी…

रवी : गोव्यात रवी… (हशा)

*********

प्रश्न : आम आदमी पक्षाची रोज एक नौटंकी असते. जे सातत्य इतर पक्षांत असते, ते आपल्या पक्षात दिसत नाही. मग लोकांनी विश्वास का ठेवावा?

डॉ. देसाई : ही स्टंटबाजी नव्हे. पारंपरिक राजकारण्यांना याचा धक्का बसू शकतो.

प्रश्न : दिल्ली चालवता आली नाही मग दिल्लीचे तख्त लोकांनी आपल्याला का द्यावे?

डॉ. देसाई : दिल्लीत भाजपावर सरकार स्थापनेची जबाबदारी होती. जे निर्णय त्या ४९ काळात घेतले गेले ते लोकांच्या फायद्याचेच होते. 

प्रश्न : आपल्या पक्षाला जायंट किलर सिंड्रोम लागला आहे. मोदी आहेत तिथे केजरीवाल गेलेत, राहुल गेलेत तेथे कुमार विश्वास गेलेत. येथे श्रीपाद आणि रवी हे जायंट आहेत. तेथे दत्ताराम देसाई गेले आहेत. आणि तरीही आपण म्हणता की आम आदमी.. हा जायंट किलर सिंड्रोम लोकांची दिशाभूल करणार नाही

डॉ. देसाई : आम आदमी म्हणून जेथे उभे राहावे असे आम्हाला वाटते तेथे आम्ही उभे आहोत.

प्रश्न : आपली धोरणे तत्त्व म्हणून चांगली आहेत, पण व्यावहारिक नाहीत. अमलबजावणी करणे कठीण

डॉ. देसाई : आम्ही सत्तेवर आल्यावर करून दाखवू.

प्रश्न : भाजपा म्हणते मोदींनी आधी करून दाखविले आहे.

डॉ. देसाई : मोदींनी फक्त कॉर्पोरेट सेक्टरला फायदा मिळवून दिलेला आहे. सर्वसामान्य लोकांसाठी केलेले नाही.

प्रश्न : आपल्यावर संघाशी संबंध असल्याचा आरोप होतो. आपण भाजपाशी संबंधित होता असे म्हटले जाते. आपल्याला आम आदमी पक्षात भाजपाने घुसवले आहे असे म्हटले जाते?

डॉ. देसाई : यात आपल्याला विरोधाभास वाटत नाही? भाजपाचाच माणूस असेल तर कोणाला पाडण्यासाठी उतरेल? असो. मी संघाशी संबंधित नव्हतो. भाजपाशी संबंधित होतो. भाऊसाठी मी काम केले आहे. राजकारणात सर्वसामान्य नागरिकाने भाग घेतला पाहिजे असे मला वाटते म्हणून त्यातल्या त्यात चांगला पक्ष म्हणून मी भाजपा सोबत होतो.

प्रश्न : मग आता आम आदमी पक्ष..

डॉ. देसाई : आता आम आदमी 

*********

प्रश्न : सुहास, आपले काम खाणीसंदर्भात आहे. आपला प्रचाराचा मुख्य मुद्दा खाणी हाच असेल का?

सुहास : हे बघा, आम्ही ही निवडणूक केवळ खाणींच्या प्रश्नावर लढवीत नाही. सामान्य माणसाशी संबंधित सर्व विषयांवर आम्ही लढलो आहोत. महागाई असो, भ्रष्टाचार असो, बेरोजगारी घ्या, त्यावर आम्ही गेली दहा वर्षे लढत आहोत. खाणी हा एक घटक. 

प्रश्न : पूर्वी ख्रिस्तोफर लढत असत. त्यांच्यासोबत गर्दी असे. मत देण्यावेळी इतरांना देत. आता आपल्याला मते मिळतील असे कसे वाटते?

सुहास : कामगार संघटनेचा कोणीही सदस्य होऊ शकतो. तेथे राजकीय विचारधारा असत नाही. आम्ही कामगार संघटनेचे राजकायीकरण केलेले नाही. ते कोणालाही मते देऊ शकतात. या निवडणुकीत आम्ही फक्त कामगारांचे नव्हे, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आहोत. 

प्रश्न : केंद्रात आपला पक्ष तिसर्‍या आघाडीची भाषा करू लागला आहे. जे आम्हाला ठाऊक आहे की फक्त निवडणुकीपुरता बुडबुडा आहे आणि तो फुटेल. लोकांनी का विश्वास ठेवावा?

