गुंडांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले एसटी नेते व समाजकार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी गोमेकॉतून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. हे आरोप काल सरकारने व भाजपने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत फेटाळून लावले.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जलसंसाधन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यावर आरोप करणाऱ्या रामा काणकोणकर यांचा ‘बोलविता धनी कोण?’ असा प्रश्न करुन त्याचे नाव उघड करण्याची तसेच त्यांची चौकशी केली जाण्याची मागणी केली.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी रामा काणकोणकर यांनी विनाकारण खोटे बोलून भाजपचे व सरकारचे नाव बदनाम करू नये, अशी मागणी केली.
खंवटेंनी फेटाळले आरोप
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी रामा काणकोणकर यांनी त्यांच्यावर केलेले आरोप काल फेटाळून लावले. रामा काणकोणकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत राजकीय नेत्यांचे नाव घेतले नव्हते. मात्र, आता 24 दिवसांनंतर त्यांनी मुख्यमंत्री व आपणावर आरोप केल्याचे सांगून कुणाच्यातरी सांगण्यावरून त्यांनी हे आरोप केले असावेत असे खंवटे म्हणाले. काणकोणकर यांच्यावर उपचार चालू असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती, असे सांगून मुख्यमंत्री व आपणावर केलेल्या आरोपांमागे राजकारण असल्याचा संशय खंवटे यांनी व्यक्त केला आहे.
माविननी केला निषेध
वाहतूकमंत्री मविन गुदिन्हो यांनी यावेळी बोलताना, रामा काणकोणकर यांनी भाजपवर तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत व मंत्री रोहन खंवटे यांच्यावर केलेला आरोपांचा आम्ही निषेध करीत असल्याचे सांगितले. मंत्री गुदिन्हो यांनी, मागचे 20-21 दिवस काणकोणकर हे गोमेकॉत उपचार घेत होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत राजकीय नेत्यांची नावे घेतली नव्हती. मात्र, डिस्चार्ज मिळताच ते आक्रमक बनले व त्यांनी थेट मुख्यमंत्री सावंत व मंत्री रोहन खंवटे यांचा आपणाला झालेल्या मारहाणीत हात असल्याचा आरोप केले. त्यांची ही भूमिका योग्य नसल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री यांचा आपणावर झाालेल्या हल्ल्यात हात आहे असे त्यांचे म्हणणे असेल तर ते त्यांनी पूर्वीच सांगायला हवे होते, असे गुदिन्हो म्हणाले. आपणावर झालेल्या हल्ल्याला राजकीय रंग देण्यासाठीच काणकोणकर यांनी मुख्यमंत्री व पर्यटनमंत्र्यावर आरोप केल्याचे गुदिन्हो म्हणाले.
मंत्री शिरोडकर यांनी, गोवा हा एक शांत प्रदेश असून येथील लोक हे सुशिक्षित आहेत. काणकोणकर यांनी अशा प्रकारे मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री यांच्यावर आरोप करणे हे योग्य नव्हे. उद्या ते अशा प्रकारे आणखीही काही मंत्री व नेत्यांवर आरोप करु शकतात असे सांगून पोलिसांनी काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा अगदी मुळाशी जाऊन तपास करावा, अशी मागणी केली.
खासदार तानावडे यांनी, रामा काणकोणकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत राजकीय नेत्यांची नावे घेतली नव्हती. आता 20-22 दिवसानंतर मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री यांच्यावर आरोप करणे हे योग्य नव्हे. काणकोणकर यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी वेगळीच माहिती दिली होती. शिवाय काणकोणकर यांच्या पत्नी रती काणकोणकर यांनीही वेगळाच आरोप केला होता, असे तानावडे म्हणाले.
आपल्यावरील हल्ल्याविषयीची काणकोणकर यांनी वेळोवेळी परस्परविरोधी अशी माहिती दिल्याचे तानावडे हे म्हणाले.
काणकोणकर यांच्यावर हल्ला केलेल्या गुंडांना अटक करण्यात आलेली आहे. या हल्ल्याची सविस्तर अशी चौकशी केली जात आहे. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तपासकाम केलेले आहे. त्यामुळे काणकोणकर यांनी नको ते आरोप करूरु नयेत, असे तानावडे म्हणाले.
स्टंटबाजी थांबवा ः तवडकर
रामा काणकोणकर यांनी स्टंटबाजी थांबवावी. त्यांनी घटनेच्या 24 दिवसांनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
रामा काणकोणकर यांचा या प्रकरणी बोलविना धनी कुणी वेगळाच आहे, असे वाटते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर त्यांनी हल्ल्याचे आरोप करणे योग्य नव्हे. मुख्यमंत्री हे गुंड प्रवृत्तीचे मुळीच नाहीत, असे कला व संस्कृती व आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी म्हटले आहे.
जबानीत कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव नाही ः पोलीस
रामा काणकोणकर यांनी पोलिसांना 2 ऑक्टोबर रोजी दिलेल्या जबानीत कोणत्याही मंत्र्याचे अथवा राजकीय नेत्याचे नाव घेतले नव्हते, अशी माहिती काल पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस महासंचालक आलोक कुमार, तसेच उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तपास अधिकारी उपअधीक्षक सुदेश नाईक यानी वरील माहिती दिली.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील संशयितांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच तपास चालू असल्याचे यावेळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.

