बदनामीप्रकरणी बजावली कायदेशीर नोटीस
समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे, गुन्हेगारी मानहानी, जाणूनबुजून खोटी माहिती पसरवणे, लोकांना भडकावणे आणि गुन्हेगारी धमकी देण्याचे आरोप केल्याप्रकरणी एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी रविवारी त्यांच्याविरुद्ध फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदा यांच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यासाठी सदर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार काणकोणकर यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला तसेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करून नरेंद्र सावईकर यांना लक्ष करून अत्यंत आक्षेपार्ह आणि मानहारिकारक विधाने केली होते. रामा काणकोणकर यांनी बाळ्ळी आंदोलनाचा मुद्दा घेत नरेंद्र सावईकर यांनीच आंदोलन भडकवले व दोन आदिवासी युवकांचा त्यात बळी गेला असल्याचे विधान केले होते. त्या आदिवासी बांधवांच्या मृत्यूस सावईकर हेच करणीभूत असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर नरेंद्र सावईकर यांनी आक्षेप घेत काणकोणकर यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर नरेंद्र सावईकर यांच्याकडून रामा काणकोणकर यांना कायदेशीर नोटीस बजावून एक कोटी रुपये अब्रू नुकसानीचा दावा केला आहे.

