कामत, लोबोंकडून ४ वेळा भाजप पक्ष प्रवेशाचा प्रयत्न

0
11

>> माजी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा गंभीर आरोप

मडगावचे आमदार दिगंबर कामत व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आमदारांच्या एका गटाने विधानसभा निवडणूक झाल्यापासून एक-दोनदा नव्हे, तर तब्बल चार वेळा पक्षातून फुटून भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना केला. त्यांचे हे प्रयत्न अजूनही चालूच आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी कितीही नाकारले आणि खोटे बोलले, तरी त्यांनी चार वेळा एका गटासह कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट आम्हाला माहीत आहे. पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनाही त्याची कल्पना आहे. त्यामुळे दिगंबर कामत यांनी निदान आता तरी खोटे बोलू नये, असे चोडणकर म्हणाले.

कामत किती वेळा दिल्लीला जाऊन आले, तेथे त्यांनी कुणाकुणाची भेट घेतली हे सगळे कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे कामत यांनी आता यापुढे तरी खोटे बोलू नये, असे चोडणकर म्हणाले.

स्वत:ला ईश्‍वरभक्त म्हणवणार्‍या दिगंबर कामत यांनी निवडणुकीपूर्वी पक्षाच्या अन्य उमेदवारांसह मंदिर, चर्चमध्ये जाऊन पक्षातून फुटणार नसल्याची शपथ घेतली होती, याची आठवण देखील चोडणकर यांनी करून दिली.

दिल्लीला गेलोच नव्हतो : कामत
कॉंग्रेसचे आमदार दिगंबर कामत हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी नुकतेच दिल्लीला जाऊन आल्याची चर्चा चालू असतानाच, कामत यांनी स्वत: मात्र आपण दिल्लीला गेलोच नव्हतो, अशी भूमिका काल घेतली. त्यामुळे ते दिल्लीला गेले होते की नाही, याबाबत पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राज्यातील एका वृत्तवाहिनीने कामत हे सोमवारी दिल्लीला गेले होते, असे वृत्त दिले होते. दुसर्‍या बाजूला कामत हे मात्र सातत्याने आपण भाजप नेत्यांच्या संपर्कात नसल्याचा दावा करत आलेले आहेत.