सुहास : देशात लोकशाही टिकून असेल तर ती केवळ डाव्या शक्तींमुळे. त्यांनी नेहमीच जातीय शक्तींना राजकारणातून दूर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या परिस्थितीत आपण जर भाजपा म्हणत असाल, तर काही राज्यांत भाजपाचे अस्तित्वच नाही. तामीळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, प. बंगाल या राज्यांतून अधिकाधिक खासदार येतात, तेथे भाजपाचे अस्तित्वच नाही. मग २७२ चा आकडा ते कसे मिळवणार?

प्रश्न : बिगर खाणपट्‌ट्यात आपला प्रचाराचा मुद्दा काय?

सुहास : खाणी ह्या एकाच विषयावर आम्ही निवडणूक लढवीत नाही आहोत. इतर अनेक विषय आहेत. दहा कोटी लोक बेरोजकार आहेत. केंद्र सरकारने त्यावर काय केले आहे?

प्रश्न : यावेळी ख्रिस्तोफरऐवजी सुहास नाईक का?

सुहास : हे आपण माझ्या पक्षाला विचारा. मला वाटते की सर्वांनी माझे नाव सुचवले.

*********

प्रश्न : श्रीपादभाऊ, कॉंग्रेसमुक्त भारत ही आपली घोषणा एक अतिरंजित घोषणा आहे असे आपल्याला नाही वाटत?

श्रीपाद : हा प्रचाराचा एक भाग आहे. सगळ्या गोष्टी बोलतो त्या होतात असे नाही. पण आपला प्रचार मजबूत करण्यासाठी अशा गोष्टी मांडल्या जातात.

प्रश्न : आपला प्रचार टोकाचे व प्रक्षोभक मुद्दे घेऊन चाललेला आहे असे नाही वाटत?

श्रीपाद : नाही. हा केवळ प्रचारापुरता भाग आहे. ज्या पद्धतीने आम्ही प्रचारासाठी जातो तेव्हा एक पाऊल पुढे असण्याचा प्रयत्न होतो.

प्रश्न : जास्त उमेदवार असतात तेव्हा मते विभागली जातात. येथे उमेदवार कमी आहेत ही चिंतेची बाब असे आपल्याला वाटते?

श्रीपाद : आमच्यासाठी हे घातक नाही. आमची मते विभागली जाणार नाहीत. विरोधकांची मते विभागली जातील हे उघड आहे. 

प्रश्न : डॉ. दत्ताराम म्हणाले की त्यांनी तुमच्यासाठी काम केले होते. आज त्यांनाच विरोधी उमेदवार म्हणून पाहताना काय वाटते?

श्रीपाद :  शेवटी प्रत्येकाला हक्क आहे. दत्ताराम देसाई ‘आप’ मध्ये का गेले हे अजून मला कळलेले नाही. वाईट वाटते खरे. इतकी वर्षे खांद्याला खांदा लावून लढणारे देसाई आपमध्ये का गेले, आपची जादू कशी झाली हे मी शोधेन. नक्कीच शोधून काढीन. (हशा)

प्रश्न : सगळेजण म्हणतात की ते सर्वांत जास्त आपली मते फोडतील.

श्रीपाद : त्याचे उत्तर डॉ. देसाईच देतील.

डॉ. देसाई : मी जिंकणार आहे.

रवी : आज कोणत्याही उमेदवाराला साधा समजू नये. ही लोकशाही आहे. लोक काय करतील हे आम्ही सांगू शकत नाही. आम्ही कोणाला कमी लेखता कामा नये. लोक ठरवतील.

प्रश्न : दत्ताराम देसाई कोणाला तापदायक ठरतील. तुम्हाला की श्रीपादना

डॉ. देसाई : सगळ्यांनाच तापदायक ठरेन.

रवी  : मला तर नक्कीच नाही.

प्रश्न : गेल्या पाच वर्षांतील भानगडी पुरे झाल्या असे लोक म्हणतात. आपल्या केंद्र सरकारात घोटाळे झाले, नेते गजांआड गेले.  

रवी : ते भाजपात झाले नाही का? बंगारू लक्ष्मण यांना पैसे घेताना पकडले गेले होते. 

