कांगारूंची विश्‍वचषक विजयपंचमी

0
147

ट्रान्स-तास्मान प्रतिस्पर्धी तथा सहयजमान न्युझीलँडवर अंतिम फेरीत लीलया मात करीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा प्रतिष्ठेच्या आयसीसी विश्‍वचषकावर पाचव्यांदा नाव कोरले. याआधी १९९२मध्ये ऑस्ट्रेलियाने विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविले होते, पण उपांत्य फेरीत गाठण्यातही यश आले नव्हते. तथापि, गेल्या काही वर्षांत विलक्षण सर्वंकष प्रगती साधलेल्या ऑसिसने २३ वर्षांनंतर मेलबर्न क्रिकेट मैदानावरील अंतिम मुकाबल्यात स्वशौकिनांच्यासाक्षीत विश्‍वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. श्रीलंका (१९९६) आणि भारत (२०११) यांच्यानंतर स्वभूमीवर विश्‍वचषक जिंकणारा तिसरा यजमान संघ बनण्याचा मान मायकल क्लार्क आणि कंपनीने मिळविला. १९८७ मध्ये कोलकाता येथील ईडन गार्डनवरील विक्रमी ९५ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीतील अंतिम मुकाबल्यात ऑस्ट्रेलियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडवर ७ धावांनी मात करीत आपले पहिलेवहिले विश्‍वचषक विजेतेपद प्राप्त केले. १९९९, २००३ आणि २००७ या बारा वर्षांच्या कालखंडातील तिन्ही प्रतियोगितात ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व गाजविले. २०११मध्ये मात्र ऑसिसला हा संवेग राखता आला नाही. महंेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने स्वभूमीवर २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्‍व चषकावर नाव कोरले. अकराव्या विश्‍व चषक स्पर्धेंत मात्र प्रारंभापासूनच यजमान ऑस्ट्रेलियाकडे जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते आणि त्यानी अपेक्षित कामगिरीत ‘विश्‍वविजयपंचम’ साधला. प्राथमिक फेरीत सहयजमान न्युझीलँडने ऑसिसला निसटता धक्का दिला होता त्यामुळे अंतिम फेरीत अपराजित, सहयजमान तगडे आव्हान देणार अशी अपेक्षा होती आणि नाणेफेकीचा कौल किविज कप्तान ब्रँडन मॅकलमने जिंकल्याने ‘छोटे मिया …बडे मियॉ’ना आणखी एक धक्का देणार असे कुतूहल जागले होते, पण फलंदाजांनी गाजविलेल्या या विश्‍व चषकात ‘मालिकावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या मिशेल स्टार्कने पाहुण्याना जबर दणका देताना पहिल्या षट्‌कातच बेदरकार मॅकलमला शून्यावरच उडविले आणि किविज संघ या दणक्यातून सावरू शकला नाही. द्विशतकवीर मार्टिन गप्टिल आणि केन विलियम्स हे बहरातील खेळाडू स्वस्तात परतले आणि ‘ब्लॅक कॅप्स’ची स्थिती नाजूक बनली. ‘चोकर्स’ द. आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीत वीरोचित मर्दुमकी गाजविलेला ग्रँट एलियट आणि अनुभवी रॉस टेलरने शतकी भागी नोंदवीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या फॉल्कनरन‘बॅटिंग पॉवरप्ले’मधील पहिल्याच चेंडूवर अनुभवी टेलर व तिसर्‍या चेंडूवर धोकादायक कोरी अँडरसनची यष्टी उधळली आणि नंतर ग्रँट एलियटलाही तंबूत पाठवित प्रतिस्पर्ध्यांना १८३ धावात उखडले. अपराजित घोडदौडीसह प्रथमच अंतिम फेरी धडकलेला सहयजमान संघ मिशेल स्टार्क, मिशेल जॉन्सन, जेम्स फॉल्कनर, जोश हॅझलवूड यांच्या भेदक मार्‍यापुढे कोलमडलेला किविज संघ पूर्ण पन्नास षटकेही खेळू शकला नाही. १९८३ मधील विश्‍वचषक अंतिम लढतीत कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारताचा डाव १८३ धावातच आटोपला होता आणि नंतर त्यानी दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडीजला जबर धक्का देत विश्‍व विजेतेपद पटकावले होते. ऑसिसच्या डावाच्या प्रारंभास या स्मृतीना उजाळा देण्यात आला पण पूर्णतः व्यावसायिक दृष्टिकोन असलेला ऑसिस संघ वेस्ट इंडीजसारखा गाफील राहिला नाही, त्यानी शिस्तबध्द खेळीत जवळ जवळ १७ षटके राखीत उद्दिष्ट गाठले. सलामीवीर ऍरोन फिन्च दुसर्‍याच षटकात परतला, पण दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ४५ धावांची तडाखेबंद खेळी केली. नंतर बहरातील स्टीव स्मिथ आणि कर्णधार मायकल क्लार्क जोडी जमली आणि उभयतांनी शतकी भागी नोंदवीत विजय निश्‍चित केला. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर शस्त्रक्रियेतून गुजरलेल्या मायकल क्लार्कबाबत स्पर्धेच्या प्रारंभापासूनच साशंकता होती पण तरीही राष्ट्रीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनानेही प्रेरणादायी कर्णधारावर विश्‍वास प्रगटविताना त्याला बांगलादेशविरुध्दच्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होण्याची मुभा दिली आणि अखेर प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या क्लार्कने अंतिम मुकाबल्यात आपल्या निरोपाच्या एक दिवशीय आंतरराष्ट्रीय लढतीत वीरोचित कामगिरीचे दर्शन घडविताना १० चौकार आणि षट्‌कारासह ७४ धावांच्या देखण्या खेळीसह देशवासीयांना विश्‍वचषकाची अविस्मरणीय भेट दिली.