कामाचं नियोजन आवश्यक!

0
18
  • शंभू भाऊ बांदेकर

…म्हणून माणसाने दुसऱ्यांना मूर्ख बनवण्यापूर्वी आपण मूर्ख बनणार नाही. शहाणपणासाठी, जीवनात नियमितपणा आणण्यासाठी कामाचं नियोजन करून सुखी जीवनाचा आनंद लुटेन असे ठरविले पाहिजे.

संध्याकाळी फिरायला गेलो होतो. एका निवांत जागी बसून मी दुसऱ्या दिवसाच्या कामाची यादी तयार करीत होतो. इतक्यात तिथे एक मित्र आला आणि मला म्हणाला, “अरे, तू घरी असतोस तेव्हा तुझं वाचन आणि लेखन चालू असतं; आता इथं आलास तर निवांतपणे मोकळी हवा खा…” मी ‘हो’ म्हणालो आणि कागद बाजूला केला. त्याने कुतूहलाने विचारले, “काय लिहीत होतास?” मी म्हटले, “काही नाही रे, उद्याच्या कामाची यादी तयार करीत होतो!” मग त्याचंही कुतूहल चाळवलं. त्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मग सुंदर वाऱ्याची झुळूक अंगावर घेत त्याला सांगू लागलो ः

“माझ्या वास्कोच्या वास्तव्यात डॉ. सुरेंद्रनाथ आरोंदेकर नावाचे माझे सन्मित्र होते, त्यांच्याकडून मी हे शिकलो. ते सकाळी दवाखान्यात जाण्यापूर्वी संपूर्ण दिवसाच्या कामांची यादी त्यांच्याकडे असायची. जसा वेळ मिळेल तशी फोनाफोनी करून किंवा आपल्या कर्मचाऱ्याला पाठवून ते एकेक काम पूर्ण करायचे व रात्री जेवल्यानंतर किती कामे झाली, किती उद्यासाठी आहेत व आणखी कुठली नवीन कामे आहेत यांची यादी तयार करायचे.”
पण माझ्या उत्तराने त्याचे समाधान झालेले दिसले नाही. तो म्हणाला, “डॉक्टरचं ठीक आहे रे, पण तू…?” मी त्याला मध्येच अडवीत म्हणालो, “हा प्रश्न कोण डॉक्टर, कोण वकील, कोण व्यापारी की कोण सरकारी किंवा खाजगी कर्मचारी हा नाही. पण कामात नियमितपणा असावा. एखाद्या महत्त्वाच्या कामाचा विसर पडला असे होऊ नये यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे.” आणि मग मी या यादीमागे का लागलो याची गोष्ट त्याला सांगितली ती अशी ः
“त्यावेळी मी एका राष्ट्रीयीकृत बँकेत कामाला होतो. काम आटोपल्यावर घरचा बाजार करून जाणे हे नित्याचे काम. ते करून मी घरी पोचलो आणि पत्नीला बघताच मला आठवण झाली ती हिच्या औषधांची. सकाळी डॉक्टरना दाखविल्यानंतरचे औषधांचे प्रिस्क्रिप्शन माझ्याकडेच होते, पण औषधे घ्यायची विसरूनच गेलो होतो. बायकोला म्हटले, “डॉ. वाळकेंनी ही औषधे साळगावलाच मिळतील असे सांगितले होते…” असं खोटंच सांगून ती घेऊन येतो असं म्हणून स्कूटर चालू केली आणि फार्मसीत गेलो. तेथे ती मिळाली नाहीत म्हणून कळंगुटला जाऊन घेऊन आलो. आणि त्या दिवसापासून ठरवलं की, आपल्याला डॉ. आरोंदेकरांचा फॉर्म्युला उपयोगी पडेल आणि तो मी असा चालू ठेवला आहे.”
तो ऐकण्याच्या मूडमध्ये होता म्हणून त्याला मी आणखी दोन गोष्टी सुनावल्या. म्हटलं, “तू सोनाली बॅनर्जीचं नाव ऐकलं आहेस का? 2001 साली या सोनालीनं आपल्या नावावर एक सोनेरी रेकॉर्ड केलं. ती पहिली भारतीय मरीन इंजिनिअरिंग महिला अधिकारी ठरली आणि तिने आपल्या या यशाचं श्रेय जीवनातील नियमितपणा व कामचुकारपणाला डच्चू याला दिलं.