प्रश्न : येडीयुराप्पा, बी. रामलूंना परत भाजपाने पक्षात घेतले.

रवी : हे सगळे व्यक्ती करतात. पक्ष नव्हे.

डॉ. देसाई : पण व्यक्ती मिळूनच पक्ष बनतो ना?

रवी : जे भ्रष्टाचार करतात त्यांना शासन व्हायला हवे.

श्रीपाद : बंगारू प्रकरण हे कॉंग्रेसचेच षड्‌यंत्र होते. ज्याने ते केले तो त्याचे परिणाम भोगत आहे. गोव्यातच भोगतो आहे. पक्षाला देणगी म्हणून कोणी पैसे आणून देतो तेव्हा ते पक्षाध्यक्षाने घ्यायला नको होते. खजिनदाराकडे पाठवायला हवे होते. तेव्हा बंगारूंची चूक झाली. पण नंतर त्यांनी ते पैसे खजिनदाराकडे दिले होते हे सिद्ध झाले.

प्रश्न : आज आपल्याला येडियुराप्पा चालतात?

श्रीपाद : अजून ते आरोप सिद्ध व्हायचे आहेत. 

रवी : देशात जे घडले त्यालाही हाच न्याय लागू होतो असा याचा अर्थ झाला. कॉंग्रेसलाही हे लागू झाले पाहिजे.

सुहास : भाजपा आणि कॉंग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

श्रीपाद : पूर्णपणे चुकीचे. कॉंग्रेसशी भाजपाची अजिबात तुलना करू नका.

प्रश्न : आपला न्याय कोणता? त्यांनीही केले म्हणून आम्ही करू असे आपण म्हणता का?

रवी : नाही. मी म्हणतो की असे लोक दोन्ही बाजूंना आहेत. ते दूर केले पाहिजेत.

डॉ. देसाई : आरोप सिद्ध होईपर्यंत थांबायची गरज नाही. नैतिक मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. दोन्ही पक्षांचे मिळून कलंकित मंत्री, आमदार किती आहेत. त्यांनी वास्तविक बाजूला राहायला हवे होते. तरी सर्वांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे.

प्रश्न : देसाई, आपल्या पक्षाला इतिहास नाही. आपले नेते सत्तेवर आले आणि कलंकित झाले तर आपण कारवाई कराल का? दिल्लीत आपल्या मंत्र्यावर आरोप झाले तेव्हा तुम्ही म्हणालात की ते आरोप सिद्ध होऊ द्यात. म्हणजे त्यांचाच युक्तिवाद आपण केलात.

डॉ. देसाई : आता उमेदवारी दिली गेली तेव्हा महेंद्रसिंग यांची उमेदवारी रद्द केली गेली कारण आपण तीन महिने तुरुंगात होतो हे त्यांनी लपवले होते. जेव्हा पक्षाच्या लक्षात आले तेव्हा तिकीट रद्द केले. सोमनाथ भारतीचे जे प्रकरण आहे, त्यांनी पोलिसांना विनंती केली होती.

प्रश्न : रवीबाब आपण गृहमंत्री होता. सोमनाथ भारतींनी जे केले ते बरोबर की चूक?

रवी : मंत्री जाऊन थेट पोलिसांना आदेश देऊ शकत नाही. पोलिसांचा जो प्रमुख असतो, त्याला आदेश देणे आवश्यक असते. जनतेसाठी ते गेले असे गृहित धरू, पण त्यांची ती चूक होती. त्यांनी तसे जायला नको होते.

प्रश्न : श्रीपादजी, आम आदमी पक्ष काही वेगळे करील असे आपल्याला वाटते का?

श्रीपाद : आता हे लोक उघडे पडले आहेत. केजरीवालांना वाटते की सगळे चोर आहेत, ते एकटेच साव आहेत. एकदा असे झाले की त्यांना चूक मागावी लागली. त्यांचा शीर्ष नेताच असे वागतो? त्यांना खास विमानातून फिरताना एका वाहिनीने रंगेहाथ पकडले. हा दुटप्पीपणा आहे. त्यामुळेच दिल्लीचे सरकार त्यांना गमवावे लागले.

प्रश्न : डॉ. देसाई, दुटप्पीपणा झाला का?

डॉ. देसाई : जेथे चुकले तेथे माफी मागितली गेली आहे. खास विमानाचा उल्लेख आपण केलात. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी इंडिया टुडे ग्रुपने त्यांना ते विमान पुरवले होते.

