कामगारांनी हक्कांसाठी लढण्याची गरज

0
24

कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांचे प्रतिपादन

कामगारांनी आपले हक्क मिळवून घेण्यासाठी लढा दिला पाहिजे. अन्यथा कामगारांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. कामगार वर्ग आपल्या हक्कासाठी लढा देत असल्याने त्यांचे अस्तित्व कायम आहे, असे प्रतिपादन कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी अखिल भारतीय ट्रेड युनियम काँग्रेसने (आयटक) जागतिक कामगार दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलताना येथे काल केले.

राज्यातील औषध निर्मिती कंपनीतील कामगारांना लागू केलेला एस्मा रद्द करावा, चार कामगार विरोधी कायदे मागे घ्यावेत, किमान वेतन 26 हजार रुपये आणि पेन्शन 10 हजार रुपयांची अंमलबजावणी, शाश्वत खनिज व्यवसाय सुरू करावा, अशा विविध मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी सभेत करण्यात आली आहे.
केंद्र सरकार कामगारविरोधी आहे. सरकार भांडवलदारांच्या फायद्याचे आणि कामगारांवर अन्याय करणारे कायदे आणत आहे. केंद्राने कामगारविरोधी चार काळे कायदे त्वरित मागे घेतले पाहिजेत. देशात बेरोजगारी वाढत आहे. संप केल्यावर कामगारांना काढून टाकण्यात येते किंवा दूर ठिकाणी बदली करण्यात येते आहे, असे कामगार नेते फोन्सेका यांनी सांगितले.

कामगारांना आपल्या हक्कासाठी लढण्याचा अधिकार आहे. सामान्य जनतेसह कामगारांना महागाईला तोंड द्यावे लागत आहे. कामगारांचे किमान वेतन वाढणे आवश्यक आहे. अकुशल कामगारांना महिन्याला 26 वेतन व 10 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणे आवश्यक आहे. तसेच, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला किमान हजार रुपये मिळाले पाहिजेत, असेही फोन्सेका यांनी सांगितले.

राज्य सरकारने औषधनिर्मिती कंपनीमधील कामगारांनी संपावर जाऊ नये म्हणून एस्मा लागू केला आहे. हा एस्मा दर सहा महिन्यांनी वाढविला जात आहे. हा एस्मा आदेश रद्द करावा, अशी मागणी कामगार नेते फॉन्सेका यांनी केली.
यावेळी कामगार नेते राजू मंगेशकर, प्रसन्ना उटगी, सुहास नाईक व इतरांची उपस्थिती होती. या जाहीर सभेच्या पूर्वी राज्यभरातून राजधानीत एकत्र जमलेल्या कामगारांनी कदंब बसस्थानक ते चर्च स्केअरदरम्यान ऱॅली काढली.