काँग्रेसच्या 108 बुथ लेव्हल एजंटाचे राजीनामे

0
11

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या 108 बुथ लेव्हल एजंटांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ काल उडाली. गोवा प्रदेश काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वादामुळे 108 बुथ लेव्हल एजंटांनी राजीनामे दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा गोवा दौरा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून आयोजित काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यापूर्वी 108 जणांनी राजीनामा दिला.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रानुसार, गोव्यातील विविध मतदान केंद्रांवरील 108 एजंट्सचे बीएलए-2 फॉर्म निवडणूक प्रशासनाकडे सादर केल्याचा दावा करण्यात आला आहे.
या घडामोडीमुळे काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमधील असंतोष उघड झाला आहे. पक्षाने मेळाव्याचे आयोजन करताना बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप केला जात आहे.

वाळपई येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दावा केला की, त्या मतदारसंघातील 10 बीएलए सदस्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांचे राजीनामे केवळ बीएलए जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित आहेत आणि ते काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून कायम आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. आम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहोत, पण सध्या ज्या प्रकारे गोष्टी घडत आहेत, त्याबद्दल आम्ही खूप निराश आहोत, असे वाळपई येथील एका काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले. गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी वाळपईमध्ये बीएलए सदस्यांसोबत कोणतीही बैठक घेतली नाही, असा आरोपही त्या कार्यकर्त्याने केला.