आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात पहिला कॅसिनो सुरू करण्यास मान्यता देण्यात आली; मात्र आपल्या नेतृत्वाखालील सरकार हे काँग्रेस पक्षाचे नव्हते. त्यामुळे काँग्रेस पक्षाने गोव्यात कॅसिनो आणले हा भाजपकडून केला जाणार आरोप चुकीचा आहे, असे माजी मुख्यमंत्री, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. भाजप सरकार सध्याच्या परिस्थितीत जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी विनाकारण आरोप करीत आहे. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात काही मोजक्याच कॅसिनोंना मान्यता देण्यात आली होती. तथापि, आज राज्यभरात मोठ्या प्रमाणात कॅसिनो कार्यरत झाले आहेत. मांडवी नदीतील कॅसिनो जहाजांची संख्या वाढलेली आहे. कॅसिनो प्रश्नी भाजपने काँग्रेसला दोष देण्यापेक्षा कॅसिनोबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असेही सार्दिन यांनी सांगितले.

