पोहण्यावर बंदी असतानाही कांदोळी येथील खवळलेल्या समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या मणिपूर येथील टी. सालोव (18) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काल सोमवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान घडली. सदर युवक आपल्या इतर तीन मित्रांसोबत आंघोळीसाठी गेला होता. काही दिवसांपूर्वीच तो गोव्यात कामानिमित्त आला होता तसेच एका हॉटेलमध्ये तो कामाला होता. टी सापूलोव याचा मृतदेह आढळला असून पुढील तपास कार्य उपनिरीक्षक स्नेहल मळीक करत आहेत.

