कांगारूंनी बांगलादेशला लोळवले

0
153

महिला टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेतील दहाव्या लढतीत काल गुरुवारी विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा ८६ धावांनी दारुण पराभव केला. २० षटकांत १ बाद १८९ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर कांगारूंनी बांगलादेशचा डाव ९ बाद १०३ धावांत रोखला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर सामनावीर ऍलिसा हिली (८३ धावा, ५३ चेंडू, १० चौकार, ३ षटकार) व बेथ मूनी (नाबाद ८१, ५८ चेंडू, ९ चौकार) यांनी ऑस्ट्रेलियाला १५१ धावांची विक्रमी सलामी दिली. ऍश्‍ले गार्डनरने केवळ ९ चेंडूंत २२ धावा चोपल्या. या आक्रमक फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने १८९ धावांचा पर्वत उभा केला. या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव कोलमडला. फरगाना हक (३६) हिने थोडाफार प्रतिकार केला. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूट हिने २१ धावांत ३, जेस जोनासनने १७ धावांत २ तर ऍनाबेल सदरलँड व निकोला केरी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.