गोवा प्रदेश काँग्रेस समितीने कांपाल-पणजी येथील फुटबॉल मैदानाच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात पाटो-पणजी येथील गोवा राज्य नागरी विकास यंत्रणेच्या (जीसुडा) कार्यालयाबाहेर निदर्शने करून कांपाल मैदानाच्या खासगीकरणाला जोरदार विरोध काल केला. संबंधित अधिकाऱ्याला एक निवेदन सादर करून या मैदानाच्या खासगीकरणाचा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली. निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
कांपाल येथे सुमारे 40 हजार चौरस मीटर क्षेत्रावर सुमारे 30 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या क्रीडा संकुलाच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. राज्यातील खेळाडूंसाठीच ह्या क्रीडा संकुलाचा वापर झाला पाहिजे. त्याचे खासगीकरण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अमित पालेकर यांनी दिला.
या आंदोलनात माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, युवक काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतीक्षा खलप, सेवा दल प्रमुख राजन घाटे, समिल वळवईकर व इतरांनी सहभाग घेतला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी श्रमशक्ती भवनाच्या तळमजल्यावर निदर्शने केल्यानंतर जीसुडाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याला एक निवेदन सादर केले.

