कामत, तवडकरांचा आज मंत्रिपदी शपथविधी

0
15

राज्य मंत्रिमंडळ फेररचनेला अखेर मुहूर्त सापडला; दुपारी 12 वाजता शपथविधी; सभापतिपदावर गणेश गावकरांची वर्णी शक्य

प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या गोवा मंत्रिमंडळाच्या फेररचनेला मुहूर्त सापडला असून, आज (दि. 21) दुपारी 12 वाजता काबो राजभवनवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात रमेश तवडकर व दिगंबर कामत हे मंत्री म्हणून शपथ घेतील. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हे त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. अन्य एका राजकीय घडामोडीत आलेक्स सिक्वेरा यांनी काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याआधी पावसाळी अधिवेशनापूर्वी गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. आता मंत्रिमंडळातील रिक्त झालेल्या दोन जागांवर रमेश तवडकर व दिगंबर कामत यांची वर्णी लागणार आहे. तत्पूर्वी, गुरुवारी सकाळी रमेश तवडकर हे आपल्या सभापतीपदाचा राजीनामा देणार आहेत. रिक्त होणाऱ्या सभापती पदावर गणेश गावकर हे विराजमान होणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी स्पष्ट केले. योगायोगाने गणेश गावकर हेही एक अनुसूचित जमातींतील नेते आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील आदिवासी कल्याण खात्यावर गोविंद गावडे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांची 18 जूनला मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर गेले जवळपास दोन महिने मंत्रिमंडळात त्यांच्या जागी कोणाला संधी दिली जाणार आणि मंत्रिमंडळ फेररचनेत कुठल्या फुटीर आमदारांना सामावून घेतले जाणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चांना काल अखेर पूर्णविराम मिळाला.
नव्या मंत्र्यांच्या शपथग्रहण सोहळ्याची वेळ गुरुवारी दुपारी 12 वाजता निश्चित करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे काल नवी दिल्लीत होते. जीएसटी कौन्सिल मंत्रिगटाच्या बैठकीसाठी तेथे गेले होते. ही बैठक आटोपून रात्री उशिरा किंवा गुरुवारी सकाळी गोव्यात परततील. त्यानंतर तवडकर व कामत यांचे शपथग्रहण होणार आहे.

पक्ष सूचनेनुसार सभापतिपद
सोडण्याचा निर्णय : तवडकर

मंत्रिपदासाठी सभापतिपद सोडले काय, असा सवाल काल पत्रकारांनी सभापती रमेश तवडकर यांना केला असता ते म्हणाले की, भाजपने आपणाला सभापतिपद सोडून मंत्रिपद स्वीकारण्याची सूचना केली होती. आपण सभापतिपदी असल्याने पक्षाच्या कामात भाग घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे होते. त्यांनी मंत्रिपद स्वीकारण्याचा आग्रह केल्याने आपण सभापतिपदाचा राजीनामा दिला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान, आपण सभापतिपदाचा गुरुवारी सकाळी राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संघटनात्मक कामासाठी
पक्षाला आपली गरज : तवडकर

मार्च 2022 मध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पक्षाने आपणाकडे सभापततिपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी आपण सभापती म्हणून वर्षातील 365 दिवस काम करण्याचे व सभापतिपदाची शान वाढवण्याचे आश्वासन पक्षाला दिले होते. ते आश्वासन आपण पूर्ण केल्याचे समाधान असल्याचे तवडकर म्हणाले. सभापतिपदाचा कार्यकाळ पूर्ण करण्याची आपणाला इच्छा होती. मात्र, संघटनात्मक कामासाठी पक्षाला आपली गरज भासू लागल्याने आपण सभापतिपद सोडून मंत्रिपद स्वीकारावे, हा पक्षाचा प्रस्ताव आपण स्वीकारल्याचे रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले.

जे पद मिळेल त्या पदाचा
मान राखेन : गावकर

आमदार गणेश गावकर यांचे नाव सभापतिपदासाठी चर्चेत असून, त्यावर प्रतिक्रिया देताना, आपणाला जे पद दिले जाईल, त्या पदाचा आपण मान राखणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या टप्प्यात कोणाला संधी?
दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ फेररचनेत आणखी एका मंत्र्याला मंत्रिमंडळात सामावून घेण्यात येणार असून, त्यासाठी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचे नाव चर्चेत असल्याचे भाजपमधील सूत्रांनी स्पष्ट केले ओह. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील फेररचना कधी होणार आहे हे स्पष्ट झालेले नसून, सरकारने त्याबाबत कमालीची गुप्तता बाळगलेली आहे.

वैयक्तिक कारणांमुळे सिक्वेरांचा राजीनामा

आलेक्स सिक्वेरा यांना 19 नोव्हेंबर 2023 ला मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले होते. त्यासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. मात्र, आता मंत्रिमंडळाच्या नव्याने होऊ घातलेल्या फेररचनेच्या पार्श्वभूमीवर गंभीर आजारी असलेल्या आलेक्स सिक्वेरा यांना पक्षाने राजीनामा देण्याची सूचना केल्याने काल त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे कायदा, पर्यावरण, बंदरे व विधानमंडळ व्यवहार ही खाती होती. सिक्वेरा यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामापत्रात वैयक्तिक कारणांमुळे आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. आपण मंत्री म्हणून काम करताना आपल्या क्षमतेनुसार काम केल्याचे सांगतानाच सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या फेररचनेच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी गोव्यातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा केली.