गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत गोवा रक्षण यात्रेचा व्यापक आराखडा निश्चित करण्यात आला असून, येत्या 22 सप्टेंबरपासून या यात्रेला प्रारंभ केला जाणार आहे.
काँग्रेस मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे पदाधिकारी आणि राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत गोवा रक्षण यात्रेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत संघटन बळकटीकरण, लोकशाही हक्कांचे संरक्षण आणि गोव्यातील महत्त्वाच्या राजकीय व जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गोव्याची अस्मिता, पर्यावरण, संविधानिक मूल्ये आणि गोमंतकीयांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी जनजागृती करणे तसेच राज्यभरातील नागरिकांशी थेट संवाद साधणे, हा यात्रेचा मुख्य उद्देश आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी
स्पष्ट केले.
या बैठकीत एसआयआर प्रक्रियेतील अडचणींवर चर्चा करण्यात आली आहे. मतदारयादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान मतदारांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. पक्षाचे प्रवक्ते सावियो कुतिन्हो यांनी राज्यभरातून प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती दिली. आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी प्रस्तावित प्रभाग पुनर्रचनेच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे अध्यक्ष प्रवीण ब्लॅगन यांनी या प्रक्रियेबाबत माहिती सादर केली. प्रभाग पुनर्रचना पारदर्शक, निष्पक्ष आणि लोकशाही तत्त्वांनुसार व्हावी, अशी भूमिका कार्यकारिणीने व्यक्त केली.
पक्ष संघटना तळागाळात अधिक सक्षम करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले. पक्षाची भूमिका प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून जनविरोधी धोरणांविरोधात प्रभावी लढा उभारण्याचे तसेच गोव्यातील जनतेच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो, कार्याध्यक्ष एम. के. शेख व सुनील कवठणकर, कोषाध्यक्ष दत्ता नाईक तसेच पक्षाचे पदाधिकारी व राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

