कामत, तवडकर मंत्रिपदी शपथबद्ध

0
25

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळ फेरबदल अखेर पूर्ण; आता खातेवाटपाकडे लक्ष; सार्वजनिक बांधकाम खाते कोणाला?

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल अखेर काल प्रत्यक्षात साकार झाला. दोनापावला येथील राजभवनातील नवीन दरबार सभागृहात एका भव्यदिव्य सोहळ्यात काल दुपारी मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. आता नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या फेरबदलानंतर नीलेश काब्राल यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम खाते मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवले होते. ते वजनदार खाते कोणाला मिळणार, याशिवाय गोविंद गावडे आणि आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांच्याकडील खाती आता कोणाला दिली जाणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ फेरबदल दोन टप्प्यात होणार असल्याची चर्चा असून, दुसऱ्या टप्प्यात मायकल लोबोंना मंत्रिपदी संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

या शपथविधी सोहळ्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती. शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त मंत्री दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दोघेही मंत्री जनतेच्या सेवा आणि राज्याच्या हितार्थ काम करतील. त्यांचा अनुभव स्वयंपूर्ण गोवा उपक्रम पुढे नेण्यासाठी लाभदायक ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

यावेळी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती. मंत्री सुभाष फळदेसाई, नीळकंठ हळर्णकर, विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो, सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर यांच्यासह भाजपचे काही आमदार उपस्थित होते.
सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांनी राज्यपालांच्या मंत्री नियुक्तीच्या आदेशाचे वाचन केले. त्यानंतर राज्यपालांनी अनुक्रमे दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांना मंत्रिपदाची शपथ दिली.

राज्य मंत्रिमंडळातून पहिल्यांदा गोविंद गावडे यांना डच्चू आणि आलेक्स सिक्वेरा यांनी वैयक्तिक कारणास्तव दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या दोन्ही जागांवर नवीन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


तवडकरांचा सभापतिपदाचा राजीनामा
आमदार रमेश तवडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी सभापतिपदाचा राजीनामा विधानसभा सचिवांकडे सादर केला. विधानसभा सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रमेश तवडकरांची राजकीय कारकीर्द
वर्ष 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर 29 मार्च 2022 रोजी रमेश तवडकर यांची गोवा विधानसभेच्या सभापतिपदी निवड करण्यात आली. त्यांनी साडेतीन वर्षे सभापतिपद भूषविले आहे. रमेश तवडकर यांनी यापूर्वी देखील राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. दरम्यान, 2022 मध्ये सुभाष फळदेसाई यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा देऊन मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

दिगंबर कामत यांचा राजकीय प्रवास
आमदार दिगंबर कामत हे 1994 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून मडगावातून निवडून आले. यानंतर 2005 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात ते मंत्री होते. दिगंबर कामत हे सात वेळा मडगाव मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी 2007 ते 2012 या काळात राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले होते. त्यानंतरच्या काळात त्यांनी दोन वेळा विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. सप्टेंबर 2022 मध्ये दिगंबर कामत यांनी काँग्रेसच्या इतर सात आमदारांसमवेत पक्षांतर करून भाजपमध्ये केला होता.

दोघे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत
काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले संकल्प आमोणकर आणि मायकल लोबो हे दोघे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. संकल्प आमोणकर यांना भाजपमध्ये प्रवेश करताना मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे संकल्प आमोणकर यांनी बालभवनचे अध्यक्षपद
नाकारले आहे.

कळंगुटचे मायकल लोबो सुध्दा मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. दिगंबर कामत यांच्याआधी आपली मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा बाळगून होते. तथापि, कामत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. अलीकडेच नवी दिल्ली येथे मुख्यमंत्र्यांसमवेत मायकल लोबो यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली होती. काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले केदार नाईक, रुडाल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो या आमदारांचे महामंडळे देऊन पुनर्वसन करण्यात आले आहे. आलेक्स सिक्वेरा यांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली होती. त्यांनी वैयक्तिक कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता दिगंबर कामत यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांपैकी केवळ मायकल लोबो आणि संकल्प आमोणकर हे दोघेच केवळ राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

जबाबदारी निष्ठेने पार पाडणार : दिगंबर कामत
पक्षाने दिलेली नवीन जबाबदारी निष्ठेने पार पाडणार आहे. आमदार म्हणून जनसेवा सुरूच होती. आता, मंत्रिपदामुळे जनसेवा वाढविण्यास खूप मदत होणार आहे, असे नवनियुक्त मंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जनसेवेवर भर देणार : रमेश तवडकर
सभापतिपदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर पक्ष संघटनेने आता आपणावर मंत्रिपदाची मोठी जबाबदारी सोपविली आहे. वर्ष 2027 च्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून जनसेवा वाढविण्यावर भर देणार आहे, असे नवनियुक्त मंत्री रमेश तवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘कधीही काहीही होऊ शकते’ : मुख्यमंत्री
राज्य मंत्रिमंडळात भविष्यात आणखी मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. कधीही काहीही होऊ शकते, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कालच्या शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले. नवनियुक्त मंत्री दिगंबर कामत आणि रमेश तवडकर हे दोघेही राज्याच्या विकासासाठी काम करतील. त्यांना खात्याची जबाबदारी लवकरच दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नव्या मंत्र्यांना
कोणती खाती?

नवनियुक्त मंत्र्याना दिल्या जाऊ शकणाऱ्या संभाव्य खात्यांबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मंत्री दिगंबर कामत यांच्याकडे महत्वपूर्ण असे सार्वजनिक बांधकाम खाते दिले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. पर्यावरण, कायदा ही खाती सुध्दा त्यांच्याकडे दिली जाऊ शकतात.
रमेश तवडकर यांच्याकडे क्रीडा, आदिवासी कल्याण किंवा कला व संस्कृती यासारखी खाती दिली जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.

गावडे, मायकल लोबोंची अनुपस्थिती
या सोहळ्याला भाजपचे मंत्री बाबूश मोन्सेरात, मंत्री रवी नाईक, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गोविंद गावडे, आमदार मायकल लोबो, आमदार डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा यांची शपथविधी समारंभाला अनुपस्थिती होती.
भाजपचे आणखी एक आमदार संकल्प आमोणकर शपथविधी समारंभ झाल्यानंतर दाखल झाले, तर आमदार नीलेश काब्राल हे शपथविधी सुरू असताना सभागृहात दाखल झाले. तसेच, या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षातील एकही आमदार उपस्थित नव्हता.