श्रीपाद : तातडी असेल तर खास विमान वापरायचे हे तत्त्व सगळ्यांनाच लागू पडले पाहिजे ना मग. विमान आपल्यालाच लागते. इतरांना लागत नाही?

प्रश्न : सुहासजी, तिसर्‍या आघाडीचे खतखते चालले आहे. 

सुहास : ते खतखते नव्हे. आपण येथे एवढी चर्चा केली, खर्‍या प्रश्नांवर एकही नेता बोलला नाही. महागाईवर कोण बोलले का?

रवी : त्यांनी त्यावर प्रश्न विचारला नव्हता..

सुहास : महागाई आणि दरवाढीवर भाजपाचे धोरण काय?

प्रश्न : भाजपाने ते धोरण जाहीर केलेले आहे. बरोबर आहे ना श्रीपादबाब?

सुहास : ही फक्त आश्वासने आहेत. गेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले होते की १० हजार नोकर्‍या देऊ, दोन हजारही नोकर्‍या निर्माण करता आल्या नाहीत. आज ते म्हणतात पन्नास हजार नोकर्‍या देऊ. कुठून येणार आहेत? सरकारी कर्मचारीच सगळे ५७ हजार आहेत.

प्रश्न : मुद्दे तेच आहेत. महागाई, बेरोजगारी हेच मुद्दे आहेत. कॉंग्रेस आणि भाजपा आश्वासने देते, पण प्रत्यक्षात येत नाहीत.

श्रीपाद : गेल्यावेळचा स्थानिक जाहीरनामा पाहा. दोन वर्षांत ७० टक्के आश्वासने पूर्ण झाली आहेत. 

प्रश्न : हीच कार्यक्षमता केंद्रातील सरकारमध्ये दिसेल?

श्रीपाद : नक्कीच. येऊ द्या ना. सरकार तरी येऊ द्या. अटलबिहारी वाजपेयींनी सहा वर्षांत करून दाखविले होते.

सुहास : गृह आधारखेरीज या सरकारने काहीही केले नाही. 

डॉ. देसाई : तेही मते मिळवण्यासाठी.

श्रीपाद : आम्ही जाहीरनाम्यात आश्वासने दिली होती ती पाळली. गृह आधार, लाडली लक्ष्मी चालू झाली की नाही? पेट्रोल स्वस्त केले की नाही?

प्रश्न : मतांसाठी योजना वापरल्या असा युक्तिवाद होतो. जाहीरनाम्याची पूर्तता केली म्हणून आम्हाला मते मिळतील असे ते म्हणतात??

श्रीपाद : दोन हजार कोटींचा महसूल जो खाणींतून मिळत असे तो या दोन वर्षांत मिळाला नाही. तरीही आम्ही करून दाखवले.

रवी : लोक वृत्तपत्रे वाचतात. हे पाहायला की सरकारने आज कुठला कर लावला आहे? पस्तीस तर्‍हेचेे कर लावलेले आहेत. एकीकडे भार टाकायचा आणि दुसर्‍या बाजूने एक हजार रू. सवलत द्यायची याला काय अर्थ आहे? पेट्रोल स्वस्त केले म्हणता, गरिबांना किती पेट्रोल लागते? एक ते दीड लीटर. स्वस्त पेट्रोलचा फायदा कोण घेतेय? गोव्याबाहेर पेट्रोल नेऊन विकले जाते आहे.

श्रीपाद : असे घडत असेल तर पकडा ना. नुसते बोलून काय फायदा?

रवी : मोठ्या लोकांना फायदा झाला आहे. प्राप्तीकर देणार्‍यांना फायदा झालाय.

प्रश्न : प्रत्येक जण लोकप्रिय योजना आखत असतो. उद्या आपण श्रीपादना सांगणार आहात का की पेट्रोलवर पुन्हा व्हॅट लावा म्हणून?

रवी : मी का सांगू? त्यांनी विचार करायला हवा.

देसाई : सामाजिक सुरक्षा योजना लागू करायला माझी काही हरकत नाही. पण ती सामाजिक योजना असायला हवी. पक्षाची नव्हे. आज भाजपाचे कार्यकर्ते जाऊन सांगतात की ही अशी अशी योजना आहे, हे लाभार्थी. त्यांची मते आम्हाला मिळायला हवीत असे सांगितले जाते.

