काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज गोव्यात

0
11

राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच गोव्यात

कार्यकर्ते, आमदार, पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे आज 17 ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आगमन होणार असल्याचे गोवा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. सोमवारी दुपारी 3.30 वा. मल्लिकार्जुन खर्गे यांचे दाबोळी विमानतळावर आगमन होणार असल्याचे ते म्हणाले. खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच गोवा दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. राज्यात लवकरच गोवा विधानसभा निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर खर्गे यांचे राज्यात आगमन होणार असल्याचे त्यांच्या दौऱ्याची तयारी जोरात सुरू असल्याचे कवठणकर यांनी सांगितले.

आपल्या या गोवा दौऱ्यात खर्गे हे पक्षाचे बूथस्तरीय कार्यकर्ते, पक्षाचे आमदार व पदाधिकारी, गोवा प्रदेश काँग्रेस समिती तसेच राज्यातील तीनही जिल्ह्यातील पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार असल्याचे कवठणकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर खर्गे हे आपल्या या दौऱ्यात राज्यातील विविध बिगरसरकारी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशीही राज्यासंबंधीच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचे कवठणकर यांनी स्पष्ट केले.

आज सोमवारी गोव्यात आगमन झाल्यानंतर ते दाबोळी विमानतळावरून वेर्णे येथून ‘किंता द वालादारीस’ येथे जाणार असून तेथे बूथस्तरीय कार्यकर्त्यांना गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत. सर्व जिल्ह्यांचे कार्यकर्ते यावेळी हजर असतील.
18 ऑगस्ट रोजी खर्गे हे पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच त्यादिवशी राज्यभरातील बिगर सरकारची संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी गोव्याच्या विविध प्रश्नांसंबंधी चर्चा करणार आहेत, असे कवठणकर यानी सांगितले.

आमदार फुटत असल्याने जनतेचा
काँग्रेसवर विश्वास नाही ः सरदेसाई

काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आल्यानंतर आपल्या स्वार्थासाठी पक्षातून फुटून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने राज्यातील जनतेचा या पक्षावरील विश्वास उडाला आहे, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दै. नवप्रभाशी दिलेल्या भेटीच्यावेळी केला. दै. नवप्रभाच्या वर्धापनदिनी कार्यालयात भेट दिली असता राजकीय गप्पांच्यावेळी त्यांनी वरील आरोप केला. हल्लीच्या काही वर्षांत काँग्रेस पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने पक्षातून फुटून सत्ताधारी भाजपमध्ये गेलेले असून त्यामुळे आता काँग्रेस पक्षाकडे त्यांचे तीनच आमदार शिल्लक राहिले आहेत. परिणामी राज्यातील लोकांचा या पक्षावरील विश्वास उडाला असून ते यापुढे या पक्षाला मते देतील की काय याबाबत शंका असल्याचे आमदार सरदेसाई म्हणाले. मात्र, याही परिस्थितीत आम्ही काँग्रेस पक्षाला युतीसाठीचा हात पुढे करण्याची तयारी ठेवली होती. पण काँग्रेस पक्षाकडून हवा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आता आमची दारे काँग्रेस पक्षासाठी कायमची बंद केली असून ‘एका चलो’चा निर्णय घेतला असल्याचे सरदेसाई म्हणाले.

काँग्रेस पक्षाकडून आम्ही आता प्रतिसादाची आशा ठेवू शकत नसल्याचे स्पष्ट करून आम्ही आता सगळा भर हा आमच्या पक्षाची बांधणी करण्यावर दिला असल्याचे ते म्हणले. विविध मतदारसंघांत सध्या आमचे काम जोरात चालू आहे, अशी माहितीही सरदेसाई यांनी दिली.

प्रादेशिक पक्षांना
गृहित धरू नये

प्रादेशिक पक्षांचे महत्त्व हे फार मोठे असून प्रादेशिक पक्षांना कुणी गृहित धरू नये, असेही ते म्हणाले. प्रादेशिक पक्ष मजबूत होतील तेव्हा त्यांना दिल्लीत केंद्रस्थानी असलेल्या नेत्यांच्या तालावर नाचण्याची गरजच पडणार नसल्याचे सरदेसाई हे म्हणाले.
दक्षिण भारतातील लोकांनी प्रादेशिक पक्ष व पर्यायाने आपली अस्मिता टिकवून ठेवली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.