दुसरे उदाहरण आहे ते अब्राहम लिंकनचे. ते म्हणत, ‘तुम्ही सर्व लोकांना काही काळासाठी मूर्ख बनवू शकता, काही लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकता; पण तुम्ही सर्व लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही!’ म्हणून माणसाने दुसऱ्यांना मूर्ख बनवण्यापूर्वी आपण मूर्ख बनणार नाही व शहाणपणासाठी, जीवनात नियमितपणा आणण्यासाठी कामाचं नियोजन करून सुखी जीवनाचा आनंद लुटेन असे ठरविले पाहिजे.”
मग माझ्या मित्राला ‘चाणक्यनीती’मधील जीवनशैली सुधारण्याचे एक तत्त्व सांगितले. “प्रत्येक पर्वतावर माणिक नसते, हत्तीच्या मस्तकावर चंदन नसते, प्रत्येक वनात चंदनाचे झाड असतेच असे नाही, त्याचप्रमाणे सज्जन माणसे ही सर्वत्र मिळतातच असे नाही. परंतु ज्या सज्जनांचा आपल्याला सहवास लाभतो, त्यांच्या जीवनातून आपण काही शिकलो, बोध घेतला तर आपण आपलेही जीवन सुखी बनवू शकतो. पण याचा मुळाधार आहे तो कामाचे नियोजन, आणि त्यातूनच आपण सुखी जीवनाची ऊर्जा प्राप्त करू शकतो. पण त्यासाठी एक महत्त्वाची गोष्टही आपण दृष्टिआड करून चालणार नाही. ती म्हणजे, मनाच्या निर्मळतेशिवाय आणि स्वच्छ जीवनाशिवाय सुनियोजित नियोजन करता येत नाही आणि सुनियोजित नियोजनाशिवाय सुखी जीवनाचा, निर्धोक व निर्भीड जीवनाचा आनंद लुटता येत नाही.”
एव्हाना संध्याकाळ होत आली होती. त्या संध्याछायेमध्ये माझ्या मित्राला दोन चांगल्या गोष्टी सुनावल्याचा आनंद मला झाला व तो मित्रही ‘कामाचे नियोजन म्हणजेच जणू सुखी जीवन’ असे पुटपुटत निघून गेला.

जीवनातील भपकेपणा, भंपकपणा व चंगळपणा नाहीसा करायचा असेल तर केवळ राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी साजरी करून भागणार नाही; त्यांनी घालून दिलेला शांतीचा, साधी राहणी, स्वच्छ करणी व अधूनमधून कडू वा गोड शब्दांची पेरणीही आवश्यक आहे.

