काणकोणकर हल्ला प्रकरणात ॲट्रॉसिटीचे कलमही जोडले

0
4

पणजी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात आता 1989 च्या अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याचे कलम 3(1)(अ), 3(1)(आर), 3(1)(एस), आणि 3(2)(व्ही) (ॲट्रॉसिटी) ही जोडली आहेत. तसेच या हल्ला प्रकरणाच्या तपासकामासाठी पणजी विभागीय पोलीस अधिकारी सुदेश नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या 18 सप्टेंबर रोजी रामा काणकोणकर यांच्यावर करंजाळे येथे प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह अन्य 7 जणांना अटक झाली होती. या प्रकरणात संशयितांच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आता अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कलमे देखील जोडण्यात आली आहेत.

जेनिटो कार्दोजचा जामिनासाठी अर्ज
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून पणजी पोलिसांनी अटक केलेल्या गुंड जेनिटो कार्दोज याने जामिनासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.
पणजी पोलिसांनी रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणात अटक केलेल्या सात संशयित आरोपींनी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोज असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी जेनिटो कार्दोज याला पणजीतील एका हॉटेलमधून अटक केली होती. तो सध्या 14 दिवसांसाठी न्यायालयीय कोठडीत आहे.