मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बार्देश तालुक्यातील कांदोळी येथील एका भाड्याच्या आलिशान व्हिलामधून 12 जणांना अटक केली असून याद्वारे सुमारे 900 कोटी रुपयांच्या व्यवहारात गुंतलेले सायबर फसवणुकीचे एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.
संशयित आरोपी कासा डी निकोल या व्हिलामधून 24 तास चालणारे मनी-लॉन्ड्रिंगचे जाळे चालवत होते. पर्यटक असल्याचे भासवून ते या जागेचा वापर ‘बेस’ म्हणून करत होते आणि याद्वारे देशभरातील हजारो ‘म्युल’ बँक खात्यांचा (दुसऱ्यांच्या नावावर उघडलेल्या खात्यांचा) वापर करून पैशांची हालचाल करत होते, असे तपासात आढळून आले आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हा विभागाने जुलै 2026 मध्ये दक्षिण मुंबईतील एका बनावट कॉर्पोरेट कार्यालयावर छापा घातला होता. त्या प्रकरणाची चौकशी करताना गोव्यात फसवणुकीचे मोठे रॅकेट चालविले जात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर 4 ऑगस्ट 2026 रोजी कांदोळी येथे सदर व्हिलावर छापा टाकून तपास पथकाने 12 जणांना ताब्यात घेतले. तसेच, 15 लॅपटॉप, 128 एटीएम कार्ड, 85 मोबाईल फोन, 76 सिम कार्ड, 22 चेकबुक आणि 77 पासबुक आणि डझनभर बँकिंग किट्स जप्त केले. ज्यांचा वापर हे व्यवहार करण्यासाठी केला जाई.
या नेटवर्कशी जोडलेली 7500 बँक खाती गोठवून पोलिसांनी 120 कोटी रूपये जप्त केले. या एकाच व्हिलामधून 500 कोटी रूपये वळवल्याचा संशय आहे.

