काणकोण तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एक ठार आणि एक व्यक्ती जखमी झाली. मृत व्यक्तीचे नाव प्रभाकर बांदेकर (४२) असे असून तो लोलये येथील तर जखमीचे नाव लवेश सुदीर (२५) असे असून तो खावट पैंगीण येथील रहिवासी आहे.पहिला अपघात सकाळी १०च्या दरम्यान पैंगीण येथे घडला. काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारवारच्या दिशेने लोखंड घेऊन जाणार्या केएल- २५- बी- १९६९ या मालवाहू वाहनाने प्रथम एमएच- ०७-०२- ८८२ या बेलेरो जीपला ठोकरले आणि त्याचवेळी समोरून आलेल्या जीए- १०- बी- १३८७ या स्कूटरला धडक दिल्याने स्कूटरवर असलेल्या दोन्ही व्यक्ती रस्त्यावर फेकल्या गेल्या. या अपघातात दोन्ही व्यक्तींच्या कमरेखाली मार लागल्यानंतर जखमी अवस्थेत दोघांवरही काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी प्रभाकर बांदेकर याला डॉक्टरानी मृत घोषित केले. सदर रस्त्यावर हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम चालू असून पोलिसांनी मालवाहू वाहनाला थांबण्याचा इशारा दिला होता. परंतु पोलिसांच्या इशार्याला न जुमानता सदर वाहनचालक पुढे गेला आणि दोन वाहनांना ठोकरल्यानंतर डांबरीकरणाचे काम चालू असलेल्या रोलरला धक्का दिला. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्यानंतर वाहन रस्त्यावर टाकून चालक पळून गेला. सदर चालकाचे नाव श्रीकांत के. एस. असे असून पोलिसांनी वाहन आणि चालकाला संध्याकाळी ताब्यात घेतले आहे.
दुसरा अपघात पर्तगाळ येथे घडला असून माजाळी येथून आलेल्या जीए- ०९- ए- ६००१ या आयटेन आणि जीए- ०२- टी- ९१४७ या टिप्परमध्ये झालेल्या अपघातात जीए- ओ- बी- ३०२५ या दुचाकीचे नुकसान झाले आहे. यावेळी दुचाकी स्वराने प्रसंगावधान पाहून दुचाकीवरून उडी घेतल्याने तो बचावला. मात्र, या अपघातात दुचाकीची मोडतोड झाली आहे. दोन्ही अपघातांचा पंचनामा करून वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत देसाई पुढील तपास करीत आहेत.