श्रीपाद : चुकीचे. ही योजना सरकारची आहे. पक्षाची नव्हे. 

रवी : बेकारी भत्ता देतो म्हणाले होते तो दिला गेलेला नाही. जे दिले आहे, त्यातून कोणाचा फायदा झाला? बारा हजार कोटींचे ऋण आहे सरकारवर. ८६ हजार रूपये दरडोई कर्ज झाले आहे.

प्रश्न : ऋण काढून सण साजरा केला जात आहे हा आरोप आहे?

श्रीपाद : कॉंग्रेस सरकारने जे ऋण काढले होते ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारने फेडले. ती परतफेड करण्याची धमक आम्ही दाखवली. आता ऋण काढावे लागले कारण खाणींच्या महसुलामुळे जो पैसा मिळायचा तो बंद झाला.

रवी : ही परिस्थिती कोणामुळे आली?

प्रश्न : ते म्हणतात की तुमच्या सरकारमुळे आली?

रवी : नाही. खाणी कोणी बंद केल्या? मनोहर पर्रीकर यांनी बंद केल्या.

श्रीपाद : हे चुकीचे आहे.

सुहास : खाणी बंद करण्यासाठी पहिला दोषी पर्रीकर हे आहेत. दुसरा दोषी म्हणजे कॉंग्रेस. जयंती नटराजन यांनी पर्यावरण दाखले रद्द केले. तिसरे जबाबदार म्हणजे एनजीओ.

देसाई : एनजीओ कोणत्याही परिस्थितीत जबाबदार नाहीत, कारण त्यांनी जे घडत होते ते दाखवून दिले.

श्रीपाद : मनोहर पर्रीकरांनी खाणी बंद केल्या हे म्हणणे चुकीचे आहे.

रवी : नाही. सीएनन आयबीएनची मुलाखत मी हवी तर दाखवतो.

श्रीपाद : पावसाळ्यात खाणी बंद असतात. शहा आयोग अहवाल आला. तेव्हा सगळे सुरळीत व्हावे म्हणून काही काळापुरते ते बंद केले गेले होते खाणी बंद झाल्या कॉंग्रेसमुळे कारण त्यांचे मंत्री, आमदार, मुख्यमंत्री सगळे खाणमालक बनले होते. अवैध गोष्टी कोणी केल्या हा प्रश्न आहे. जे बेदरकार खाणकाम झाले, त्यातून प्रश्न बिकट बनला. 

रवी : खाणमालक भाजपाचे नाहीत. कुडचड्याचे आमदार भाजपाचेच ना?

श्रीपाद : ते अवैध खाणींत नाहीत.

सुहास : दोघेही एकमेकांना दोष देतात. पण खरा मुद्दा आहे की लोकांना यांनी संकटात टाकले.

प्रश्न : एका ओळीत सांगा. आपल्याला लोकांनी का मत द्यावे?

देसाई : आता या दोन्ही प्रस्थापित पक्षांना लोक विटलेले आहेत. आता क्रांती व्हायला हवी आणि ती या २०१४ च्या निवडणुकीत होईल.

सुहास : भाजपा आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. 

श्रीपाद : आम्ही नाही…

प्रश्न : मग ‘आप’ ला का मते देऊ नयेत, आपल्याला का द्यावीत?

सुहास : कारण त्यांना सरकार चालवता आले नाही.

रवी : या देशात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. सर्वांना सोबत घेऊन कॉंग्रेसच जाऊ शकते. भाजपाचे तसे विचार नाहीत. मोदी पंतप्रधान बनले तर देशात लोकशाही उरणार का हा प्रश्न आहे.

प्रश्न : श्रीपादजी, आपल्यापुढील सर्वांत मोठा धोका कोणता?

श्रीपाद : उत्तर गोव्याच्या जनतेने ठरवले आहे. धोका खरा मतदारापासून असतो. त्यांनी ठरवले आहे. 

प्रश्न : येथे आपण थांबूया. आम्ही पहिल्याप्रथमच अशा प्रकारचा प्रयोग केला. आपण सगळे उपस्थित राहिलात. आपल्यामुळे तो यशस्वी ठरला. सर्वांना धन्यवाद.

 (सौजन्य: प्रुडण्ट मीडिया)