साधी राहणी, स्वच्छ करणी

  • शंभू भाऊ बांदेकर
    आमच्या समाजोन्नती संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात- पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहातील माझ्या प्रास्ताविक भाषणात- मी म. गांधींच्या जीवनाचा चौफेर आढावा घेत शेवटी सांगितले की, “प्रत्येक माणसाला आपण सुखी व्हावे असे वाटते व तसे वाटणे साहजिक आहे; पण त्यासाठी सुखी माणसाचा सदरा उपलब्ध नाही. पण गांधींची साधी राहणी, उच्च विचारसरणी व स्वच्छ करणी याचा सदरा आपण अंगावर चढवला तर माणूस नक्की सुखी होईल!”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले माजी कायदा राज्यमंत्री ॲड. रमाकांत खलप व खास निमंत्रित उद्योजक डॉ. प्रफुल्ल हेदे या द्वयींनी समारोपानंतर चहापानावेळी मला पुनश्च बोलते केले. तेव्हा विचारांना आणि जीवनाला नवसंजीवनी देणाऱ्या कवी गोविंद यांच्या कवितेतील दोन ओळी मी त्यांना ऐकवल्या. त्या ओळी अशा होत्या ः
जुनी इंद्रिये, जुना पिसारा
सर्व सर्व झडणार!
नव्या तनूचे, नव्या शक्तीचे
पंख मला फुटणार…
बहुश्रुत चर्चेनंतर मंडळी पांगली. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या यशस्वितेचा चहापानाचा कार्यक्रम होता, तेव्हा कार्यकर्त्यांनी सुखी जीवनाचा विषय काढला. ध्रुव कुडाळकर, महेश चव्हाण, कमलाकर हुगस्कर, विशांत कोरगावकर आणि आमचे कवी, नाटककार व चांगले वाचक कार्यकर्ते पुढे सरसावले. मी त्यांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या सुखी व आनंदी जीवनासंबंधीच्या काही ओळी सांगण्यापूर्वी माझ्या प्रास्ताविकात म्हटले, “कुसुमाग्रज हे जसे श्रेष्ठ कवी आहेत, तसेच ते वि. वा. शिरवाडकर म्हणून उच्च नाटकांच्या निर्मितीचेही जनक आहेत. आपल्या अभिजात शैलीने जसे त्यांनी मराठी नाटक भावसमृद्ध केले, तसेच कादंबरी, कथा आणि ललित निबंध हे वाङ्मयप्रकारही त्यांनी फार यशस्वी रीतीने हाताळले. या सर्व साहित्यप्रकारांत मानवी जीवनाचे विविध कंगोरे त्यांनी फार सुंदरपणे हाताळले आहेत. विशेषतः ‘कविता’ हा त्यांचा आवडता वाङ्मयप्रकार. यात तर त्यांनी स्वतःच्या जीवनाचा शोध घेत इतरांना बोध देण्याची संजीवनीही भरभरून दिली आहे. माणसांच्या व्यथावेदनांनी हे कविमन जेव्हा पोळून निघते तेव्हा त्यांच्या लेखणीतून शब्द प्रसवतात-
…माणसाच्या माथ्यावर
दारिद्य्रासारखा शाप नाही
पृथ्वीच्या पाठीवर
इतके अमंगल, इतके दुःखदायक,
इतके भेसूर
दुसरे पाप नाही!
त्याचबरोबर अंधारमय जगाला सामोरे जाताना दुसऱ्या दिवशीच्या उषःकालाचा आशावादही त्यांनी प्रकट केला आहे. ते म्हणतात-
कशास आई भिजविसी डोळे
उजळ माझे भाळ
रात्रीच्या गर्भात असे
उद्याचा उषःकाळ
आणि बंधूनो, जीवनाची वास्तवानुभूती प्रकट करताना ते म्हणतात-
मातीपण मिटता मिटत नाही
आकाशपण हटता हटत नाही
माझे जखमांचे देणे
फिटता फिटत नाही
हा जीवनानुभव फक्त कवीचा एकट्याचा नाही. हजारो-लाखो लोकांच्या जीवनाचा हा आलेख आहे व यामध्ये सुखी जीवनाच्या घालमेलीत पोळलेला, पिळला गेलेला व छळलेला माणूस, यांच्या व्यथा-वेदनांना सामोरे जाणारे जीवनसत्त्व, त्यासाठी लागणारे शाब्दिक टॉनिक जसे आपणास मिळते, त्याचप्रमाणे साधे राहणीमान, स्वच्छ विचारसरणी व स्वतःबरोबर इतरांनाही प्रेरणा देणारी शक्ती आपणांस मिळू शकते…”
मग सर्वांनी आपापल्या परीने चर्चेत भाग घेत चहापानाची रंगत वाढवली.

जीवनातील भपकेपणा, भंपकपणा व चंगळपणा नाहीसा करायचा असेल तर केवळ राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी साजरी करून भागणार नाही; त्यांनी घालून दिलेला शांतीचा, साधी राहणी, स्वच्छ करणी व अधूनमधून कडू वा गोड शब्दांची पेरणीही आवश्यक आहे व त्यातूनच सुखी जीवनाचे जीवनसत्त्व मिळू शकते, यावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले.