कायदेशीर ‘धिरयों’साठी अभ्यासाअंती निर्णय

0
13

आरोलकरांच्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

न्यायालयाच्या आदेशामुळे बंदी लागू झालेल्या धिरयो (बैलांच्या झुंजी) परत कायदेशीररित्या सुरू करण्यासाठी काय करणे शक्य आहे याबाबत अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. आमदार जीत आरोलकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील स्पष्टीकरण केले.

यावेळी बोलताना जीत आरोलकर यांनी गोव्यात बैलांच्या झुंजीवर बंदी घालण्यात येण्यापूर्वी त्या बऱ्याच काळापासून राज्यात चालू होत्या. आणि त्या गोव्याच्या संस्कृतीचा एक भागच होत्या, असे सांगून त्या पुन्हा कायदेशीररित्या सुरू करण्यासाठी गोवा सरकारने आवश्यक ते सगळे काही करावे, अशी मागणी यावेळी केली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी बोलताना धिरयो या नावाने प्रसिद्ध असलेल्या या बैलांच्या झुंजी या गोमंतकीय संस्कृतीचा अविभाज्य असा घटक असल्याचे स्पष्ट केले आणि त्यावरील बंदी उठवण्यासाठी सरकारने कायदेशीर लढा देण्याची मागणी केली. आमदार व्हेन्झी व्हिएगस, विजय सरदेसाई, एल्टन डिकॉस्टा, डिलायला लोबो, आलेक्स रेजिनाल्ड, कार्लुस फेरेरा आदींनीही ही मागणी उचलून धरताना सरकारला विविध सूचना केल्या. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत काय करता येईल याचा अभ्यास केल्यानंतरच पुढील पावले उचलता येतील, असे आश्वासन सभागृहात दिले.